Home » Suresh Dhas : सुरेश धस मुंडेना सारखं टार्गेट का करत आहेत?

Suresh Dhas : सुरेश धस मुंडेना सारखं टार्गेट का करत आहेत?

by Team Gajawaja
0 comment
Suresh Dhas
Share

राज्यात सध्या एका प्रकरणाची रोजच चर्चा आहे, ते प्रकरण म्हणजे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येचं. या प्रकरणात जवळपास रोजच खुलासे होत आहेत आणि हे खुलासे करण्यात सर्वात पुढे कोण आहे, तर भाजप आमदार सुरेश धस. सुरेश धस वापरत असलेलं आका आणि इतर शब्द आता राज्यभर परिचित झालेत. सुरेश धस (Suresh Dhas) यांनी हे प्रकरण लावून धरल्याने या प्रकरणाची व्याप्ती आत्ता राज्यभर झाली आहे. अगदी मुंबईतही जनक्रोष मोर्चे निघाले. मात्र यामुळे दिवसेंदिवस हे अधिकच अडचणीत येत चालले आहेत ते म्हणजे धनंजय मुंडे (Dhananjay Munde). महत्वाचं म्हणजे धनंजय मुंडे हे भाजपबरोबर सत्तेत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या मंत्रिमंडळात ते मंत्री आहेत. याहीपलीकडे देवेंद्र फडणवीस यांच्याशी धनंजय मुंडे यांचे जवळचे संबंध आहेत, असंही बोललं जातं. मात्र तरीही भाजप आमदार सुरेश धस हे सातत्याने वाल्मिक कराडच्या माध्यमातून धनंजय मुंडे यांच्यावर टीकेची झोड उठवून देत आहेत. त्यामुळे सत्तेत असूनही धस विरुद्ध मुंडे संघर्ष का आहे? धस मुंडेंविरोधात एवढे आक्रमक का झालेत? धस यांना धनंजय मुंडेंच्या विरोधात भाजपचे बळ आहे का? जाणून घेऊ

धस विरोध मुंडे वादात आपल्याला खोलात जाऊन पाहायचं असेल तर सर्वात आधी धस यांची राजकीय कारकीर्द पाहावी लागेल. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील जामगाव येथे सुरेश धस यांचा जन्म झाला. घरात मोठा राजकीय वारसा नसला तरी राजकारण होतं. आपले वडील सातत्याने पराभूतच होत आले होते,’ असं धस अजूनही सांगतात. राजकारणाच्या सुरुवातीच्या काळात सुरेश धस भाजपाचे दिवंगत नेते आणि धनंजय मुंडे यांचे काका गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्याविरोधात असलेल्या गटात सहभागी होते. मात्र लवकरच त्यांनी बाजू बदलली.

१९९७ मध्ये सुरेश धस यांनी पक्षांतर करून गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde)  यांच्याबरोबर संपर्क वाढवला. १९९९ च्या निवडणुकीत ते आष्टी विधानसभा मतदारसंघातून भाजपाच्या तिकिटावर निवडून आले. २००४ मध्ये सुरेश धस (Suresh Dhas) यांनी पुन्हा विधानसभेची निवडणूक जिंकली आणि बीडच्या राजकारणात लोकप्रियता मिळवली. १९९९ मध्ये महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची सत्तास्थापन झाल्यानंतर भाजपाची स्थिती कमकुवत झाली होती. दिग्गज नेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांचा देखील प्रभाव कमी झाला होता.सुरेश धस यांना आता जिल्ह्यात एक नंबर होण्याची संधी खुणावू लागली होती. मग लगेच २००९ च्या विधानसभा निवडणुकीआधी आमदार सुरेश धस यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आष्टी विधानसभा मतदारसंघाची निवडणूक जिंकल्यानंतर त्यांची राज्यमंत्रीपदी वर्णी लागली. आणी धस यांचं राजकीय वजनही वाढलं. मुंडेंएवढ्या ताकदीचा नेता होण्याकडे धस यांची वाटचाल होती. पण याच काळात सुरेश धस आणि धनंजय मुंडे एकमेकांच्या संपर्कात आले. २०१३ मध्ये धनंजय मुंडेही भाजपामधून बाहेर पडले आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. (Political News)

२०१४ मध्ये सुरेश धस यांनी गोपीनाथ मुंडे यांच्याविरोधात लोकसभेची निवडणूक लढवली होती. पण अगदी अटीतटीच्या लढाईत त्यांचा पराभव झाला होता. महत्वाचं म्हणजे या निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्याविरोधात प्रचार केला होता. त्यांनी सुरेश धस यांना निवडून आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले होते. मात्र, लोकसभेची जागा जिंकून बीडवर आपलेच प्रभुत्व असल्याचं गोपीनाथ मुंडे यांनी दाखवून दिलं. पण या पराभवांनंतर धस यांचे ग्रह बदलले. त्यातच पक्षातही धस यांच्यानंतर आलेल्या धनंजय मुंडे यांचं वजन वाढू लागलं. सुरुवातीच्या काळात आमदार सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध होते. त्यातच डिसेंबर २०१४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने धनंजय मुंडे यांची विधान परिषदेच्या विरोधीपक्षनेतेपदी निवड केली. त्यामुळे बीडमधील अनेक जेष्ठ नेत्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. त्यात धस यांचाही समावेश होता. अजून एक गोष्ट म्हणजे २०१४ च्या विधानसभा निवडणुकींचा निकाल लागल्यानंतर काही दिवसांतच गोपीनाथ मुंडे यांचा अकस्मात मृत्यू झाला. अशावेळी गोपीनाथ मुंडे यांची जागा घेण्यासाठी धनंजय मुंडे यांना राष्ट्रवादीतून अजूनच बळ दिलं जात होतं.

