Home »  रवींद्रनाथ टागोरांनीही केली होती पुरस्कार वापसी, कारण होतं.. 

 रवींद्रनाथ टागोरांनीही केली होती पुरस्कार वापसी, कारण होतं.. 

by Team Gajawaja
0 comment
Rabindranath Tagore
Share

घरातल्या १३ भावंडांमध्ये सर्वात धाकटा असलेल्या ‘रबी’ला वाढवलं ते घरातल्या नोकरांनीच! वडील देबेंद्रनाथ टागोर सतत फिरतीवर असायचे आणि आई सारदा देवीचं निधन झालं होतं. पण खानदानी श्रीमंती आणि नवकलेचा प्रचंड प्रभाव असलेल्या रबीला कला क्षेत्रात उतरण्यासाठी काही वेगळं करावं लागलं नाही. कला त्याच्या रक्तातच होती. (Rabindranath Tagore)

वयाच्या आठव्या वर्षी त्यानं आपली पहिली कविता लिहिली. त्यानंतर तो पेटिंगकडे वळाला. सोळाव्या वर्षी भानुसिंह या टोपणनावाने त्याच्या कविता प्रसिद्ध व्हायला लागल्या आणि त्याचवर्षी ‘भिखारिनी’ नावाची लघुकथा त्यानं लिहिली. २१ व्या वर्षी संध्या संगीत नावाचा त्याचा स्वतंत्र कवितासंग्रह प्रकाशित झाला. अगदी लहान वयात लेखणीवर प्रभूत्व असलेल्या रबीला शाळा मात्र कधीच आवडली नाही.

हाच ‘रबी’ म्हणजे अर्थात जगप्रसिद्ध साहित्यकार रवींद्रनाथ टागोर. त्यांना वयाच्या सातव्या वर्षी कलकत्त्यामधल्या ओरिएंटल स्कूलमध्ये घातलं गेलं, पण जेमतेम महिन्याभरात त्यांनी विद्यार्थ्यांना छडीनं मारणाऱ्या आणि सतत शिक्षा देणाऱ्या शाळेत आपण जाणार नाही, असं घरी जाहीर केलं. पुढे त्यांना सेंट झेवियर्स नावाच्या शाळेत घातलं गेलं आणि तिथं ते काहीसे रमलेही, पण सहाच महिन्यांत त्यांनी ही शाळाही सोडून दिली. त्याकाळी सर्वात महत्त्वाची मानली जाणारी मॅट्रिकची परीक्षाही ते कधीच उत्तीर्ण झाले नाही. कॉलेजमध्येही ते अक्षरशः एकच दिवस गेले.

चौकटीतलं शिक्षण नको

रवींद्रनाथांची जडणघडण कलेनं भारलेल्या अतिशय मोकळ्या वातावरणात झाली होती. त्यांना वर्गात डांबून ठेवणाऱ्या पठडीबाज शिक्षणाचा तिरस्कार होता. वर्गात बसल्यानंतर आपली विचारशक्ती कामच करायची नाही. बंद खोलीत आपली घुसमट होते, असं ते पुढे सांगायचे. शिक्षण मुलांना आनंदी आणि सर्जनशील बनवण्यासाठी वाव देणारं हवं असं त्यांना वाटायचं. (Rabindranath Tagore)

आपल्या काळच्या शाळा म्हणजे साचेबद्ध विचारसरणी तयार करणारे कारखाने होते. लहानपण स्वतः गोष्टी धुंडाळण्यासाठी, स्वतःहून नवीन गोष्टी शिकण्यासाठी असतं आणि ब्रिटिशांनी तयार केलेल्या शिक्षणपद्धतीत यातलं काहीच होत नाही, असं ते म्हणायचे. ते स्वतः निसर्गवेडे होते आणि म्हणूनच बंदिस्त, पारंपरिक पद्धतीनं दिलं जाणारं शिक्षण ते कधीच घेऊ शकले नाही. अखेर त्यांना शिकवायची जबाबदारी त्यांचा भाऊ हेमेंद्रनाथ यांनी आपल्याकडे घेतली. 

