Home » Chennai : या मंदिरात आहे, भगवान श्रीकृष्णाचे पार्थसारथी रुप !`

Chennai : या मंदिरात आहे, भगवान श्रीकृष्णाचे पार्थसारथी रुप !`

by Team Gajawaja
0 comment
Share

श्री कृष्ण जन्माष्टमीचा उत्सव सर्वत्र साजरा करण्यात येत आहे. या कृष्णरंगात तामिळनाडूची राजधानी चेन्नईच्या त्रिपलिकेन भागात असलेले श्री पार्थसारथी मंदिर भाविकांच्या गर्दीनं गजबजून गेले आहे. भगवान विष्णूच्या पार्थसारथी रूपाला समर्पित असलेले हे ऐतिहासिक वारसा मंदिर देशभरात लोकप्रिय आहे. सहाव्या शतकातील या हिंदू वैष्णव मंदिराचा तमिळ संतांनी रचलेल्या ‘दिव्य प्रबंधम’ या पवित्र ग्रंथात उल्लेख आहे. ‘पार्थसारथी’ या शब्दाचा अर्थ ‘अर्जुनाचा सारथी’ असा आहे. हे मंदिर वैष्णव परंपरेतील तेनकलाई पंथाचे पालन करते. (Chennai) 

सहाव्या शतकात पल्लव राजवंशातील राजा नरसिंहवर्मन प्रथम यांनी बांधलेल्या या मंदिराचा विस्तार चोळ आणि विजयनगर राजांनी केला. या मंदिरात भगवान श्रीकृष्णाची विष्णू, पार्थसारथी, योग नरसिंह, राम, गजेंद्र वरदराज आणि रंगनाथ या पाच रूपांची पूजा केली जाते. हे मंदिर आणखी एक अद्वितीय वैशिष्ट्यासाठी ओळखले जाते. येथील भगवान श्रीकृष्णाची मुर्तीही मिशी असलेली आहे. शिवाय श्रीकृष्णाच्या हातात कोणतेही शस्त्र नाही. त्यामुळेच मिशीवाल्या श्रीकृष्णाचे मंदिर म्हणूनही स्थानिक या मंदिराचा उल्लेख करतात. जन्माष्टमीच्या निमित्तानं या मंदिराची सजावट केली आहे. या मंदिरातील श्रीकृष्ण जन्म सोहळा बघण्यासाठी देशभरातून लाखो भाविक चेन्नईमध्ये दाखल झाले आहेत. तामिळनाडूची राजधानी असलेल्या चेन्नईमध्ये असलेले श्री पार्थसारथी मंदिर हे भगवान विष्णूंना समर्पित असे 6 व्या शतकातील मंदिर आहे. तिरुवल्लीकेनीच्या परिसरात असलेल्या या मंदिराचा उल्लेख 6 व्या ते 9 व्या शतकातील अल्वर संतांच्या मध्ययुगीन तमिळ साहित्य संग्रह, नालयिर दिव्य प्रबंधममध्ये आढळतो. (Social News) 

हे पार्थसारथी मंदिर भगवान विष्णूंना समर्पित 108 दिव्य देसमांपैकी एक मानले जाते. पल्लवांचा राजा नरसिंहवर्मन पहिला याने बांधलेल्या या मंदिरात भगवान विष्णूंच्या पाच रूपांची प्रतिमा आहे. पार्थसारथी आणि योग नरसिंह देवस्थानांसाठी स्वतंत्र प्रवेशद्वार आणि ध्वजस्तंभ आहेत. या मंदिरात श्री कृष्ण, माता रुक्मिणी, मोठे बंधु बलराम, मुलगा प्रद्युम्न, नातू अनिरुद्ध आणि सत्यकीसह उभे असल्याचे दाखवण्यात आले आहे. हिंदू पौराणिक कथेनुसार, सप्तऋषींनी येथे पंचवीरांची पूजा केली आहे. महाभारतामध्ये, कौरवांशी झालेल्या युद्धात पांडव राजपुत्र अर्जुनाचा सारथी म्हणून भगवान विष्णू कृष्णाच्या अवतारात होते. युद्धादरम्यान कृष्णानी कोणतेही शस्त्र हाती घेतले नाही. अर्जुन आणि भीष्म यांच्यातील युद्धादरम्यान, कृष्ण भीष्मांच्या बाणाने जखमी झाले. (Chennai) 

या पार्थसारथी मंदिरातील प्रतिमा याच आख्यायिकेनुसार असल्याचे मानले जाते. हे मंदिर जिथे आहे, त्या जागेला अल्लिकेणी म्हणतात. म्हणजेच कमळांचे तळे. पार्थसारथी मंदिर जिथे आहे, त्या भागात असलेल्या तळ्यात भरपूर कमळ फुलं मिळत असत त्यावरुन हे नाव देण्यात आले होते. पार्थसारथी मंदिराची वास्तुकला अभ्यासण्यासाठी आणि मंदिर परिसरात असलेले शिलालेख बघण्यासाठी अनेक अभ्यासकही येथे गर्दी करतात. या मंदिरात 8 व्या शतकातील पल्लव राजा नंदीवर्मन यांचे शिलालेख देखील आहेत. तसेच दंतिवर्मन पल्लव, चोल आणि विजयनगर यांचे शिलालेख देखील मंदिरात बघायला मिळतात. श्री पार्थसारथी मंदिराचे गोपुरमही भव्य आहेत. हे गोपुरम पल्लव राजा तोंडाईमान चक्रवर्ती यांनी बांधले होते. बहुतांशी सर्वच चोल राजांनी आपापल्या काळात या मंदिराचा विस्तार केला, तसेच मंदिराचे सुशोभिकरण केले. विशेष म्हणजे, काही काळासाठी, ईस्ट इंडिया कंपनीने मंदिराचे व्यवस्थापन केले आहे. (Social News)

==============

हे देखील वाचा :  Ganesh Chaturthi : गणपती बाप्पाला दुर्वा का वाहिल्या जातात?

===============

स्वामी विवेकानंद हे भगवान पार्थसारथी यांचे भक्त होते. 1893 मध्ये त्यांनी त्यांचे शिष्य अलासिंगा यांना लिहिलेल्या पत्रात या मंदिराचा उल्लेख केला आहे. मंदिराच्या कॉरिडॉरच्या भिंतीवर हे पत्र आजही वाचावयास मिळते. श्री पार्थसारथी मंदिरात वर्षभर अनेक उत्सव साजरे केले जातात. यातील सर्वात महत्त्वाचा सण म्हणजे वैकुंठ एकादशी. या दिवशी केवळ चेन्नईहूनच नव्हे तर तामिळनाडू आणि भारतातील विविध भागांतूनही मोठ्या संख्येने भाविक मंदिरात येतात. शिवाय श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सवही येथे मोठ्या प्रमाणात साजरा होतात. या सर्वात भगवान विष्णुची वाद्यांच्या घोषात मिरवणूकही काढली जाते. हा सर्व सोहळा अत्यंत देखणा असतो, आणि तो बघण्यासाठी भारताच्या कानाकोप-यातून भाविक मंदिर परिसरात दाखल होतात. (Chennai) 

सई बने

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.