महाशिवरात्रीसाठी देशभरातील शिवमंदिरांमध्ये तयारी सुरु झाली आहे. मात्र भारतातील काही प्रमुख मंदिरांमध्ये हा महाशिवरात्रीचा सोहळा सुरुही झाला आहे. आंध्र प्रदेशातील नांद्याल जिल्ह्यातील श्रीशैलम येथे असलेल्या भ्रमरम्बिका देवी मंदिर म्हणजेच भ्रमरम्बा मल्लिकार्जुन मंदिरात महाशिवरात्रीचा सोहळा सुरु झाला आहे. हे प्राचीन शिवमंदिर त्याच्या अनोख्या आख्यायिकांसाठी लोकप्रिय आहे. मंदिर १८ महाशक्ती पीठांपैकी एक असून हे मंदिर देवी पार्वतीच्या भ्रमरम्बा रूपाला समर्पित आहे आणि भगवान मल्लिकार्जुन म्हणजेच भगवान शंकरही या मंदिरात देवी शक्तीसह विराजमान आहेत. नल्लामला टेकड्यांमध्ये कृष्णा नदीच्या काठावर असलेले हे मंदिर १२ ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. देशभरातून भाविक भगवान शिवासह माता पार्वतीचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात येतात. या मंदिर संकुलात देवी पार्वती वेगवेगळ्या स्वरूपात विराजमान आहे. मंदिर संकुलाच्या मागील बाजूस सर्वशक्तिमान माता श्रीशैलम भ्रमरम्बा देवी म्हणून विराजमान आहे. देवीने येथेच मधमाशीचे रुप धारण करुन राक्षसाचा वध केल्याची आख्यायिका आहे.

आंध्र प्रदेशातील श्रीशैलम येथे कृष्णा नदीच्या काठावर असलेले श्रीशैलम भ्रमरम्बा देवी मंदिर हे द्रविड शैलीत बांधले गेले आहे. या मंदिराच्या चारही बाजूंनी अतिशय भव्य गोपुरम आहेत. द्रविड शैलीत बांधलेल्या या मंदिराच्या वास्तुशास्त्राचा अभ्यास आजही केला जातो. विशेष म्हणजे महाशिवारात्र, नवरात्र आणि कुंभम उत्सवामध्ये येथे भाविकांची मोठी गर्दी होते. यामुळे पहाटे तीन वाजल्यापासून मंदिराचे दरवाजे खुले कऱण्यात येतात. भल्या पहाटे मंत्रघोषाच्या स्वरात मंदिराचे दरवाजे उघडण्याचा हा सोहळा बघण्यासारखा असतो. आता या मंदिरात महाशिवरात्रीच्या सणासाठी हजारो भाविक रोज दाखल होत असून भगवान शंकर आणि शक्तीच्या रुपात असलेल्या माता पार्वतीचे दर्शन घेत आहेत. हे देशातील एकमेव ज्योतिर्लिंग आहे, जिथे भगवान शंकर हे माता पार्वतीसह विराजमान आहेत. म्हणूनही महाशिवरात्रीला या शिव शक्तीचे दर्शन घेण्यासाठी देशभरातील शिवभक्त भ्रमरम्बिका देवी मंदिरात दाखल होतात. या मंदिरात देवीची पूजा ब्राह्मणी शक्ती म्हणून केली जाते. देवीला रेशमी साड्या अर्पण केल्या जातात. मंदिराच्या गर्भगृहात ऋशी अगस्त्य यांच्या पत्नी माता लोपामुद्राची मूर्ती आहे. सोबतच गर्भगृहासमोर एक श्रीयंत्र स्थापित केले आहे. भ्रमरम्बा शब्दाचा अर्थ मधमाश्यांची आई असा होतो.
याबाबत सांगण्यात येणा-या आख्यायिकेनुसार अरुणासूर राक्षसाचा वध करण्यासाठी देवी भ्रमरम्बाने आठ पायांच्या मधमाशीचे रूप धारण केले. अरुणासूर नावाचा राक्षस भगवान ब्रह्माचा एक महान भक्त होता. त्याच्या अढळ भक्तीने प्रसन्न होऊन भगवान ब्रह्माने त्याला कोणताही दोन किंवा चार पायांचा प्राणी मारू शकणार नाही असे वरदान दिले. हे वरदान मिळाल्यावर अरुणासूर राक्षसाला आपला मृत्यू अशक्य असल्याची जाणीव झाली. त्यामुळे या राक्षसानं पृथ्वीवर मोठा विनाश सुरु केला. ऋषी, सामान्य नागरिकांना तो मारु लागला. एवढेच नाही, तर त्यानं स्वर्गावरही स्वारी केली. त्यामुळे घाबरलेल्या देवांनी माता पार्वतीकडे मदतीची मागणी केली. देवीनं मग या अरुणासूर राक्षसाचा वध करण्यासाठी आठ पाय असलेल्या मधमाशीचे रुप घेतले आणि अरुणासूर राक्षसाचा वध केला. त्यानंतर देवी श्रीशैलममध्ये भ्रमरंबिका म्हणून राहिली.
=======
हे देखील वाचा : Ekambareswarar Temple: भगवान शंकर आणि माता पार्वतीचं विवाह मंदिर
=======
आणखी एक आख्यायिका भ्रामरांबा देवी मंदिराबाबत सांगण्यात येते. भ्रमरांबा मंदिर हे एक शक्तीपीठही आहे. देवी सतीची मान श्रीशैलममध्ये पडल्याचे सांगण्यात येते. देवी सतीच्या शरीराचे अठरा भाग जिथे पडले तिथे शक्तीपीठ तयार झाले. त्यापैकी श्रीशैलम हे प्रमुख शक्तीपीठ म्हणूनही ओळखले जाते.
श्रीशैलम भ्रमरंबिका मंदिर त्याच्या वास्तुकलेसाठीही प्रसिद्ध आहे. येथील भव्य मंडपात भगवान गणेशाची मूर्ती गोपुरमवर स्थापित आहे. असे म्हटले जाते की, मंदिराच्या प्रवेशद्वारावर असलेले भगवान गणेश हे मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांच्या पापांची आणि पुण्यांची नोंद ठेवतात. मंदिर संकुलात अनेक लहान उप-मंदिरे देखील आहेत. मंदिर संकुलात नंदी मंडप, वीरशिरोमंडप, मल्लिकार्जुन मंदिर, सहस्र लिंगेश्वर, अर्धनारीश्वर, वीरभद्र, उमा महेश्वर आणि नवब्रह्म मंदिरे आहेत. सध्या या मंदिरामध्ये महाशिवरात्रीचा उत्सव सुरु झाला आहे. १५ फेब्रुवारी रोजी येथे भाविकांसाठी देण्यात येणा-या प्रसादाची तयारी सुरु असून हजारोंच्या संख्येनं येणा-या भाविकांचे नियोजन कसे करावे, यासाठी मंदिर प्रशासन तयारी करत आहे.
सई बने
