Home » खाशाबा जाधव यांना ऑलिंपिक स्पर्धेला पाठवण्यासाठी त्यांच्या प्राध्यापकांनी चक्क घर गहाण ठेवलं.. 

खाशाबा जाधव यांना ऑलिंपिक स्पर्धेला पाठवण्यासाठी त्यांच्या प्राध्यापकांनी चक्क घर गहाण ठेवलं.. 

by Team Gajawaja
0 comment
Khashaba Jadhav
Share

नुकत्याच कॉमनवेल्थ स्पर्धा संपन्न झाल्या. त्यात भारतीय खेळाडूंनी उज्ज्वल यश संपादन केलं. विशेषतः भारतीय कुस्तीवीरांनी भारताचा तिरंगा मानानं फडकवला. कॉमनवेल्थमधील भारतीय कुस्तीवीरांचे यश बघताना आपल्या महाराष्ट्राच्या मातीतील एका हिऱ्याची वारंवार आठवण झाली ज्यांनी भारताला पहिलं वहिलं ऑलिंपिंक मेडल मिळवून दिलं, तेही कुस्तीमधून….या कुस्तीवीराचं नाव म्हणजे खाशाबा जाधव  (Khashaba Jadhav). 

सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील गोळेश्वर या छोट्याश्या खेड्यात जन्मलेल्या खाशाबानं भारताला पहिलं ऑलिंपिंक मेडल मिळवून दिलं. खाशाबांच्या या पराक्रमानं त्यांचं नाव अवघ्या देशाला माहित झालं.  पण खाशाबांच्या या विजयामागे त्यांची मेहनत आणि जिद्द होती. 

पैलवान खाशाबा जाधव यांचा जन्म 15 जानेवारी 1926 रोजी सातारा जिल्ह्याच्या एका खेडेगावात झाला.  खाशाबा हे ख्यातनाम पैलवान दादासाहेब जाधव यांचे सर्वात लहान चिरंजीव. त्यांच्या आईचे नाव पुतळीबाई. घरची शेती, वडील शेतकरी होते आणि सोबत कुस्तीही खेळायचे.  या जाधवांच्या घरात शेतीची कामं झाली की, संध्याकाळी कुस्तीचे डाव खेळले जायचे. (Success story of Khashaba Jadhav)

दादासाहेब जाधवांनी खाशाबाचे कुस्तीतील प्राथमिक शिक्षण आपल्या घरीच पूर्ण केले. पुढे खाशाबांना महाविद्यालयीन शिक्षणादरम्यान बाबुराव बाळवडे आणि बेलपुरी गुरुजी यांनी मार्गदर्शन केले. खाशाबांनी भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातही भाग घेतला. त्याचवेळी आपल्या देशाचा तिरंगा ऑलिंमिक स्पर्धेमध्ये फडकवण्याचा निश्चिय केला.

खाशाबा जाधवांनी 1948 मध्ये लंडन उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये फ्लायवेट वजन गटातील कुस्तीत सहावा क्रमांक मिळवला. या स्पर्धेसाठी खशाबांना अनेकांनी आर्थिक मदत केली होती. पुढे 1952 मध्ये हेलसिंकी उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये 52 किलोग्रॅम वजनगटात फ्री स्टाइल प्रकारात कास्यंपदक जिंकून खाशाबा जाधव तमाम भारतीयांच्या गळ्यातील स्टार झाले. पण या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खाशाबांनी केलेली धडपड, त्यासाठी जमवलेले पैसे आणि नेमकी कुस्ती सुरु होण्यापूर्वी शहर फिरण्यासाठी गेलेल्या खाशाबांची कशी धावपळ झाली हे सर्व खूपच रंजक आहे. (Success story of Khashaba Jadhav)

ऑलिंपिकमध्ये भारतासाठी पहिले वैयक्तिक ऑलिंपिक पदक जिंकण्याचा पराक्रम खाशाबा जाधव यांनी 23 जुलै 1952 रोजी केला. या ऐतिहासिक पराक्रमाला 70 वर्षे झाली. खाशाबांनंतर ऑलिंम्पिंकमध्ये तब्बल 44 वर्षांनी भारताला वैयक्तिक पदक मिळालं. त्यावरुन या पदकाचं महत्त्व किती हे समजतं. पण या स्पर्धेसाठी खाशाबांची निवड प्रथम झाली नव्हती.   

