देशाच्या ईशान्य भागातील छोटे आणि सुंदर राज्य म्हणजे मणिपूर. गेल्या काही वर्षापासून हे मणिपूर राज्य दंगलीमुळे गाजत आहे. देशाचा हा ईशान्य कोपरा अतिशय संपन्न आहे. मणिपूर राज्याचा इतिहास हा महाभारतातील अर्जुनासोबत जोडला गेलेला आहे. ऐतिहासिक ग्रंथांमध्ये मणिपूरचा उल्लेख कांगेलीपाक किंवा मीतेलीइपाक म्हणून केला गेला आहे. मात्र एका राजानं या राज्यात हिंदू धर्माची बिजे रोवली आणि राज्याचे नाव मणिपूर असे केले. मणिपूरच्या या पहिल्या हिंदू सम्राटाला गरीब नवाज असे म्हटले जायचे.
त्यानं आपल्या कार्यकालात मणिपूरमध्ये राज्यव्यवस्था प्रस्थापित केलीच शिवाय शेजारील देशांवरही आपला वचक बसवला. स्वतः जन्मापासून दूर राहिलेला एक राजकुमार अचानक राजगादीवर बसतो आणि मग अवघ्या राज्याला एका धाग्यात गुंफतो. आज मणिपूर हे देशाच्या राजकारणात महत्त्वाचे राज्य बनले आहे. राजकारणासाठी विरोधक तेथील हिंसक कारवाया घडवत आहेत, असा आरोप करण्यात येतो. अशावेळी या मणिपूर राज्याला आपल्या राजवटीत सोनेरी दिवस दाखवणा-या गरीब नवाज सम्राटाविषयीही जाणून घेणे गरजेचे आहे. (Manipur State)
मणिपूर राज्य अशांत करण्याचा डाव काही देशविघातक शक्तींचा आहे. अशावेळी मणिपूर हे नाव ज्या राजानं दिलं आणि ज्यानं हिंदू धर्माची पताका या राज्यात रोवली त्या राजाच्या पराक्रमाची गाथा ऐकायलाच हवी अशी आहे. गरीब निवाज ही उपाधी मिळालेला मणिपूरच्या पहिल्या हिंदू सम्राटानं १७०९ पासून १७५१ पर्यंत राज्य केले. मणिपूरचा राज्य धर्म म्हणून हिंदू धर्माची ओळख त्यानंच करून दिली.
यापूर्वी मणिपूर राज्याचे नाव कांगलीपाक असे होते. कांगलीपाक हे संस्कृत नाव असून हिंदू धर्मग्रंथांत हेच नाव समोर येते. त्याचा उल्लेख थेट महाभारतात आहे. येथीलच राजा चित्रवाहनची कन्या चित्रांगदा हिचा विवाह अर्जुनशी झाला. त्यानंतर येथील राजे स्वतःला अर्जुनाचे वंशज म्हणवून घेत होते. नोंगडा लारेन पखानबा हे मणिपूरचा पहिला राजे असल्याची माहिती आहे. नोंगडा लारेन पखानबा यांच्या काळात सनमाही नावाचा नवा धर्म सुरू झाला. (Manipur State)
या राज्याच्या राजधानीचे नाव कंगला शा असे होते. स्थानिक देवतेच्या नावावरुन हे नाव देण्यात आले होते. पुढे राज्याचे नाव कांगलीपाक झाल्याची माहिती आहे. हिरे आणि दागिन्यांची भूमी असलेल्या या मणिपूरची संस्कृती ही अन्य राज्यांपेक्षा वेगळी होती. नैसर्गिक सौंदर्य, कला आणि परंपरांनी समृद्ध असलेल्या मणिपूरची संस्कृती ही याच निसर्गाला देवता मानून बहरत गेली. १७२४ मध्ये हे कांगलीपाक नावाचे राज्य मणिपूरम्हणून ओळखले जाऊ लागले. त्यामागे महाराजा गरीब नवाज यांची दूरदृष्टी होती असे सांगितले जाते.
