डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची 20 जानेवारी 2025 रोजी कमान हातात घेणार आहेत. मात्र त्यांनी आत्तापासूनच कामाला सुरुवात केली आहे. ट्रम्प यांनी त्यांच्या टिमची पहिली नियुक्ती केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचार दौ-याच्या प्रमुख असलेल्या सुझी विल्स यांची व्हाऊट हाऊसमध्ये चीफ ऑफ स्टाफ या पदावर नियुक्ती केली आहे. ट्रम्प यांची ही पहिलीच नियुक्ती वैशिष्टपूर्ण ठरली आहे. कारण सुझी विल्स या चीफ ऑफ स्टाफ पदावर विराजमान होणा-या पहिल्या महिला ठरल्या आहेत. शिवाय नॅशनल फुटबॉल लीग चे क्रीडा प्रसारक पॅट समरॉल यांची कन्या असेल्या सुझी या अत्यंत शिस्तबद्ध अधिकारी म्हणून ओळखल्या जातात. ट्रम्प यांच्या प्रचार दौ-याचे सर्व नियोजन त्यांनी ज्या पद्धतीनं पार पाडलं, त्यावरुन त्याचं कौशल्य दिसून येतं. विशेषतः ट्रम्प यांच्यावर हल्ला झाल्यावरही त्यांचे होणारे दौरे आणि ट्रम्पचे आक्रमक भाषण यामध्ये सुझी यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. (Susie Wiles)
याहून सुझी यांचे आणखी एक वैशिष्ट म्हणजे, त्यांना कधीही पडद्यावर यायला आवडत नाही. प्रचार दौरे जरी त्यांनी आखले असले तरी त्या कधी स्टेजवर गेल्या नाहीत. अगदी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यावर ट्रम्प यांचे पहिले भाषण झाले, तेव्हाही सुझी यांना स्टेजवर बोलावण्यात आले होते. तेव्हा सुझी यांनी नम्रपणे नकार दिला. यामुळेच ट्रम्प यांनी आपल्या पहिल्या भाषणात, सुझी कठोर, हुशार, अनुभवी आणि आदरणीय आहे. सुझी अमेरिकेला पुन्हा महान बनवण्यासाठी अथक परिश्रम करत राहील. युनायटेड स्टेट्सच्या इतिहासातील पहिली महिला चीफ ऑफ स्टाफ म्हणून सुझीची नियुक्ती करणे हा एक अविश्वसनीय सन्मान आहे. ती आपल्या देशाला अभिमान वाटेल यात शंका नाही, अशा शब्दात सुझी यांचा गौरव केला आहे. सुझी यांची चीफ ऑफ स्टाफ म्हणून निवड झाल्यावर हे पद म्हणजे काय आणि सुझी यांचीच का निवड झाली याची चर्चा सुरु झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष राहतात त्या निवासस्थानाला व्हाईट हाऊस म्हणतात. (International News)
व्हाईट हाऊसचे नियोजन हा मोठा टास्क आहे. जगभरातील राजकारणाचे व्हाईट हाऊस हे केंद्र आहे, असे बोलले तरी वावगे ठरणार नाही. देशविदेशातील अनेक नेते अमेरिकेच्या दौ-यावर येतात, तेव्हा त्यांचा व्हाईट हाऊस दौराही प्रतिष्ठित मानला जातो. व्हाईट हाऊसमध्ये 132 खोल्या असून प्रत्येक खोलीची सजावट वेगळी आहे. व्हाईट हाऊसजवळ एक अतिथीगृह आहे जे ब्लेअर हाऊस म्हणून ओळखले जाते. ब्लेअर हाऊस व्हाईट हाऊसपेक्षा मोठे आहे. यात 119 खोल्या आहेत. जेव्हा एखादा परदेशी पाहुणे येथे राहतो तेव्हा त्या देशाचा ध्वज येथे फडकवला जातो. या सर्वांचे नियोजन करण्यासाठी मोठ्या स्टाफची गरज असते. या सर्व स्टापची नियुक्ती आणि त्यांच्या कामावर लक्ष ठेवण्याचे काम हे चीफ ऑफ स्टाफ कडे असते. याशिवाय अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या दिनक्रमाचेही नियोजन त्यांच्याकडे असते. यावरुन सुझी विल्स यांच्याकडे किती महत्त्वाचे पद आले आहे, याची कल्पना येते. (Susie Wiles)
======
हे देखील वाचा : अमेरिकेत दिवाळीनंतर कोण साजरी करणार दिवाळी !
====
डोनाल्ड ट्रम्प यांची प्रचार मोहीम सुरु झाली, तेव्हापासून सुझी विल्स या चर्चेत आल्या होत्या. सुझी विल्स यांनी 1970 च्या दशकात न्यूयॉर्क रिपब्लिकन जॅक केम्पच्या वॉशिंग्टन हाऊसमधून राजकीय कारकीर्दीची सुरुवात केली. 1980 च्या दशकात त्या रोनाल्ड रेगनच्या अध्यक्षीय मोहिमेत सामील झाल्या होत्या. नंतर उद्योगपती रिक स्कॉट यांना फ्लोरिडाचे गव्हर्नरपद प्राप्त करण्यासाठी त्यांनी प्रचार मोहीम आखली होती. 2018 मध्ये, फ्लोरिडाच्या गव्हर्नरपदासाठी रॉन डीसँटिस उभे असतांना त्यांच्याही प्रचाराधी धुरा सुझी यांच्याकडेच होती. सुझी या डोनाल्ड ट्रम्प यांच्या जवळच्या सहकारी म्हणून ओळखल्या जातात. डोनाल्ड ट्रम्प यांचा स्वभाव संतापी आहे. शिघ्रकोपी म्हणून ते ओळखले जातात. मात्र सुझी या ट्रम्प यांच्या स्वभावावर नियंत्रण ठेऊ शकतात. सुझी या गुपचूप आपले काम करीत असतात त्या मागे राहून आपले काम करीत असतात. त्यामुळे व्हाईट हाऊसमधील चीफ ऑफ स्टाफ हे पद ट्रम्प यांनी योग्यच व्यक्तिला दिल्याची चर्चा आहे. (International News)
सई बने