Home » नागपूरच्या देविदास सौदागरांची यशोगाथा

नागपूरच्या देविदास सौदागरांची यशोगाथा

by Team Gajawaja
0 comment
Devidas Saudagar
Share

देविदास सौदागर हे कोण आहेत याची आपल्याला माहिती आहे का? अर्थातच देविदास सौदागर यांची दखल जून २०२४ पर्यंत कोणीच घेतली नव्हती. मात्र जूनमध्ये साहित्य अकादमीच्या युवा पुरस्कार विजेत्यांची नावे जाहीर झाली. त्यात देविदास सौदागर यांचे नाव होते. देविदास यांच्या उसवान या कांदबरीला मराठीतील साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार २०२४ जाहीर झाला. त्यानंतर हे देविदास सौदागर कोण, याची शोधाशोध सुरु झाली. त्यातून एक प्रेरक कथा समोर आली. एक धडपडा तरुण, शिक्षणाची योग्य संधी मिळाली नाही तरी, कष्टाला न लाजणारा एक साहित्यिक समोर आला. वॉचमन पासून टेलरिंग पर्यंत काम करणा-या या देविदास सौदागर यांचा सगळा जीवन प्रवास हा प्रेरणादाई आहे. (Devidas Saudagar)

देविदास सौदागर यांचे नाव मराठी साहित्य वर्तुळात चर्चेत आले आहे. त्यांच्या उसवान या कादंबरीला मराठीतील साहित्य अकादमी युवा पुरस्कार २०२४ मिळाला आहे. साहित्य अकादमीने प्रतिष्ठेच्या युवा पुरस्कारासाठी २३ लेखकांची नावे जाहीर केली. त्यात मराठी लेखकांमध्ये देविदास सौदागर यांच्या नावांचा समावेश आहे. अत्यंत गरीबीतून जीवन जगलेल्या देविदास यांचे शिक्षण हे फार झाले नसले तरी त्यांनी आयुष्याच्या शाळेत खूप काही शिकले आहे. यातूनच त्यांची उसवान ही कादंबरी साकारली आहे. महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणून परिचित असलेल्या धाराशिव म्हणजेच पूर्वीचे उस्मानबाद या जिल्ह्याच्या तुळजापूर मध्ये देविदास यांचा जन्म झाला. देविदास यांचे आजोबा आणि वडिल हे शेतमजूर म्हणून काम करत होते. त्यामुळे त्यांच्यापाठोपाठ देविदासही शेतमजूरच होणार हे नक्की होते. पण देविदास यांना शाळेची गोडी लागली.

सातव्या इयत्तेपर्यंत त्यांनी शाळा केली. पण नंतर गरीबीमुळे शाळा सोडावी लागली. अशावेळी रात्रशाळेमध्ये त्यांनी दहावीपर्यंत शिक्षण घेतले. देविदास यांच्या वडिलांनीही एका टेलरच्या हाताखाली मदतनीस म्हणून काम करायला सुरुवात केली. वडिलांकडून ही टेलरिंगची कला देविदास यांनीही शिकून घेतली. दहावीनंतर त्यांनी आयटीआयमध्ये प्रवेश घेतला मोटर मेकॅनिकचे दोन वर्षे शिक्षण घेतले. २००८ मध्ये आयटीआयमधून बाहेर पडले पण त्यांना कोणतेही काम मिळाले नाही. अखेर न हरता त्यांनी आपल्या वडिलांना मदत करायला सुरुवात केली. टेलरिंगचे काम सुरु केले. सोबतच रात्रपाळीमध्ये वॉचमन म्हणूनही देविदास काम करत होते. या सर्वात शिक्षणाची त्यांची जिद्द कमी झाली नाही. त्यांनी पुढच्या शिक्षणासाठी महाविद्यालयात प्रवेश घेण्याचा प्रयत्न केला. मात्र पैशांची अडचण होतीच, शिवाय त्यांच्या कामाच्या वेळेमुळे कॉलेजमध्ये वेळेवर जाता येणार नव्हते. पण देविदास यांनी न हरता मुक्त विद्यापीठात प्रवेश घेतला आणि इतिहासात एमए केले. आपल्याला चांगली नोकरी लागेल म्हणून त्यांनी सोबत इंग्रजी-मराठी टायपिंग टायपिंगही शिकून घेतले. (Devidas Saudagar)

==================

हे देखील वाचा : जहाल नेता ‘लोकमान्य टिळक’

================

हे सर्व करत असतांना देविदास यांनी वाचन हेच दैवत मानले. जे जे पुस्तक हाती पडेल ते वाचायची त्यांना सवय आहे. गावातील लायब्ररीमध्ये त्यासाठी कायम त्यांची फेरी होते. यातूनच अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हाती लागले. वयाच्या १८ व्या वर्षी देविदास यांनी कविता लिहायला सुरुवात केली. त्यांची कविता वृत्तपत्रात प्रकाशित झाली, तेव्हा त्यांना खूप आनंद झाला. यातूनच आपले स्वतःच्या कवितांचे पुस्तक प्रकाशीत कऱण्याची कल्पना त्यांना सुचली. रोजच्या कमाईतून ८००० रुपयांची बचत करुन त्यांनी २०१८ मध्ये त्यांचा पहिला कविता संग्रह प्रकाशीत झाला. ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनाही त्यांनी आपले पुस्तक पाठवले होते. त्यावेळी नेमाडे यांनी दोन पानी पत्र आणि १०० रुपयांचा धनादेश देविदास यांना पाठवला. पुस्तकाची ही रक्कम आणि भालचंद्र नेमाडे यांचे पत्र देविदास यांनी लॅमिनेशन करुन जपून ठेवले आहे.

या सर्वात कोविडमुळे देविदास यांच्या जीवनाची दिशा बदलली. कोविडच्या काळात कपड्यांचे शिवण बंद झाले. काहीच काम हाताला नव्हते. अशावेळी देविदास यांनी लेखनाला सुरुवात केली. त्यातूनच उसवान या कादंबरीची मुळ कथा त्यांना सुचली. २०२२ मध्ये कादंबरी पूर्ण झाल्यावर ती प्रकाशीत करण्यासाठी देविदास अनेक प्रकाशकांकडे गेले. पण त्यांनी नकार दिला. अखेर देशमुख अँड कंपनीच्या मुक्ता गोडबोले यांनी कादंबरीच्या ५०० प्रती प्रकाशित केल्या. शिंपी समाजाच्या अडचणींवर लिहिलेल्या याच ‘उसवान’ कादंबरीला मराठीतील साहित्य अकादमी युवा पुरस्कार २०२४ मिळाला आहे. माणसाकडे जिद्द, चिकाटी असेल तर तो आपल्या जीवनाला उन्नत मार्गावर कशाप्रकारे नेऊ शकतो, याचे उत्तम उदाहरण म्हणून देविदास सौदागर यांचे नाव घेतले जात आहे. (Devidas Saudagar)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.