Suresh Dhas

त्यामुळे मग धस यांनी पुन्हा एकदा भाजपाबरोबर जवळीक वाढण्यास सुरुवात केली. त्यानंतर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाच्या विजयात सुरेश धस यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे २०१७ मध्ये त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमधून काढून टाकण्यात आले. राष्ट्रवादीतून बाहेर पडल्यानंतर सुरेश धस यांनी गोपीनाथ यांच्या कन्या आणि भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्याशी जवळीक वाढवली. यामुळे धनंजय मुंडे यांच्याबरोबर त्यांचे राजकीय वैरअजूनच वाढले. त्यावेळी पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि धनंजय मुंडे हे राजकारणात कट्टर शत्रू होते. २०१८ मध्ये पुन्हा भाजपात सहभागी झाल्यानंतर सुरेश धस यांची विधान परिषदेवर निवड करण्यात आली. धस यांनी पंकजा मुंडे यांच्याबरोबर राजकारण करण्याचा प्रयत्न केला हा पण यात पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना काही यश येत नव्हतं आणि धनंजय मुंडे यांची ताकद वाढतच होती.

याच दरम्यान एक महत्वाची घडामोड घडली. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी हातमिळवणी केली. त्यामुळे मग स्थानिक राजकारणात पुन्हा मुंडें घराण्याचं वर्चस्व आलं आणि धस एकाकी पडले. यामुळेच मग २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपा उमेदवार पंकजा मुंडे यांना पाठिंबा देण्यास जाहीरपणे नकार दिला असा मुंडे समर्थकांचा आरोप आहे. तर धस मात्र, आपण पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचं काम केल्याचं सांगतात. पण दोन्ही भाऊ बहीण एकत्र असतानाही पंकजा मुंडे यांचा पराभव झाला. मग धस यांचा वचपा काढण्यासाठी मुंडेंनी विधानसभा निवडणुकीची वाट पहिली. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने आष्टी मतदारसंघातून सुरेश धस यांना उमेदवारी दिली. मात्र पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी युती धर्म न पाळता धस यांचा पराभव करण्यासाठी अपक्ष उमेदवाराला बळ दिलं. मात्र, तरीही या निवडणुकीत सुरेश धस तब्बल ७७ हजार मताधिक्याने विजयी झाले.

==============

हे देखील वाचा : Jammu And Kashmir : चिनार वृक्षाची माहिती QR कोडद्वारे उपलब्ध होणार !

==============

पण त्याचवेळी महाराष्ट्रात सलग दुसऱ्यांदा सत्तास्थापन झाल्यानंतर महायुतीने धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं. त्यामुळे बीडच्या राजकारणात पुन्हा एकदा बहीण-भावांचा प्रभाव दिसून आला. याचदरम्यान मग धस यांना संधी मिळाली, संतोष देशमुख प्रकरणामुळे, ज्याचा थेट धनंजय मुंडे यांच्याशी संबंध असल्याचा आरोप आहे. वाल्मिक कराडची दहशत, त्याचं गुन्हेगारी नेटवर्क आणि कराडचं धनंजय मुंडे यांच्याशी असलेला थेट संबंध यामुळे मग धनंजय मुंडे हे चांगलेच कात्रीत सापडले आणि सुरेश धस यांनीही मग त्यांचं स्कोअर सेटल करून घेण्यास सुरवात केली. महत्वाची गोष्ट म्हणजे बीडचं पालकमंत्रिपद, धनंजय मुंडे यांना नाहीच पण पंकजा मुंडे यांनाही मिळालेलं नाहीये.

मात्र यामध्ये अजून एक प्रश्न निर्माण होतो, तो म्हणजे यामुळे सरकारमध्ये असलेल्या एका मंत्र्यावर आरोप होत आहे. सरकारची प्रतिमा मालिन होत आहे, तरीही सुरेश धस यांना मोकळीक का दिली जात आहे? तर याचं एक महत्वाचं कारण म्हणजे संतोष देशमुख प्रकरणाने आता जातीय संघर्षाचं रूप घेतलं आहे. मराठा संघटना नेते संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी आक्रमक झाल्या आहेत. त्यातच बीडमध्ये मराठा आंदोलनकर्ते मनोज जरंगे यांचा प्रभाव पाहता त्यांनी हे संपूर्ण प्रकरण एकहाती हातात घेतलं असतं. अशावेळी मग हे टाळण्यासाठी , जरांगे यांच्या एकहाती हे प्रकरण असू नये, यासाठी मग स्वपक्षीय नेत्यालाच या आंदोलनात उतरायला सांगणे एक लॉजिकल चॉईस ठरते. त्यामुळे धस या आंदोलनाचा चेहरा झाले. मात्र, सोबतच धस यांनी आपला पूर्ण रोख सरकारविरुद्ध न ठेवता धनंजय मुंडे यांच्याविरोधात ठेवला आहे. तर थोडक्यात, धस विरुद्ध मुंडे या स्थानिक संघर्षाने आता मोठं रूप घेतलं आहे आणि आता याचा शेवट कसा होतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.