नेपाळमधील ओली सरकारनं सोशल मिडियावर घातलेली बंदी मागे घेतली असली तरी सरकारविरोधात एकत्र आलेल्या विद्यार्थ्यांचा संताप कमी होतांना दिसत नाही. या आंदोलनात 19 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे, यातील बहुतेकांच्या थेट छातीत आणि मस्तकावर गोळ्या झाडण्यात आल्या. त्यामुळे आणखी चिडलेल्या विद्यार्थ्यांनी केपी शर्मा ओली सरकारने राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. हे आंदोलन आता एवढे चिघळले आहे की, काठमांडूच्या रस्त्यावर आंदोलकांचे राज्य आहे. पोलीस आणि सैन्य हतबल झाले आहे. नेपाळी तरुणांनी भक्तपूरमधील बालकोट येथील पंतप्रधान ओली यांचे निवासस्थान जाळले आहे. (Trending News)
आंदोलनामुळे उपपंतप्रधानांसह दहा मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. मात्र आंदोलक पाच मागण्यांवर ठाम आहेत. त्यातच आंदोलन हिंसक झाल्यानं केपी ओली आणि अन्य मंत्री एका हेलिकॉप्टरमधून दुबईला पळून गेल्याचे वृत्त आहे. नेपाळी माध्यमांनी हा दावा केला असून ओली यांचे हेलिकॉप्टर दुबईच्या वाटेवर असल्याचे सांगितले आहे. दरम्यान सोशल मिडियावरील बंदी आणि नेपाळमधील भ्रष्ट्राचाराविरोधात एक झालेल्या नेपाळी तरुणांमागे एका 36 वर्षीय तरुणाचे नाव पुढे येत आहे. सुदान गुरुंग या तरुणानं या आंदोलनासाठी तरुणांना एकत्र केल्याची माहिती आहे. नेपाळमध्ये तरुणांना स्वयंरोजगार मिळवून देणारे सुदान यांनी आपल्या लहान मुलीला भूकंपात गमावले. तेव्हापासून त्यांनी नेपाळी जनतेसाठी आपले जीवन समर्पित केले. नेपाळमध्ये भ्रष्ट्राचारमुक्त सरकार येण्यासाठी या सुदान गुरुंगने यापूर्वीही आंदोलन केले आहे. मात्र आता त्याच्या या आंदोलनाला व्यापक स्वरुप आले असून नेपाळमध्ये सत्तातर होण्याची शक्यता आहे. (KP Sharma Oli)
नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये तरुणांनी सुरु केलेल्या आंदोलनाला दडपण्यासाठी पोलीस बळाचा वापर करण्यात आला. यात 19 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आणि अनेक जखमी झाले. ज्यांचा मृत्यू झाला, त्या विद्यार्थ्यांच्या छातीत गोळ्या झाडण्यात आल्या होत्या, तसेच जखमी विद्यार्थ्यांनाही मारहाण झाली. त्यामुळे हे आंदोलन दुस-या दिवशीही चालू रहाणार अशी अटकळ होती. ही अटकळ खरी ठरली असून आता आंदोलन अधिक हिंसक झाले आहे. पोलीस आणि सैन्य दलाचे जवान हतबलपणे आंदोलकांनी केलेली जाळपोळ बघत असतांनाचे चित्र अनेक शहरांमध्ये आहे. सोशल मिडियावरील बंदी आता उठवण्यात आली असली तरी आंदोलक त्यांच्या मागण्यांबाबत ठाम आहेत. त्यातील मुख्य मागणी म्हणजे, ओली यांचा राजीनामा.
