बिग बॉस मराठीचा दणक्यात फिनाले संपन्न झाला. मागील ७० दिवसांपासून सतत मराठी बॉसचे किस्से आणि घडामोडी यांबद्दल चर्चा होत असतानाच नक्की या पर्वाचा विजेता कोण असेल, असा प्रश्न देखील पडत होता. अखेर बारामतीच्या सुरज चव्हाणने बिग बॉस ५ ची ट्रॉफी आपल्या नावे केली. अनेक दिग्गज, नावाजलेल्या आणि बड्या कलाकारांना मागे टाकत रिल्सस्टार सुरज चव्हाण बिग बॉस सीझन पाचचा विजेता ठरला आहे.
‘बिग बॉस मराठी’चे पाचवे पर्व २८ जुलैपासून प्रेक्षकांच्या भेटीला आले. दरवर्षी हा शो शंभर दिवसांचा असतो मात्र अवघ्या ७० दिवसांमध्ये यंदा पाचव्या पर्वाचा महाविजेता घोषित केला. यंदाच्या सीझनमध्ये कलाकार, सोशल मीडिया स्टार अशा एकूण १६ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या १६ जणांपैकी प्रेक्षकांच्या मतांच्या जोरावर फक्त सहा जणं घरात शेवटपर्यंत टिकले होते.
अभिजीत सावंत, सुरज चव्हाण, निक्की तांबोळी, अंकिता प्रभू वालावलकर, धनंजय पोवार आणि जान्हवी किल्लेकर हे सहा सदस्य ग्रँड फिनालेमध्ये पोहचले होते. यातच जान्हवी किल्लेकर, अंकिता वालावलकर, धनंजय पोवार आणि निक्की तांबोळी हे चार सदस्य खेळातून बाहेर पडले. सुरज चव्हाण आणि अभिजीत सावंत यांच्यामध्ये अंतिम सामना रंगला. आणि शेवटी रितेश देशमुखने सूरज चव्हाण यंदाचा विजेता असल्याचे घोषित केले.
सुरज चव्हाण अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून सुरजने बिग बॉसच्या विजेत्यापर्यंत मजल मारली. सुरजने मोठ्या कष्टाने स्वतःचे अस्तिस्त्व निर्माण केले आहे. टिकटॉकवर व्हिडिओ बनवून सुरज तुफान प्रसिद्ध झाला. अतिशय छोट्या खेड्यातून येणाऱ्या सुरजने आपल्या प्रतिभेच्या आणि हुशारीच्या जोरावर एवढा मोठा शो जिंकला. जाणून घेऊया सुरजच्या खडतर प्रवासाबद्दल जाणून घेऊया.
सूरज चव्हाण मूळचा बारामतीचा आहे. १९९२ साली सुरजचा पुण्यातील बारामतीमधील मोढवे या छोट्या गावात जन्म झाला. त्याचा जन्म अतिशय गरीब कुटुंबात झाला होता. लहानपणीच त्याच्या वडिलांचे कॅन्सरमुळे निधन झाले. त्यानंतर आईचे देखील आजारपणामुळे निधन झाले. पुढे त्यामुळे मोठ्या बहिणीने सुरजचा सांभाळ केला. सुरज ३०० रुपये रोजावर मजुरी करायचा. कामामुळे त्याचे शिक्षणाकडे दुर्लक्ष झाले.
त्याला मधेच आपल्या बहिणीच्या मुलाकडून टिकटॉकवर व्हिडिओ बनवण्याचे समजले. मग त्याने कोणाकडून मोबाइल घेऊन एक व्हिडिओ तयार केला, आणि पहिलाच त्याचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला. त्यानंतर त्याने मजुरीच्या पैशांमधून मोबाइल घेतला. पुढे तो व्हिडिओ बनून ते टिकटॉकवर टाकू लागला. त्यातून तो चान्गला प्रसिद्ध होत असताना मधेच भारतामध्ये टिकटॉक बॅन झाले. मात्र त्याने हार मारली नाही. तो इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर व्हिडिओ बनवून टाकू लागला. पुढे इन्स्टाग्रामवरील रील्समुळे सूरज प्रसिद्धीझोतात आला.
सुरुवातीच्या काळात सूरज दिवसाला ८० हजार रुपये कमवायचा. मात्र अनेक लोकांनी त्याची फसवणूक केली. त्याच्या घरात आत्या आणि पाच सख्ख्या बहिणी आहेत. हळहळू त्याने या सगळ्यातून मार्ग काढत यशाचा हा टप्पा गाठला आहे. आज सुरज त्याच्या हलक्या स्टाइलमुळे आणि शब्दांमुळे सोशल मीडियावर खूपच प्रसिद्ध आहे.
=======
हे देखील वाचा : रिल्स स्टार सुरज चव्हाण ठरला बिग बॉसचा विजेता
======
जेव्हा सुरुवातील सूरजला ‘बिग बॉस’साठी विचारणा झाली, तेव्हा त्याने नकार दिला होता. मात्र, त्यानंतर टीमने त्याच्याशी संवाद साधला आणि त्याला हा संपूर्ण गेम, याचा फॉरमॅट समजावून सांगितला होता. तेव्हा कुठे सूरज तयार झाला. आधी ट्रेनिंग घेऊन तो या घरात सहभागी झाला होता आणि आज तो विजेता होऊन या घराच्या बाहेर आला आहे.
सुरजने हा शो जिंकल्यानंतर त्याच्यावर बक्षिसांचा वर्षाव होत आहे. शो जिंकल्यानंतर त्याला पहिल्या क्रमांकाचे बक्षीस म्हणून 14 लाख रुपयांचा चेक देण्यात आला. त्यानंतर या कार्यक्रमाचे स्पॉन्सर पु. ना. गाडगीळ यांच्याकडून सूरज चव्हाणला 10 लाख रुपये जाहीर करण्यात आले. तसेच त्याला एक इलेक्ट्रिक बाईकही बक्षीस म्हणून देण्यात आली आहे. याशिवाय कलर्स मराठीचे हेड आणि दिग्दर्शक केदार शिंदे यांनी सूरज चव्हाणला घेऊन एक चित्रपट करणार असल्याची घोषणाही केली.