ऑलिंपिक कार्यकारी मंडळातील अंतर्गत वादाचा फटका खाशाबा जाधव यांना बसला होता.   ऑलिंपिकसाठी तुमची निवड होऊ शकत नाही, असे त्यांना सांगण्यात आले. नाराज झालेल्या खाशाबांनी यावर तडक पतियाळाच्या महाराजांकडे दाद मागितली. महाराजांनी खाशाबांना पाठिंबा दिलाच शिवाय  त्यांची  ऑलिंपिक साठी पात्रता सिद्ध करण्यासाठी  त्यांना विरोध करणाऱ्या कुस्तीगीराशी पुन्हा कुस्ती खेळायला लावली. या कुस्तीत खाशाबांनी त्या कुस्तीगीराला चितपट केले आणि त्यांची ऑलिंपिकसाठी निवड झाली.  

======

हे देखील वाचा – वयाच्या ९४ व्या वर्षी धावण्याच्या शर्यतीत कशी मिळवली पदकं? वाचा आजींबद्दल अधिक

======

इथे खाशाबांपुढे आणखी एक आव्हान होतं, ते म्हणजे आर्थिक गणिताचं.  हेलसिंकीला या आपल्या लेकाला पाठवण्यासाठी मग अवघ्या गावानं लोकवर्गणी जमा केली. खाशाबा कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयात शिकत होते. त्या महाविद्यालयाचे प्राचार्य बॅरिष्टर बाळासाहेब खर्डेकर यांनी मोठा निर्णय घेतला. आपला विद्यार्थी ऑलिंपिकला जातोय, त्याला काही आडकाठी नको, म्हणून चक्क आपलं रहातं घर कोल्हापूर येथील मराठा बँकेकडे गहाण ठेवलं. त्यातून 7000 रुपये मिळाले. कोल्हापूरच्या महाराजांनीही खशाबा जाधवांना मदत केली. अशाप्रकारे खाशाबा फिनलँड देशाच्या राजधानीत होणाऱ्या 15 व्या हेलसिंकी ऑलिंपिक स्पर्धेत दाखल झाले. (Success story of Khashaba Jadhav)

खाशाबा फ्रीस्टाईल कुस्ती प्रकारात विजयी होते. त्या गटात विविध देशांचे २४ स्पर्धक होते. त्यांनी सेमी फायनलपर्यंतच्या मेक्सिको, जर्मनी, कॅनडा यांच्या बरोबरच्या कुस्त्या जिंकल्या. त्यामुळे त्यांच्याकडून पदकाची आशा होती. अशात खाशाबा सहकार्यांसह हेलसिंकी शहर बघण्यासाठी बाहेर जात होते.  त्याचवेळी त्यांना त्यांचे नाव ध्वनीक्षेपकावर ऐकू आले. आपल्याच नावाचा घोषा आहे, का हे बघण्यासाठी खाशाबा गेले, तर तिथे चक्क कुस्ती स्पर्धा चालू होत्या. घाईघाईनं खाशाबा तसेच आखाड्यात उतरले.   

गादीवरील या कुस्तीत खाशाबांकडून झालेल्या दोन चुका भारी पडल्या. गोल्ड मेडल हुकले ते जपानच्या ईशी शोबची याने जिंकले. मात्र खाशाबा यांनी जिंकलेले मेडलही भारतीयांना सोन्यापेक्षा कमी वाटले नाही. या विजयानंतर भारतात परत आलेल्या खाशाबांचे जंगी स्वागत झाले. कराड रेल्वे स्थानकावर आगमन होणाऱ्या खाशाबाचे स्वागत करण्यासाठी 151 बैलगाड्या,  हजारो नागरिक,  ढोल, लेझीम घेऊन हजर होते. सात तास या विजयी विराची मिरवणूक काढण्यात आली.  