ओली हे कामय चीनच्या बाजुने निर्णय घेतात, असा आरोप आहे. नेपाळमध्ये 26 सोशल माध्यमांवर बंदी घातली तरी चीनच्या टीकटॉकवर बंदी नव्हती. त्यामुळे तरुणांमध्ये रोष वाढला आणि आंदोलन चिघळले. आता आंदोलन हाताबाहेर गेल्यामुळे पंतप्रधान केपी ओली यांनी एका हेलिकॉप्टरमधून उड्डान केल्याचे वृत्त नेपाळची स्थानिक माध्यमे देत आहेत. त्यांच्यासोबत 7 मंत्री आहेत. आंदोलकांनी आता राष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या खाजगी निवासस्थानाला आग लावली आहे. ओली यांच्या राजीनाम्याची मागणी करत निदर्शकांनी त्यांचे निवासस्थान जाळले आहे. बालाकोट येथील या निवासस्थानामधील वस्तू बाहेर काढून घराला आग लावण्यात आली आहे. आग पसरताच निवासस्थानातून धुराचे लोट उठताना दिसले. त्याच वेळी, देशाचे ऊर्जामंत्री आणि राष्ट्रपती यांचे घर देखील निदर्शकांनी जाळून टाकले आहे. शिवाय राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांचे निवासस्थानही पूर्णपणे जाळून टाकले आहे. या सर्वांमुळेच केपी ओली यांनी नेपाळ सोडल्याची माहिती आहे. (KP Sharma Oli)
4 सप्टेंबरपासून नेपाळमध्ये फेसबुक, यूट्यूब आणि एक्स यासह 26 सोशल मीडिया साइट्स ब्लॉक करण्यात आल्या होत्या. त्यामुळे तेथील तरुणांमध्ये संताप पसरला. या निर्णयाच्या विरोधात आणि व्यापक भ्रष्टाचार, बेरोजगारी आणि महागाईविरोधात एकत्र आलेल्या तरुणांनी सेलिब्रिटी आणि मानवाधिकार संघटनांचाही पाठिंबा मिळाला. त्यामुळे हे आंदोलन व्यापक झाले. सध्या राजधानी काठमांडूपासून ते इतर प्रमुख शहरांपर्यंत परिस्थिती तणावपूर्ण असून अनेक भागात कर्फ्यू आहे. 18 ते 28 वयोगटातील जनरल-झेड पिढीचे आहेत. मुख्य गोष्ट म्हणजे, फक्त सरकारच्या मंत्र्यानाच नाही तर विरोधी पक्षालाही येथे विरोध करण्यात येत आहे. त्यात राष्ट्रपती पौडेल, पंतप्रधान केपी ओली, माजी पंतप्रधान पुष्पकमल दहल प्रचंड, माजी पंतप्रधान शेर बहादूर देऊबा यांच्या घरांना जाळण्यात आले आहे. (Trending News)
================
हे देखील वाचा : सोशल मिडिया अभावी संतप्त झालेल्या नेपाळच्या Gen Z ची क्रांती
================
नेपाळच्या या आंदोलनामागे हमी नेपाळ नावाच्या संघटनेचे नाव पुढे येत आहे. या संघटनेचे प्रमुख 36 वर्षीय सुदान गुरुंग हे नेपाळच्या जनरेशन झेडसाठी बदलाचे एक नवीन प्रतीक मानले जातात. गुरुंग यांची चळवळ पूर्णपणे डिजिटल साधनांवर आधारित आहे. त्यांनीच विद्यार्थ्यांना शालेय गणवेश आणि पुस्तके घालून निषेधात सामील होण्याचे आवाहन केले. ही शैली तरुणांना खूप आवडली आणि चळवळीला एक नवीन रंग मिळाला. असे असले तरी, यापूर्वी सुदान यांनी केलेले सामाजिक उपक्रम या आंदोलनाला फायदेशीर ठरले. (Trending News)
नेपाळमध्ये 2015 मध्ये आलेल्या विनाशकारी भूकंपानंतर, त्यांनी मदत साहित्य पोहोचवण्यापासून ते पूर, भूस्खलन आणि साथीच्या आजारांपर्यंत प्रत्येक आपत्तीत काम केले आहे. त्यांच्या हमी नेपाळ या संस्थेने आतापर्यंत हजारो कुटुंबांना अन्न, कपडे आणि औषधे दिली आहेत. लोकांसाठी, लोकांद्वारे हा त्यांचा मंत्र आहे. त्यामुळेच सुदान गुरुंग आज नेपाळच्या तरुणाईचा सर्वात विश्वासार्ह चेहरा झाले आहेत. त्यांची चळवळ केवळ तरुणांपुरती मर्यादित नाही. तर काठमांडूपासून पोखरा, बुटवल, विराटनगर आणि दमकपर्यंत, सर्व स्तरातील नेपाळी नागरिक सुदान यांच्या पाठिशी उभे आहेत. सुदान यांच्या संस्थेने केलेले लोकउपयोगी उपक्रम पाहता, एक संस्था असे काम करु शकते, तर सरकार का करु शकत नाही, असा प्रश्न विचारण्यात येत होता. आता त्याच सुदान यांनी अवघ्या ओली सरकारलाच मोठा हादरा दिला आहे. जर नेपाळमध्ये सत्तांतर झाले तर भावी सरकार स्थापण्यामध्ये या सुदान गुरुंग यांचे नाव प्रमुख असणार आहे.
सई बने
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics