Home » शब्बास रे पठ्ठ्या! शिक्षण अर्धवट सोडून व्यवसायाला सुरुवात केली, आता कमावतोय वर्षाला कोटी रुपये

शब्बास रे पठ्ठ्या! शिक्षण अर्धवट सोडून व्यवसायाला सुरुवात केली, आता कमावतोय वर्षाला कोटी रुपये

by Correspondent
0 comment
Aniket Khalkar | K Facts
Share

सध्या प्रत्येकालाच स्वतःच्या पायावरती उभे राहून व्यवसायिक बनावे असे वाटत असते. बरेचजण तशी पावले टाकत व्यवसायात उतरतात. मात्र यशस्वी होणं दूर पण कित्येकजण व्यवसायात टिकत सुद्धा नाहीत.

पहिल्याच फटक्यात आलेल्या अपयशामुळे अनेक जण व्यवसायातून काढता पाय घेतात. आणि परमनंट नोकरीच्या शोधामध्ये इकडे-तिकडे भटकू लागतात. तर काही अवलिया व्यवसायात तोटा आला तरी खचून न जाता निवडलेल्या क्षेत्रात आपला व्यवसाय कसा वाढवता येईल हे पाहतात.

आपल्या व्यवसायावर संपूर्ण लक्ष केंद्रित करून, आपल्या जिद्द व चिकाटीच्या जोरावर व्यवसाय पुढे कसा घेऊन जाता येईल याचा अभ्यासपूर्ण विचार करतात. अशाच व्यक्तींना पुढे व्यवसायात यश येते आणि पुढे हीच व्यक्ती आयुष्यात यशस्वी होते.

आज आपण अशाच एका वयाच्या अठराव्या वर्षी व्यवसायिक बनलेल्या आणि वर्षाला तीन कोटी रुपयांची उलाढाल करणाऱ्या व्यवसायकाची गोष्ट पाहणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात पुण्यातल्या अनिकेत खालकर (Aniket khalkar) या तरुण व्यवसायिकाची गोष्ट.

अनिकेत खालकर हा पुणे जिल्ह्यातील आंबेगाव येथे राहतो. त्याने सिव्हिल इंजिनिअरिंगचे प्रथम वर्षापर्यंत शिक्षण घेतले आहे. ज्यावेळी अनिकेत सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होता तेव्हा त्याला समजले की, सरकारी कामे करायच्या एकाच परवान्यावर अनेक ठेकेदार काम करतात. त्यामुळे त्याला इंजिनिअरिंगला प्रवेश घेतल्याचा आपला निर्णय चुकला की काय असे वाटले.

त्यानंतर इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षातच त्याने शिक्षणाला राम राम ठोकला. आणि स्वतःचा व्यवसाय उभारण्याचा निर्णय घेतला. पण सर्वात एक महत्वाची गोष्ट म्हणजे अनिकेतने शेतीला पूरक असा व्यवसाय उभरायचं ठरवले होते.

त्यामुळे त्यांनी आजूबाजूच्या परिसराचा अभ्यास करून, ऊसाचे गुऱ्हाळ सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्याला मुजफ्फरनगरला जाऊन एक महिना राहून प्रशिक्षण घ्यावे लागले होते. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर अनिकेतने व्यवसायाला सुरुवात केली. त्याने त्याच्या गुळाच्या गुऱ्हाळला गौरी कंपनी असे नाव दिले.

अनिकेतच्या कंपनीत फक्त ८६०३२ या ऊसाच्या जातीचाच गुळ तयार केला जातो. त्यामुळे गुळाची पहिल्यापासून कॉलिटी एक राहिली आहे. त्यामुळे असंख्य ग्राहक अनिकेत खालकरच्या गुळाला पसंती दर्शवतात.

अनिकेतच्या कंपनीचे खास वैशिष्ट्य म्हणजे, अनिकेत ज्या शेतकऱ्यांकडून ऊस खरेदी करतो, त्या शेतकऱ्यांना तो पंधरा दिवसाच्या आत पेमेंट करतो. त्यामुळे अनिकेतने शेतकरी वर्गाचाही विश्वास जिंकला आहे. सध्या त्याच्या कंपनीत दीडशे शेतकरी सभासद आहेत.

या व्यवसायात त्याला त्याच्या भावाची साथ चांगलीच लाभलेली आहे. त्यामुळे अनिकेत खालकरचा गुळ आता दुबई, अमेरिका, लंडनसह २८ देशांमध्ये निर्यात होत आहे.

मात्र अनिकेत खालकर एकाच व्यवसायावर अवलंबून न राहता, त्याने ड्रिंकिंग वॉटर बॉटलच्या कंपनीची सुरुवात केली आहे. तसेच त्याने गौरी ऑटोमोबाईल नावाने वाहनांचे शोरूमदेखील उघडले आहे.

सध्या अनिकेत खालकरचे वय हे २६ वर्ष असून, त्याची वर्षाची उलाढाल साधारणतः ३ कोटी रुपये आहे. आपल्या जिद्दीच्या आणि हिंमतीच्या जोरावर उभारलेला हा अनिकेतचा व्यवसाय दिवसेंदिवस वाढतच आहे.

– निवास उद्धव गायकवाड


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.