खाशाबांनी कोल्हापूरमध्ये स्वतः कुस्ती फडाचे आयोजन केले. त्यात स्वतःही भाग घेतला आणि अनेक कुस्त्या जिंकल्या. त्यात जी कमाई झाली ती त्यांच्या प्राचार्यांना देऊन त्यांचे गहाण ठेवलेले घर सोडवून घेतले. हा विजयोत्सव होत असताना सरकारी पातळीवर मात्र या विजयी विराची उपेक्षाच झाली. ऑलिंपिक पदकानंतर खाशाबा सहा वर्षे नोकरीच्या प्रतिक्षेत होते.  (Success story of Khashaba Jadhav)

=====

हे देखील वाचा – आशियाई युवा वेटलिफ्टिंग स्पर्धेत चहावाल्याच्या मुलीने मिळवले रौप्यपदक 

=====

4 जुलै 1955 रोजी खाशाबा मुंबईतील पोलीस विभागात उपनिरीक्षक म्हणून रुजू झाले. पोलीस प्रशिक्षण घेत असताना द्वितीय क्रमांक मिळवून उत्कृष्ट खेळाडू म्हणून सन्मानाची तलवार मिळवली. पोलीस दलात आंतरविभागीय कुस्ती स्पर्धेत त्यांनी अनेक कुस्त्या जिंकल्या. राष्ट्रीय स्तरावर स्पोर्ट्‌स मार्गदर्शक म्हणूनही त्यांनी काम केले. पोलीस खात्यात 27 वर्षे खाशाबांनी नोकरी केली. या सर्व काळात त्यांची बढती झाली नाही. राजकीय आकसाचा सामना या कुस्तीवीराला करावा लागला.  

निवृत्तीपूर्वी काही महिने असिस्टंट पोलीस कमिशनर म्हणून त्यांना बढती मिळाली आणि या हुद्द्यावरून ते निवृत्त झाले. पेन्शनसाठीही या ऑलिंमिक विजेत्याला झगडावे लागले. स्पोर्ट्‌स फेडरेशनने देखील त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. खाशाबा सेवानिवृत्तीनंतर आपल्या गावी परतले आणि शेती करु लागले.  त्यांच्यासाठी हा कठिण काळ होता. सेवानिवृत्तीनंतर अवघ्या दोन वर्षांनी, 14 ऑगस्ट 1984 रोजी रस्ता अपघातात त्यांचा  मृत्यू झाला आणि एक वादळ शांत झालं.  

जिवंतपणी सरकारदरबारी उपेक्षित राहिलेल्या खाशाबांना मृत्यूनंतर चांगले दिवस आले असं म्हणावं लागेल. दिल्ली राष्ट्रकुल स्पर्धेच्या काळात त्यांच्या स्मरणार्थ आंतरराष्ट्रीय कुस्ती स्टेडियमला के. डी. जाधव कुस्ती संकुल असे नाव देण्यात आले. तसेच 2001 पासून त्यांच्या नावाने महाराष्ट्र शासन कुस्ती स्पर्धा भरवत आहे. जीवन गौरव पुरस्कार, मेघनाथ नागेश्वर पुरस्कार, शिवछत्रपती पुरस्कार असे पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आले आहेत. 

आता खाशाबा जाधव यांच्या जिवनावर चित्रपटही येतोय. अभिनेता रितेश देशमुख पॉकेट डायनेमो नावाचा चित्रपट करत असून हिंदी आणि मराठीत चित्रपट असणार आहे. याशिवाय लेखक संजय दुधाणे यांनी खाशाबा यांच्यावर वीर के. डी. जाधव नावाने पुस्तक लिहले आहे.  (Success story of Khashaba Jadhav)

खाशाबा जाधव यांचा सगळा जिवनप्रवास प्रेरणादायी असला तरी या विराच्या वाट्याला कायम संघर्ष आलाय. मग तो कुस्तीच्या आखाड्यात असो, की जीवनाच्या लढाईत. पण एक मात्र आहे, या प्रत्येक लढाईला खाशाबा मानानं लढले….आणि जिंकलेही!

– सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.