Home » वानखेडेवर ‘सूर्य’कुमार तळपला!

वानखेडेवर ‘सूर्य’कुमार तळपला!

by Team Gajawaja
0 comment
Suryakumar Yadav
Share

वानखेडे आणि सूर्यकुमार यादवची (Suryakumar Yadav) फटकेबाजी हे गेल्या काही दिवसांपासून समीकरणच होऊन गेलं आहे. हा संपला रे. थोड्या थोडक्या दिवसांचा याचा फॉर्म होता. तेवढ्यापुरता गाजला, आता काय हा खेळत नसतोय. वगैरे बोलून काही दिवसांपूर्वी ज्या लोकांनी त्याचे वाभाडे काढले होते, तेच लोक आता ‘एकच वादा सूर्या दादा’ म्हणत त्याचं गुणगान गाण्यात रमून गेले आहेत.आयपीएलचे पहिले पर्व काहीशे मनासारखे न गेलेल्या सूर्याने मागच्या काही सामन्यांत धावांचा अक्षरशः पाऊस पाडला आहे. त्याने गुजरातविरुद्ध केलेल्या शतकी कामगिरीमुळे मुंबई इंडियन्स प्ले ऑफ पात्रतेच्या अगदी जवळ जाऊन पोहोचली आहे. मैदानाच्या अगदी चारही बाजूने चेंडूना टोलवत त्याने गुजरातच्या गोलंदाजांना पळता भुई थोडी करून टाकली. त्याच्या फलंदाजीच्या जोरावर आणि गोलंदाजांनी केलेल्या अप्रतिम कामगिरीच्या बळावर मुंबईला गुजरातविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवता आला.(Suryakumar Yadav)

कालच्या सामन्यासाठी मैदानात उतरण्याअगोदर मुंबईच्या गोटात अन पोटात बऱ्यापैकी तळमळ अन उलाढाल झाली असेल. कारण त्यांच्यासाठी हा सामना अत्यंत महत्वाचा होता. प्लेऑफमध्ये आपलं स्थान बळकट करण्यासाठी त्यांना हे दोन गुण कुठल्याही परिस्थितीत प्राप्त करणे गरजेचे होते. दुसरीकडे गुजरात मात्र आपलं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी खेळत होता. त्यांना या सामन्यातील पराभवापासून एवढं काही नुकसान होणार नव्हतं, परंतु सामन्यातील विजयाने त्यांचा दबदबा अजून बळकट होणार होता. या पार्श्वभूमीवर दोन्ही संघ मैदानावर उतरले.

नाणेफेक जिंकत गुजरातने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. वानखेडेवर लक्षाचा पाठलाग करणाऱ्या संघाचे पारडे कायमचं जड असते. नाणेफेक एका अर्थाने गुजरातला पूरक ठरली होती. मुंबईचे सलामीवीर मात्र जिद्दीने मैदानावर उतरले आणि चांगली फटकेबाजी करत संघाला चांगली सुरुवात करून दिली. परंतु पुन्हा एकदा चांगली सुरुवात करून देखील दोघांनाही मोठी खेळी करता आली नाही. रोहित शर्मा आणि ईशान किशन अनुक्रमे २९ आणि ३१ धावा करून बाद झाले. त्यानंतर आलेल्या सूर्याने जरा जपून खेळायला सुरुवात केली. मागच्या सामन्यात हिरो ठरलेल्या निहाल वढेराला या सामन्यात मात्र लवकरच माघारी परतावे लागले.(Suryakumar Yadav)

यानंतर आलेल्या विष्णू विनोदने सूर्याची साथ द्यायला सुरुवात केली. सांभाळून सुरुवात केलेल्या सूर्याने ३२ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. वानखेडेच्या मैदानावर जर एखाद्या संघाला पहिल्या डावात फलंदाजी करत जिंकायचे असेल, तर त्यांना आपली नौका दोनशे पार घेऊन जाणे अनिवार्यच असते, तरच त्या संघाच्या जिंकण्याच्या शक्यता निर्माण होतात, हे सूर्याला चांगलेच माहिती होते. ३२ चेंडूत अर्धशतक करणाऱ्या सूर्याने आपल्या पन्नाशीनंतर फटकेबाजी करायला सुरुवात केली. गोलंदाजांनी कुठेही चेंडू टाकू द्या तो त्याने भिरकावलाच म्हणून समजा. मैदानाच्या चौफेर बाजूने फटकेबाजी करत सूर्याने अवघ्या ४९ चेंडूत १०३ धावांची नाबाद खेळी केली. आयपीएल करियर मधील हे त्याचे पहिलेवहिले शतक ठरले. त्याच्या या खेळीच्या जोरावर मुंबईने ५ बाद २१८ धावांपर्यंत मजल मारली.(Suryakumar Yadav)

मुंबईने दिलेल्या विशाल लक्षाचा पिच्छा करायला उतरलेल्या गुजरातची सुरुवात मात्र काही चांगली झाली नाही. अवघ्या ७ धावांवर त्यांना त्यांचा पहिला विकेट गमवावा लागला. आकाश मधवालने साहाला पव्हेलीयनचा रस्ता दाखवला. त्यानंतर तर गुजरातच्या फलंदाजीला जणू सुरुंगच लागले. नियमित अंतराने त्यांचे फलंदाज बाद होत राहिले. शुभमन गिल, कर्णधार, हार्दिक पंड्या, अभिनव मनोहर यांना आपली जादू दाखवता आली नाही. राहुल तेवतिया आणि डेव्हिड मिलरने डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्या भागीदारीला वेग येऊ लागताच मुंबईच्या गोलंदाजांनी त्यांची जोडी फोडली.

========

हे देखील वाचा : युजवेंद्र चहल ठरला IPL च्या इतिहासातील बळी मिळवणारा गोलंदाज!

========

त्यानंतर फलंदाजीला आलेल्या राशीद खानने मात्र मुंबईच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेत चौफेर फटकेबाजी करत ३२ चेंडूत तब्बल ७९ धावा ठोकल्या. यात त्याने तब्बल १० षटकार ठोकले आणि संघाला ८ बाद १९१ धावांपर्यंत आणून ठेवले. जो सामना मुंबई सहज ८०-९० धावांच्या फरकाने जिंकेल असे वाटत होते, राशीद खानच्या फटकेबाजीमुळे तो त्यांना फक्त २७ धावांनी जिंकता आला.

मुंबईच्या गोलंदाजांनीदेखील या सामन्यात चांगली कामगिरी केली. आकाश मधवालने ३, पियुष चावला, कुमार कार्तिकेय यांनी प्रत्येकी २ तर जेसन बेहेरनडॉफने १ बळी मिळवत मुंबईच्या विजयाचा मार्ग सुकर केला. गुजरातकडून राशीद खानला ४ तर मोहित शर्माला १ बळी मिळवता आला. शतकीय खेळी करनाऱ्या सुर्यकुमार यादवला सामनावीराचा पुरस्कार देवून गौरविण्यात आले.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.