यंदा २०२२ सालात अनेक सिक्वल आणि रिमेक असणारे सिनेमे प्रदर्शित होणार आहे. या सिक्वल चित्रपटांच्या गर्दीत सर्वात जास्त लाईमलाइट मिळवणारा आणि बहुप्रतिक्षित सिनेमांच्या गर्दीत टॉपवर असणारा सिनेमा म्हणजे ‘गदर २’ (Gadar 2). सनी देओल आणि अमिषा पटेल अभिनित २००१ साली आलेल्या सुपरहिट अशा ‘गदर’ सिनेमाचा हा ‘गदर २’ सिक्वल असणार आहे. २००१ साली आलेला गदर सिनेमा कोणाला माहित नसेल असा व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. या सिनेमात असलेले दमदार संवाद, कलाकारांचा प्रभावी अभिनय, ओठांवर रेंगाळणारी गाणी, उत्तम कथा आदी अनेक जमेच्या बाजू असणारा हा सिनेमा तुफान लोकप्रिय झाला. आता याच सिनेमाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
‘गदर २’ (Gadar 2) सिनेमाची शूटिंग मागील बरीच महिन्यांपासून सुरू असून, नुकतेच या सिनेमाच्या टीमने उत्तरप्रदेश आणि लखनऊमधील शूटिंग शेड्यूल पूर्ण केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार या सिनेमाची जवळपास ८० टक्के शूटिंग पूर्ण झाली असून, आता उर्वरित शूटिंग जूनमध्ये केली जाणार आहे. या सिनेमाचे शूटिंग बाराबंकी शहरातील जिल्हा कारागृहात झाले आहे. या सीनला शूट करण्यासाठी सिनेमाचे दिग्दर्शक अनिल शर्मा आणि त्यांच्या टीमने सरकारची योग्य ती परवानगी घेतली होती. उत्तरप्रदेशमध्ये १६ एप्रिलपासून चित्रपटाची शूटिंग होणार होती, मात्र काही कारणास्तव सिनेमाची टीम त्यावेळेत पोहोचली नसल्याने ही शूटिंग २० एप्रिलपासून सुरू झाली आणि आता संपली देखील.
काही दिवसांपूर्वी सनी देओलने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून त्याचा तारा सिंगच्या लूकमधला एक फोटो शेअर केला आणि लिहिले की, “फक्त काहीच लोकं नशीबवान असतात ज्यांना अद्भुत अशा भूमिकांना पुन्हा त्यांच्या आयुष्यात जगण्याची संधी मिळते. २० वर्षांनंतर सादर आहे तारा सिंग. ‘गदर २’ (Gadar 2) सिनेमाचे पहिले शेड्यूल पूर्ण झाल्यानंतर खूपच छान वाटत आहे.”
अमिषा पटेलने देखील या सिनेमाची अधिकृत घोषणा झाल्यानंतर सेटवरील काही फोटो शेअर केले होते. या फोटोंमध्ये सनी देओल डोक्याला पगडी बांधून तारा सिंगच्या रूपात दिसला तर अमिषा देखील सलवार सूट घालून सकीनाच्या लूकमध्ये दिसली. याशिवाय तिने सिनेमाच्या टीमसोबत अजून अनेक फोटो शेअर केले होते. (Gadar 2)
अनिल शर्मा दिग्दर्शित आणि निर्मित ‘गदर २’ (Gadar 2) हा सिनेमा याचवर्षाच्या अखेरीस चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. ‘गदर’ सिनेमाला प्रेक्षकांनी दिलेला दमदार प्रतिसाद आता ‘गदर २’ला देखील मिळणार की नाही हे तर चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच समजेल.