हेमेंद्रनाथ स्वतः रवींद्रनाथांना चित्रकला, इतिहास, साहित्य, गणित, संस्कृत आणि इंग्रजी शिकवायचे. गंगेच्या प्रवाहात पोहणं, जिम्नॅस्टिक आणि ज्युडोसारखं शारीरिक बळ वाढवणारं शिक्षणही त्यांनी दिलं. मुंज झाल्यावर वयाच्या ११ वर्षी रवींद्रनाथ आपल्या वडिलांबरोबर प्रवासाला गेले. या प्रवासात ते अमृतसरपासून डलहौसीपर्यंत बऱ्याच ठिकाणी राहिले. (Rabindranath Tagore)

अमृतसरमधल्या सुवर्णमंदिराच्या परिसरात त्यांनी पहिल्यांदा गुरुवाणी आणि नानकवाणी ऐकली. या संगीताचा त्यांच्यावर कायम प्रभाव राहिला. निसर्गात शिक्षण घेण्याची आपली इच्छा त्यांनी पुढे निसर्गाच्या सान्निध्यात शांतीनिकेतन शाळेची स्थापना करून पूर्ण केली.

====

हे देखील वाचा – ‘लोकमान्य टिळकांना’ राजकीय पुढारी व्हायचं नव्हतं; वाचा काय होतं त्यांचं ध्येय…

====

कलेच्या सर्व प्रांतात मुशाफिरी

१९१२ मध्ये रवींद्रनाथ बोटीने लंडनला निघाले होते. दरम्यान त्यांची तब्येत बिघडली आणि सक्तीची विश्रांती घ्यावी लागली. त्याचवेळेस आपल्या ‘गीतांजली’ या काव्याचा इंग्रजीत अनुवाद करण्याचा विचार त्यांच्या मनात आला. रवींद्रनाथांनी स्वतःच ते भाषांतर करायला घेतलं आणि पुढे काही सहकाऱ्यांच्या मदतीने पूर्ण केलं. मूळ गीतांजलीमधे असलेल्या १०३ कवितांपैकी निवडक ५३ कवितांचं भाषांतर त्यात होतं. इंग्रजी वाचकांपर्यंत हे पुस्तक पोहोचवणं एवढाच त्यांचा हेतू होता, पण ते इतकं लोकप्रिय झालं, की एकाच वर्षात रवींद्रनाथांना नोबेल पारितोषिक मिळालं. (Rabindranath Tagore)

साहित्यनिर्मितीसाठी नोबेल मिळवणारे ते पहिले आशियाई व्यक्ती होते. ब्रिटिश राजवटही त्यांच्यापुढे झुकायची हे विशेष. ब्रिटिशांनी टागोरांना ‘नाइटहूड’ हा सन्मान दिला होता, मात्र जालियनवाला हत्याकांडानंतर टागोरांनी तो परत केला.

लघुकथा, कादंबऱ्या, चित्रकला, कविता, संगीत अशा विविध प्रांतात टागोरांनी केलेली निर्मिती आजही जगभरात वाखाणली जाते. रबींद्र संगीतासारखा एखादा संगीतप्रकार आपल्या नावावर असणारे ते कदाचित जगातील एकमेव असावेत. भारत आणि बांग्लादेश अशा दोन देशांची राष्ट्रगीतं लिहिण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. 

प्रवास अतिशय अवघड असण्याच्या काळात त्यांनी ३४ देशांना भेट दिली होती, कारण वेगवेगळ्या संस्कृतींचा मिलाफ व्हायला हवा असं त्यांना वाटायचं. याचा प्रभाव त्यांच्या प्रत्येक कलानिर्मितीवर दिसून येतो. म्हणूनच टागोर आजही केवळ भारतातीलच नव्हे, तर जगभरातील साहित्य, कला आणि संगीत क्षेत्राचे आधारस्तंभ मानले जातात. 

– कीर्ती परचुरे


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.