बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवरून रान उठविलेले आणि महाराष्ट्राला ‘आका’ हा शब्द देणारे भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी राजकारणात एक नवीन ट्विस्ट आणला आहे. धनंजय मुंडे यांचा राजकीय बळी घेऊनच थांबणार, असं ज्या धस यांच्याबाबतीत गेल्या काही महिन्यांपासून बोललं जात होतं, तेच धस स्वतः मुंडे यांना जाऊन भेटले. ही भेट साडेचार तास चालली. त्यामुळे दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ चाललेल्या राजकीय झुंजीचा अँटी क्लायमॅक्स आला आहे. गंमत म्हणजे स्वतः धस यांनी भेटीची कबुली दिली असली, तरी मुंडे यांच्या कार्यालयाने अशी भेट झाली नसल्याचा दावा केला आहे. दुसरीकडे, ज्यांच्या मध्यस्थीमुळे ही भेट झाल्याचं सांगितले गेलं, त्या भाजप प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी धस-मुंडे यांच्यात साडेचार तास बैठक झाली, असं म्हटले. त्यामुळे खरोखरच काय चाललंय काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. याबद्दलच जाणून घेऊ.
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची डिसेंबर महिन्यात हत्या झाली. या हत्येचं प्रकरण धस यांनी लावून धरलं होतं. या प्रकरणी मकोकाखाली अटकेत असलेला वाल्मिक कराड याचे धनंजय मुंडे यांच्याशी जवळचे संबंध असल्याचे गंभीर आरोप त्यांनी केले होते. एवढेच नव्हे, तर मुंडे हे कराड याचे आका असल्याचा तसेच ते कराडच्या काळ्या व्यवहारांना राजकीय संरक्षण देत असल्याचा दावा त्यांनी केला होता. धस यांच्या या आग्रहामुळे अंजली दमानिया आणि मनोज जरांगे पाटील यांच्यासारखे कार्यकर्तेही या प्रकरणात बाजू लावून धरत होते.(Political News)
या परिस्थितीत धस आणि मुंडे यांची चार दिवसांपूर्वी मुंबईत गुप्त भेट झाल्याचे उघडकीस आलं आणि राजकारणात खळबळ उडाली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाराजी किंवा संजय राऊत यांची शरद पवार यांच्यावर टीका अशा विषयांवर घोळणारे राजकारण एकदम 180 अंशांनी फिरलं.
बावनकुळेच यांनी सर्वप्रथम हे गुपित फोडलं. मुंडे-धस यांच्यात आपल्या मध्यस्थीने भेट झाली. त्यावेळी साडेचार तास चर्चा झाली. त्यांच्यात मतभेद आहेत, परंतु मनभेद नाहीत, असे ते म्हणाले. बावनकुळे यांच्या स्पष्टोक्तीमुळे धस यांनाही भेटीची कबुली द्यावी लागली. (Suresh Dhas)
धनंजय मुंडे यांच्या डोळ्याचं ऑपरेशन झालं आहे. त्यामुळे दुसऱ्या दिवशी लपूनछपून नव्हे, तर दिवसा मी त्यांच्या निवासस्थानी भेटायला गेलो. तिथे जाऊन प्रकृतीची विचारपूस केली. संतोष देशमुख यांच्यासाठीचा लढा आणि तब्येतीची चौकशी यात कोणताही संबंध नाही. या लढ्यात मी विरोधातच राहणार आहे. पुढच्या काही दिवसांत मी आणखी काही सांगणार आहे, ते तुम्हाला समजेलच. मी मुंडे यांचा राजीनामा अजूनही मागितलेला नाही. त्यांच्याच पक्षाचे लोक राजीनामा मागत आहेत, असं धस म्हणाले. आपण फक्त प्रकृतीची विचारपूस करायला गेलो होतो आणि केवळ अर्धा तास ही भेट झाली, असं त्यांनी सांगितलं.(Suresh Dhas)
हे होत असताना, मुंडे यांच्या कार्यालयाने मात्र अशी कोणतीही बैठक झाल्याचे नाकारले. मात्र, धस यांचा सूर पुन्हा बदलला. मुंडे यांच्यासोबत एक नाही तर दोन बैठका झाल्या. पहिली भेट पंधरा दिवसांपूर्वी झाली होती आणि दुसरी तीन-चार दिवसांपूर्वी मुंडे यांच्या सरकारी निवासस्थानी झाली होती, असं संध्याकाळी माध्यमांशी बोलताना धस म्हणाले. आता प्रश्न असा आहे, की समजा भेट झाली तरी त्यात ही लपवाछपवी कशाला? सौजन्याचीच ही भेट होती तर ती खुलेआम सांगायला काय हरकत होती? (Political News)
===============
हे देखील वाचा : Mahadaji Shinde : पानिपतनंतर १० वर्षात मराठ्यांनी दिल्ली कशी जिंकली ?
===============
या राजकीय पात्रांमध्ये ही देवाणघेवाण होत असताना प्रतिक्रिया यायला सुरूवात झाली. मराठा आरक्षण कार्यकर्ते मनोज जरांगे यांनी धस यांच्यावर कठोर टीका केली. देशमुख यांच्या हत्येने राज्याची बदनामी झाली आहे. राज्यात अशी क्रूरता कधीच पाहिली गेली नव्हती. धस या प्रकरणात न्याय देतील, अशी मला अपेक्षा होती. इतक्या लवकर विश्वासघात होईल अशी मला अपेक्षा नव्हती, असे ते म्हणाले. धस यांनी मराठा कार्यकर्त्यांचा गळा कापला, असेही ते म्हणाले. तर हे अतिशय गंभीर असल्याचे दमानिया म्हणाल्या. (Suresh Dhas)
हे नेते काहीही म्हणत असले तरी, मुंडे यांचा राजीनामा इतक्यात येण्याची शक्यता नाही, हे नक्की झाले आहे. कारण या भेटीचे चर्चा सुरू असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंडे यांना पक्षाच्या कोअर समितीमध्ये स्थान देण्याची घोषणा केली. याचाच अर्थ मुंडे यांना एक प्रकारे अभय देण्यात आले आहे. थोडक्यात म्हणजे दोन-अडीच महिने सुरू असलेल्या एका राजकीय थरारपटाचा अनपेक्षित शेवट झाला आहे. असं म्हणायला काही हरकत नाही..