Home » विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन दि. 7 आणि 8 सप्टेंबर रोजी

विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन दि. 7 आणि 8 सप्टेंबर रोजी

by Correspondent
0 comment
Share


मुंबई, दि. 25 : महाराष्ट्र विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन येत्या 7 आणि 8 सप्टेंबर असे दोन दिवसांचे होणार आहे. सध्याची कोविड परिस्थिती पाहता सुरक्षित शारीरिक अंतराचा (सोशल डिस्टन्सिंग) निकष पाळून आणि सुरक्षेविषयी आवश्यक त्या उपाययोजना करुन हे अधिवेशन घेण्यात येणार आहे.

पावसाळी अधिवेशनाच्या अनुषंगाने विधानसभा आणि विधान परिषद यांच्या कामकाज सल्लागार समितीची बैठका आज मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडल्या. विधान परिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक अध्यक्ष श्री. नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकांमध्ये हा निर्णय घेण्यात आला. या बैठकांना विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते श्री. प्रविण दरेकर, विधानसभेतील विरोधी पक्षनेते श्री. देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री श्री. बाळासाहेब थोरात, गृहमंत्री श्री. अनिल देशमुख, जलसंपदामंत्री श्री. जयंत पाटील, नगरविकासमंत्री श्री. एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री श्री. सुभाष देसाई, संसदीय कामकाजमंत्री ॲड. अनिल परब, गृह राज्यमंत्री श्री. सतेज पाटील आदी उपस्थित होते.

या बैठकांमध्ये कोविड परिस्थितीत सुरक्षाविषयक मापदंडांचे पालन करुन अधिवेशनाचे कामकाज निश्चित करण्याबाबत चर्चा झाली. अधिवेशनाच्या आदल्या दिवशी म्हणजे दि. 6 सप्टेंबर रोजी सर्व सदस्यांची कोविड-19 साठीची ‘आरटीपीसीआर’ तपासणी करण्यात येईल असा निर्णय घेण्यात आला. ज्या सदस्यांची कोविड चाचणी निगेटिव्ह असलेल्या सदस्यांनाच सभागृहात प्रवेश दिला जाईल.

सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासाठी सदस्यांची बसण्याची व्यवस्था आवश्यकतेप्रमाणे सभागृहाच्या प्रेक्षक आणि विद्यार्थी गॅलरीमध्येही करण्यात येणार आहे. सुरक्षिततेचा उपाय म्हणून प्रत्येक सदस्याला सुरक्षा किट देण्यात येणार आहे. या किटमध्ये फेस शील्ड, मास्क, हॅण्ड ग्लोव्हज, सॅनिटायझर आदी वस्तूंचा समावेश असेल.

सदस्यांच्या स्वीय सहायकांना विधानमंडळात प्रवेश दिला जाणार नाही. मात्र, स्वीय सहायकांची आणि सदस्यांच्या वाहनचालकांची बसण्याची तसेच अल्पोपहार आदी व्यवस्था विधानमंडळ परिसरात तंबू (टेन्ट) टाकून करण्यात येईल.सहव्याधी असलेल्या (कोमॉर्बिडीटी) सदस्यांना काळजी घेण्याबाबतच्या सूचना संबंधित पक्षाच्या गटनेत्यांकडून दिली जावी.या अधिवेशनात शोक प्रस्तावावर चर्चा, अतारांकित प्रश्न, पुरवणी मागण्या, विनियोजन विधेयक यावर चर्चा घेण्यात येतील. यामध्ये 7 शासकीय विधेयके आणि एक विनियोजन विधेयकाचा समावेश असेल, अशी माहिती विधानमंडळ सचिव ॲड. राजेंद्र भागवत यांनी यावेळी दिली.

कामकाज सल्लागार समिती बैठकांना विधानसभा सदस्य सर्वश्री राधाकृष्ण विखे पाटील, गिरीष महाजन, ॲड. आशिष शेलार, अमिन पटेल, सुनील प्रभू, विधान परिषद सदस्य सर्वश्री डॉ. रणजीत पाटील, अशोक ऊर्फ भाई जगताप, विजय ऊर्फ भाई गिरकर, जयंत पाटील, कपील पाटील आदी उपस्थित होते.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.