राजकारणात कधी काय होईल याचा अंदाज बांधणं तसं कठीणच झालं आहे. राज्यात सध्या अशीच काहीशी परिस्थिती पाहायला मिळत आहे. डिसेंबर २०२३ मध्ये भाजपाने शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नाशिक शहरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यावर दाऊद इब्राहिमच्या टोळीशी कथित संबंध असल्याचे आरोप केले होते. मात्र, काही दिवसांपूर्वीच बडगुजर यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. अर्थातच या भेटीगाठी होत्या त्या बडगुजरांच्या पक्षप्रवेशासंदर्भातल्या. (Sudhakar Badgujar)
आणि तसं झालंही…कारण १७ जून २०२५ रोजी आपल्या हजारो कार्यकर्त्यांना घेऊन नाशिकवरुन बडगुजर मुंबईला आले खरे. मात्र त्याचवेळी भाजपातल्या विसंवादाचं कधी न दिसणारे चित्र अवघ्या महाराष्ट्राने पाहिले. बडगुजर भाजपमध्ये पक्षप्रवेश करण्यासाठी येणार असल्याची बाब प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंना माहिती नसल्याचं समोर आलं. पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाला माहिती आणि संमती नसताना सुधाकर बडगुजर यांचा पक्षप्रवेश कसा होणार, असा सवाल त्यामुळे विचारला गेला…एवढंच काय बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबाबत प्रदेशाध्यक्षच काय कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाणही अनभिज्ञ असल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले गेले. या विसंवादाला तशी अनेक कारणेही आहेत. म्हणजे तशी कुजबूज राजकीय वर्तुळात ऐकू येत आहे.(Political News)
बावनकुळे-बडगुजरांचा ३६ चा आकडा?
त्याचं झालं असं की, काही महिन्यांपूर्वी संजय राऊत यांनी बावनकुळे यांचे मकाऊच्या कॅसिनोमधील फोटो सोशल मीडियावर पोस्ट झाल्याचं तुम्हाला आठवत असेल, राऊत यांच्या आरोपांचं बावनकुळे यांनी त्याचवेळी खंडन करत फोटोचा वापर करून संभ्रम निर्माण केला जात असल्याचा प्रतिहल्ला केला होता. सुधाकर बडगुजर यांच्याच माध्यमातून फोटो राऊत यांच्यापर्यंत पोहचल्याची कुजबूज राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे बडगुजरांच्या पक्षप्रवेशावेळी झालेल्या सावळ्यागोंधळाला या पार्श्वभुमीचीही किनार असल्याचं बोलले जाते.(Sudhakar Badgujar)
दुसरीकडे, नाशिकच्या भाजपावर मंत्री गिरीश महाजन यांचा कंट्रोल आहे. त्यामुळे गिरीश महाजन यांच्यां पुढाकाराने बडगुजर यांचा प्रवेश झाल्याचं साहाजिक आहे. नाशिक महापालिका निवडणुकीची सर्व जबाबदारी गिरीश महाजन यांच्यावरच असणार आहे. त्यामुळे त्यांना जे हवं आहे, त्यांना प्रवेश दिला जात असल्याची कुजबूज सुरु आहे..मात्र यामुळे दोन बड्या नेत्यांमध्ये कोल्डवॉर सुरु आहे का? अशी शंका यायला वाव आहे. अर्थात बड्या मंत्र्यांच्या या ‘कोल्डवॉर’ मध्ये स्थानिक पातळीवर कोणी समोर येऊन बोलण्याची हिम्मतही करणार नाही.. प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंच्या पाठोपाठ कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनीही बडगुजर यांच्या प्रवेशाबाबत फारशी प्रतिक्रिया दिली नाही. मात्र सलीम कुत्ता प्रकरणी आरोपाची राळ उठविणाऱ्या मंत्री नितेश राणे यांची बडगुजर यांच्याबाबतची भूमिका आता बदलली आहे हे नवल.(Political News)
==================
हे देखील वाचा : Monsoon : महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना IMD चा रेड अलर्ट
==================
अनेक अडचणींचा सामना केल्यानंतर बडगुजर यांचा भाजप प्रवेश झाला आहे. हा प्रवेश सोहळा काही क्षणांचा असला तरी ज्यांनी आज बडगुजर यांना विरोध केलाय, वरिष्ठांच्या दबावामुळे जे बोलत नाहीये, त्यांना सोबत घेऊनच बडगुजर यांना पुढील वाटचाल करावी लागणार आहे. त्यामुळे बडगुजर यांचा खरा कसोटीचा काळ आजपासून सुरू झालाय..एवढं नक्की…(Political News Update)
एवढी सगळी निगेटीव्ह कारणं असतानाही भाजपाला बडगुजर का हवेहवेसे आहेत तेही पाहूया…भाजपाने आपले संपूर्ण लक्ष सध्या महापालिका निवडणुकांवर केंद्रित केलं आहे. नाशिक महापालिकेवर पुन्हा पक्षाचा झेंडा फडकविण्याचे भाजपाचे प्रयत्न आहेत. २०१७ मध्ये भाजपाने दमदार कामगिरी केली आणि नाशिक महापालिकेवर सत्ता मिळवली होती. सुधाकर बडगुजर हे राज्यस्तरावरील मोठ्या नेत्यांमध्ये गणले जात नसले तरी ते नाशिकच्या स्थानिक राजकारणात चाणाक्ष आणि प्रभावशाली नेता मानले जातात. त्यांचे आर्थिक बळ आणि स्थानिक राजकीय यंत्रणेवर असलेली मजबूत पकड ही भाजपासाठी फायदेशीर ठरू शकते. त्यामुळे नाराजी सुरांना डावलून बेरजेच्या राजकारणासाठी भाजपानं सुधाकर बडगुजरांसह त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांना पंखाखाली घेतलं आहे. आता आगामी महापालिका निवडणुकांत सुधाकर बडगुजर करिष्मा करणार का आणि भाजपाला अपेक्षित यश मिळवून देत उबाठासह महाविकास आघाडीची कोंडी करणार का हेच पाहायचं…