गरीब नवाज यांचे बालपणीचे नाव पमहीबा होते. राजा चारैरोंगबा आणि त्याची धाकटी राणी नांगशेल चाईबी हे पमहीबा यांचे आईवडील . पण मणिपूरच्या चालीरीतींचे परिणाम लहानग्या पमहीबाला चांगलेच भोगावे लागले. त्या काळच्या परंपरेनुसार फक्त मोठ्या राणीच्या मुलानाच वारसारक्कानं राजगादीवर बसण्यचा अधिकार होता. (Manipur State)
अशावेळी भांडणे होऊ नयेत, किंवा राजगादीसाठी युद्ध होऊ नयेत, म्हणून फक्त मोठ्या राणीलाच मुलांना जन्म देता येत असे. जर अन्य राण्यांना मुलं झाली तर ती मारण्यात येत असत. पण जेव्हा धाकट्या राणी, यांना मुलगा झाला तेव्हा त्यांनी त्याला गुप्तपणे एका नागा सरदाराच्या घरी पाठवून दिले. त्याच्याऐवजी राणीनं मेलेल्या मुलाला जन्म दिला असे सांगण्यात आले. जन्म झाल्याच्या काही मिनिटातच पमहीबा आपल्या आईपासून दुरावला. मात्र तो ज्या नागा सरदाराच्या घरात वाढला तिथे त्याला भावी राजा म्हणूनच वाढवण्यात आले.
त्याला आवश्यक असे सर्व प्रशिक्षण देण्यात आले. काही वर्षांनी ही गोष्ट मोठ्या राणीला कळली. तिने पमहीबाला मारण्याचा प्रयत्नही केला. पण तोपर्यंत राजपूत्र पमहीबा स्वतःचे संरक्षण करु शकत होता. त्यात मोठ्या राणीला मूल नव्हते. त्यामुळे राजा चारैरोंगबाला त्याच्या उत्तराधिकारीची माहिती देण्यात आली. राजानं पमहीबाला राजवाड्यात आणले आणि भावी राजा म्हणून त्याची ओळख जनतेला करुन दिली.
पमहीबाच्या या कथेसोबत आणखीही एक कथा मणिपूरमध्ये सांगितली जाते. त्यानुसार एका ज्योतिषानं राजा आणि राणीला राजपूत्राला ठराविक वर्षासाठी राजवाड्यापासून दूर ठेवण्याचा सल्ला दिला होता. तसे केले तर राजपुत्राच्या आयुष्याला कुठलाही धोका नसल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यानुसारच राजानं पमहीबाला आपल्या सरदाराच्या घरी ठेवल्याची कथाही सांगितली जाते. (Manipur State)
==================
हे देखील वाचा: म्यानमारच्या राजकरणात भारत सरकारची एन्ट्री
==================
पमहीबा हा राजवाड्यात आल्यावर थोड्याच काळात त्यानं राज्याची धुरा आपल्या ताब्यात घेतली. मितेई घराण्यातील या राजपुत्राने मणिपूरमध्ये हिंदू धर्माची ओळख करून दिली. बंगालमधून आलेल्या ऋषींनी पमहीबाला हिंदू धर्माची महती सांगितली. त्यामुळे पमहीबानं हिंदू धर्म स्विकारला. पमहीबा हा उत्तम प्रशासक होता. त्यानं मणिपूर हे नाव राज्याला दिले आणि राज्याची प्रशासन व्यवस्था बसवली. तो अतिशय उदार मनाचा राजा होता. त्यामुळेच जनतेने त्याला गरीब नवाज असा किताब दिला. पुढे इतिहासात त्याची याच नावानं ओळख झाली. पामहीबानं तेव्हाच्या बर्मा आणि आत्ताच्या म्यानमार मधील टोंगू या राजघराण्यासोबत अनेकवेळा युद्ध केले. त्यामागेही एक कथा आहे.
ब्रह्मदेशाच्या राजानं पामहीबाच्या बहिणीचा अपमान केला. आपल्या बहिणीच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी पामहिबानं अनेकवेळा बर्मावर हल्ला केला. मोठी लूट केली. त्यातून त्यानं आपल्या राज्यात अनेक सुधारणा केल्या. त्यानं मणिपूरवर ३९ वर्ष राज्य केले. पूर्वेकडील इरावडी नदीपासून पश्चिमेला कचर आणि त्रिपुरापर्यंत मणिपूरचा विस्तार केला. त्याच्यानंतर त्याच्या मुलांनी मणिपूरवर राज्य केले. आज जेव्हा मणिपूरमध्ये हिंसक दंगली होत आहेत, यात मणिपूरवासीय या सम्राट गरीब नवाजची आठवण काढत आहेत. (Manipur State)
सई बने