मनोरंजनविश्वात जाणे, काम मिळवणे आणि त्यातही आपल्या कामात यश मिळवणे आणि मिळालेले यश टिकवणे हे खूपच अवघड काम आहे. छोट्या छोट्या भूमिका तर मिळतात मात्र मोठ्या भूमिका मिळवणे किंवा एखादी अशी भूमिका मिळवणे जी त्या व्यक्तीची ओळख बनेल हे वाटते तेवढे सोपे नाही. माणसाच्या प्रयत्नांना यासाठी नशिबाची साथ पाहिजे. अनेक वर्ष काम करूनही काही कलाकरांना मोठे यश मिळत नाही. तर काही कलाकरांना अनेक वर्ष काम केल्यानंतर अशी काही भूमिका मिळते जी त्यांचे संपूर्ण जीवनच बदलून टाकते. असेच काहीसे झाले अभिनेते दिलीप जोशी यांच्याबद्दल. दिलीप जोशी अहो ते आपले जेठालाल चंपकलाल गढा. हो तेच तारक मेहता का उलटा चश्मा मालिकेत मुख्य भूमिका साकारणाऱ्या दिलीप जोशींबद्दलच (Dilip joshi) बोलतोय आम्ही.
शेक्सपियरने सांगितले ‘नावात काय आहे’ मात्र दिलीप जोशी यांच्या नावातच सर्व काही आहे. कदाचित ही उक्ती दिलीप जोशी यांच्याबद्दल अपवाद असेल. ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेने दिलीप जोशी (Dilip joshi) यांना जी प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळवून दिली ती न भूतो न भविष्यती अशी आहे. चित्रपटांमध्ये अनेक लहान लहान भूमिका करणाऱ्या दिलीप जोशींचे या मालिकेने पूर्ण आयुष्यच बदलून गेले. २००८ सालापासून तारक मेहता का उलटा चश्मा ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या १३ वर्षांच्या मोठ्या काळात मालिकेला आणि यात काम करणाऱ्या कलाकारांना अमाप यश आणि प्रसिद्धी मिळाली. मात्र या सर्वांमध्ये दिलीप जोशी यांची बातच काही और आहे. आज आपण त्यांच्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.
दिलीप जोशी (Dilip joshi) यांनी करिअरच्या एका टप्प्यावर या मनोरंजनविश्वाला अलविदा म्हणायचे ठरवले होते. अनेक वर्ष काम करूनही त्यांना मनासारखे काम मिळत नव्हते. कदाचित त्याचमुळे त्यांनी हा निर्णय घेतला असावा. तेव्हा तर दिलीप जोशी यांना ही मालिका ऑफर देखील झाली नव्हती. या मालिकेआधी ते एका मालिकेत काम करत होते, मात्र ती मालिका बंद झाली होती आणि संपूर्ण एक वर्ष त्यांच्याकडे काम नव्हते अशातच त्यांनी या क्षेत्राला रामराम ठोकायचा ठरवला. मग याच काळात २००८ साली दिलीप जोशी (Dilip joshi) यांना ‘तारक मेहता का उलटा चश्मा’ ही मालिका ऑफर आली आणि एवढे वर्ष त्यांनी ज्या भूमिकेची वाट पाहिली, ज्या यशाची वाट पहिली ते सर्व या भूमिकेने आणि मालिकेने त्यांना मिळवून दिले. आज ही मालिका आणि ‘जेठालाल’ हीच त्यांची ओळख बनली आहे. आता हेच दिलीप जोशी (Dilip joshi)मालिकेच्या एका भागासाठी तब्ब्ल १.५ लाख रुपये घेतात त्यांच्याकडे तब्ब्ल ४० कोटींची संपत्ती असल्याचे सांगितले जाते.