मनाली-लेह मार्ग (Manali-Leh route) हा अनेक ट्रेकर्सना खुणवत असतो. मनाली-लेह मार्गावरुन लडाखला जाण्याचं स्वप्न अनेक बायकर्स बघत असतात. हा ट्रेक भारतातील सर्वोच्च ट्रेक मानला जातो. हा मनाली लेह मार्गावर (Manali-Leh route) जाण्याचं स्वप्न अनेकांचे असले तरी हा मार्ग तेवढाच खडतरही आहे. मुख्य म्हणजे, या मार्गात असलेला बर्फ आणि त्यामुळे निसरडे झालेले रस्ते यांचे मोठे आव्हान असते. बर्फामुळे हा मार्ग ठराविक कालावधीसाठी बंद करण्यात येतो. आता हा बंद मार्ग खुला करण्यात येत आहे. मनाली-लेह मार्ग 1 जूनपासून सर्व वाहनांसाठी खुला करण्यात येत आहे. प्रवासाची आवड असणा-या पर्यटकांसाठी ही आनंदाची बातमी असून यामुळे या भागात पुन्हा पर्यटकांची वर्दळ वाढणार आहे. लाहौल-स्पिती जिल्हा प्रशासनाने 1 जूनपासून सर्व वाहनांसाठी मनाली-लेह मार्ग पूर्ववत करणार असल्याचे जाहीर केले आहे.
मनाली-लेह मार्ग (Manali-Leh route) 1 जूनपासून सर्व वाहनांसाठी खुला होणार आहे. 1 जूनपासून अत्यंत महत्त्वाच्या मनाली लेह मार्गावरून सर्व वाहनांची वाहतूक सुरू होणार आहे. यामुळे सामान्य जनता आणि पर्यटकांबरोबर लष्करी जवानांच्या गाडंयानाही जाता येणार आहे. त्यामुळे सर्वानाच मोठा दिलासा मिळणार आहे. मनाली-लेह मार्गावर (Manali-Leh route) पर्यटक मोठ्या संख्येने पर्यटनासाठी येतात. आता जून महिन्याच्या पहिल्या तारखेला हा रस्ता पर्यटकांसाठी खुला झाल्यानं मोठ्या संख्येनं पर्यटक येण्याची शक्यता आहे. सध्या 31 मे पर्यंत जिल्हा प्रशासनाच्या परवानगीनंतर या मार्गावर केवळ सम-विषम नियमानुसार वाहने पाठवण्यात येत आहेत. या मार्गावर झालेल्या प्रचंड बर्फवृष्टीमुळे हा सर्वच भाग बर्फाच्या आवरणाखाली होता.
निसरड्या बर्फामुळे, मनाली येथून सम तारखांना म्हणजे 22, 24, 26, 28 आणि 30 मे रोजी छोटी वाहने पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय 23, 25, 27, 29 आणि 31 मे या विषम तारखांना लेहहून बरलाचा मार्गे मनालीकडे गाड्या पाठवल्या जाणार आहेत. 22 मे रोजी जिल्हा पोलीस सरचू येथे स्वत:चे चेकपोस्ट उभारणार आहेत, त्याद्वारे पर्यटकांना आवश्यक अशा सुविधा पुरवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. या भागात येणा-या पर्यटकांना निसर्गाची विविध रुपे पाहायला मिळतात. पर्यटकांना रोहतांग खिंडितील बर्फवृष्टीही पाहण्यासारखी असते. यासाठी येणा-या पर्यटकांचा आकडा पाहता, कुल्लू प्रशासनाने मढीपर्यंत रोहतांग पासचा रस्ता पर्यटकांसाठी खुला केला आहे. मार्हीपासून रोहतांगचे अंतर सुमारे 15 किलोमीटर आहे. या सर्व मार्गावर पर्यटकांची गर्दी असते. मात्र गुलाबा ते मढीला जाण्यासाठी एनजीटीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ऑनलाइन परमिट घेणे आवश्यक आहे. नियमानुसार, एका दिवसात केवळ 1 हजार 200 वाहनेच या रस्त्यानं जाऊ दिली जाणार आहेत. त्यामुळे पर्यटकांनी आपल्या प्रवासाचे व्यवस्थित नियोजन करावे आणि ऑनलाईन सुविधांचा फायदा घ्यावा असेही आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
समुद्र सपाटीपासून 13050 फूट उंचीवर रोहतांग खिंडीचे मैदान हे पर्यटकांसाठी एखाद्या स्वर्गासारखे आहे. त्यासाठीच पर्यटकांची जास्त गर्दी होते. या गर्दीचे व्यवस्थित नियोजन होण्यासाठी पर्यटक पर्यटन विकास परिषदेच्या साइटवरून ऑनलाइन परमिट देण्याची सोय करण्यात आली आहे. सकाळी 10:00 आणि दुपारी 4:00 वाजता दोन टप्प्यांत परवाने मिळू शकतात. सकाळी 200 डिझेल आणि 400 पेट्रोल इंजिन वाहनांना आणि संध्याकाळी 200 डिझेल आणि 400 पेट्रोल इंजिन वाहनांना परवाने दिले जाणार आहेत. पर्यटक आणि वाहनचालक 550 रुपये शुल्क भरून परमिट मिळवू शकतात.
=======
हे देखील वाचा : न्यूयॉर्क शहर बुडण्याचा धोका
=======
मनाली लेह महामार्ग (Manali-Leh route) हा उत्तर भारतातील हिमाचल प्रदेशातील मनाली आणि लडाखमधील लेह यांना जोडणारा महामार्ग आहे. वर्षातून फक्त चार-पाच महिने हा मार्ग पर्यटकांसाठी खुला करण्यात येतो. मनाली लेह मार्गाची (Manali-Leh route) सरासरी उंची 13000 फूट आहे. मार्गावर सर्वात जास्त उंची 17480 फूट, टांगलांगला पास येथे आहे. संपूर्ण मार्ग डोंगराळ भागात आहे. या मार्गावर अनेक ठिकाणी बर्फाचे प्रवाहच आहेत. हे प्रवाह थेट हिमनद्यांमधून येतात आणि त्यांचा वेगही खूप असतो. रोहतांग खिंड ओलांडून लाहौल-स्पीतीमधील चंद्रा व्हॅलीमध्ये प्रवेश केल्यावर चित्र एकदम बदलते. इथे पाऊस पडत नसल्याने हिरवळही नाही. पर्वत तपकिरी आणि कोरडे होतात. सुमारे 500 किलोमीटरचा हा मार्ग नैसर्गिक विविधतेनं सजलेला आहे. लेहला पोहचेपर्यंत संपूर्ण मार्गावर भव्य आणि विस्मयकारक दृश्ये भुरळ घालतात. यामुळेच प्रवासाची ज्यांना आवड आहे, त्यांच्यासाठी मनाली लेह मार्ग मोठे स्वप्न आहे. कुठे बर्फ, कुठे बर्फाचा प्रवाह, तर कुठे कोरडी जागा यामुळे हा सर्व मार्ग पर्यटकांना कायम खुणावत राहिला आहे. आता 1 जून पासून हा मार्ग खुला झाल्यानं पुन्हा या मार्गावर पर्यटकांची वर्दळ वाढणार आहे.
सई बने