भारताच्या स्वातंत्रलढ्यात अनेक शुरविरांनी आपल्या जीवाची आहूती दिली आहे. या सर्वांच्या योगदानामुळेच भारताला स्वातंत्र्याचा सूर्य पाहता आला. स्वतंत्र भारताचे विभाजन होऊन पाकिस्तान या देशाची निर्मिती झाली. आता काळाच्या ओघात या दोन्ही देशांमधील राजकीय संबंध अतिशय तणावाचे आहेत. पाकिस्तानी अतिरेकी कायम काश्मिरमधील शांततेला बाघा आणत असतात. (Sukhdev in Pakistan)
त्यात पाकिस्तानी राजकारणी त्यांच्या भारतासंदर्भातील वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असतात. असे एक वातावरण असले तरी पाकिस्तानमध्ये भारतीय स्वातंत्र्य युद्धातील लढवय्यांना आजही आदरांजली अर्पण केली जाते. फक्त त्यांची एकाच दिवशी आठवण काढण्यात येते, असेही नाही. तर पाकिस्तानमध्ये या हुतात्मांच्या नावानं रस्ता असून आता पाकिस्तानच्या शालेय अभ्यासक्रमातही या हुतात्म्यांचे योगदान सांगणारा धडा घेण्यात येणार आहे. हे आहेत, हुतात्मा सुखदेव.
वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी सुखदेव यांना ब्रिटीश सरकारनं फासावर लटकवलं. भारताच्या स्वातंत्र्य युद्धात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या या हुतात्मा सुखदेव यांना दरवर्षी पाकिस्तानमध्ये श्रद्धांजली अर्पण केली जातेच. शिवाय त्यांना राष्ट्रीय नायकाचा दर्जा देण्याची सरकारकडे मागणीही करण्यात येत आहे. (Sukhdev in Pakistan)
भगतसिंग मेमोरियल फाउंडेशनशी संबंधित वकील दरवर्षी हुतात्मा सुखदेव यांची जयंती साजरी करतात. लाहोर उच्च न्यायालयाच्या आवारात हा कार्यक्रम होतो. यासाठी मोठ्या संख्येनं वकील आणि नागरिक उपस्थित असतात. स्वातंत्र्य सैनिक सुखदेव यांच्या नावाचा जयजयकार करुन ही मंडळी केकही कापतात. हा उपक्रम गेली अनेक वर्ष सुरु आहे.
यावर्षी स्वातंत्र्यसैनिक सुखदेव यांची ११७ वी जयंती साजरी झाली. या महान स्वातंत्र्यसैनिकाचे भारताच्या स्वातंत्र लढ्यातील योगदान मोठे होते. त्यामुळेच त्यांचा आदर ठेवत सुखदेव यांना राष्ट्रीय वीर म्हणून दर्जा देण्याची मागणी यावेळी पाकिस्तान सरकारकडे करण्यात आली आहे. याशिवाय लाहोरमधील रस्त्याला सुखदेव यांचे नाव देण्याची मागणी करणारा ठरावही संमत करण्यात आला आहे. तसेच शालेय अभ्यासक्रमात सुखदेव यांच्या साहसाची कथा सांगणारा धडा समाविष्ट करावा, त्यांच्या नावाने विशेष टपाल तिकीट किंवा नाणे काढण्यात यावे, अशी मागणीही वकीलांतर्फे पाकिस्तानी सरकारतर्फे करण्यात आली आहे. (Sukhdev in Pakistan)
या भगतसिंग मेमोरियल फाउंडेशनचे अध्यक्ष इम्तियाज रशीद कुरेशी यांनी हुतात्मा सुखदेव हे पाकिस्तानचेही असल्याचे सांगितले आहे. त्यांचे स्वातंत्र लढ्यात योगदान महान होते. त्याची आठवण नवीन पिढीला कायम रहावी म्हणून आम्ही प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
सुखदेव यांचा जन्म १५ मे १९०७ रोजी लुधियाना, पंजाब येथे झाला. २३ मार्च १९३१ रोजी लाहोरमध्ये राजगुरू आणि सुखदेव यांच्यासह भगतसिंग यांना ब्रिटीश सरकारने शासनाविरुद्ध कट रचल्याच्या आरोपाखाली फाशी दिली. वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी देशासाठी आपल्या जीवाचे बलिदान दिलेल्या या वीराच्या आठवणी आजही पाकिस्ताननं जपल्या आहेत. पाकिस्तानचे कायदे आझम म्हणून ओळखले जाणारे मोहम्मद अली जिना यांनीही भगतसिंग यांच्या शौर्याचे कौतुक करून त्यांना श्रद्धांजली वाहिली होती.
===============
हे देखील वाचा : इराणमधील चाबहार बंदर सध्या चर्चेत
===============
सुखदेव हे लहानपणीच स्वातंत्रलढ्यात ओढले गेले. भगतसिंग आणि राजगुरू यांच्याबरोबर त्यांनी कार्य केले. ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी लाला लजपतराय यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी हे तीन तरुण पेटून उठले होते. अटक झाल्यावर भगतसिंग यांच्याबरोबर सुखदेव यांनीही तुरुंगात कैद्यांना होणाऱ्या अमानुष वागणुकीच्या निषेधार्थ संप केला. त्यांच्या फाशीच्या विरोधात मोठे आंदोलन सुरु होते. (Sukhdev in Pakistan)
त्यामुळे नियोजित तारीख आणि वेळेपूर्वी, २३ मार्च १९३१ रोजी संध्याकाळी ७ वाजता सुखदेव, राजगुरू आणि भगतसिंग यांना लाहोर सेंट्रल जेलमध्ये फाशी देण्यात आली. यावेळी या जेलपुढे हजारोंचा जनसमुदाय होता. त्यामुळे ब्रिटीश अधिका-यांनी या तीनही शहीदांचे मृतदेह जेलची मागची भिंत फोडून बाहेर काढले. सुखदेव यांना फाशी झाली, तेव्हा त्यांचे वय अवघे २३ वर्षाचे होते. त्यांचे हे योगदान पाकिस्तानमध्ये आजही पुजले जाते हे विशेष.
भारतात एकीकडे वीर सावरकर यांच्या देशभक्तीविषयी शंका निर्माण करुन त्यांच्याबद्दल अपशब्दांचा वापर करण्यात येतो. पण त्याचवेळी पाकिस्तानसारख्या देशात आपल्या देशासाठी प्राणांची आहुती देणा-या हुतात्मांचा आजही सन्मान करण्यात येत आहे.
सई बने