Home » ब्रिटनमध्येही श्रीलंकेसारखी परिस्थिती?

ब्रिटनमध्येही श्रीलंकेसारखी परिस्थिती?

by Team Gajawaja
0 comment
Rising Inflation
Share

ब्रिटनमध्येही श्रीलंकेसारखी परिस्थिती आलीय का, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे, त्याला कारण म्हणजे, ब्रिटनमधील सुपरमार्केटमध्ये वाढलेले भाज्या आणि फळांचे दर.  ब्रिटनमधील सुपरमार्केटमध्ये सध्या अत्यंत चढ्या दरात फळे आणि भाज्यांची विक्री होत आहे.  विशेष म्हणजे अनेक सुपरमार्केटमध्ये भाज्या उपलब्धही नाहीत. भाज्यांचे खाली असलेले रॅक बघून नागरिक नाराज होत आहेत, आणि ज्या ठिकाणी भाज्या उपलब्ध आहेत, तिथे त्या सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणा-या  दरात उपलब्ध नाहीत.  त्यामुळे ब्रिटनमधील वाढत्या महागाईची (Rising Inflation) चर्चा पुन्हा एकदा सुरु झाली आहे आणि श्रीलंकेला हसणा-या ब्रिटनवरही श्रीलंकेसारखी परिस्थिती आलीय का हा प्रश्न विचारला जात आहे.  

ब्रिटनमध्ये गेल्या काही महिन्यापासून महागाई (Rising Inflation) टोकाला पोहचली आहे. याबाबत तेथील नागरिकांनी मोर्चेही काढले आहेत.  तशातच बदलत्या हवामानाचा फटकाही ब्रिटनला बसला आहे.  एकूण या सर्व हवामान बदलाचा फटका तेथील शेती उत्पादनाला पहिला बसला आहे. परिणामी तेथील शेती उत्पादनात घट झाली असून कमी झालेल्या उत्पादनामुळे भाज्या आणि फळांचे दर हे आकाशाला भिडले आहेत.  एरवी आपण भारतात वाढत असलेल्या भाज्यांच्या दराबाबत बातम्या ऐकतो, पण ज्या देशानं आपल्या देशावर एकेकाळी राज्य केलं, त्या ब्रिटनची अवस्था सध्या भारतापेक्षा वाईट आहे.  कारण तिथे भाज्या आणि फळांचे दर एवढे वाढले आहेत की, सर्वसामान्यांना त्याचा मोठा फटका बसत आहे.  कडाक्याच्या उन्हाचा तडाखा बसलेल्या ब्रिटनला आता फळे आणि भाज्यांच्या टंचाईचा सामना (Rising Inflation) करावा लागत आहे. त्यामुळे ब्रिटनची अवस्था श्रीलंकेसारखी झाली आहे. ब्रिटनमध्ये टोमॅटोचा तुटवडा असल्याचे सांगण्यात येत आहे.  तेथील सुपरमार्केटमध्ये टोमॅटोचे शेल्फ रिकामे पडले आहेत.  सोशल मीडियावर अनेक युजर्सनी याबाबत पोस्ट शेअर केली आहे.  सोशल मिडियावर ब्रिटनमधील या भाज्या आणि फळांच्या रिकाम्या शेल्फबाबत सध्या चर्चा सुरु आहे.  केवळ टोमॅटोच नाही तर मॉल्समधील स्टोअरमधून बरेच काही नष्ट होत आहे.  आणि जे उपलब्ध आहे, त्याच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत.  त्यामुळे प्रगतीशील समजल्या जाणा-या ब्रिटनवर आता उतरती कळा लागली की काय अशी चर्चा सुरु झाली आहे.  

ब्रिटनमध्ये जेवढी मागणी आहे, तेवढ्या टोमॅटोच्या पिकाचे उत्पादन होत नाही.  त्यामुळे ब्रिटनमध्ये  मोरोक्को आणि स्पेनमधून टोमॅटोची आयात करण्यात येत आहे. गेल्या अनेक आठवड्यांपासून मोरोक्कोमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. याशिवाय स्पेनमध्येही मुसळधार पावसाने कहर केला आहे. या सर्वांचा फटका टोमॅटोच्या पिकाला बसला आहे.  अनेक ठिकाणी टोमॅटोचे पिक नष्ट झाले आहे.  त्यामुळे जो टोमॅटो ब्रिटनला पाठवण्यात येत होता, तो पाठवण्यास आणखी काही काळ विलंब लागण्याची शक्यता आहे.  या सर्वांचा परिणाम म्हणून ब्रिटनच्या सुपरमार्केटमध्ये दैनंदिन गरजेच्या भाज्याही ठराविक प्रमाणात विकण्यात येत आहेत. येथील असदा या मोठ्या सुपरमार्केटमध्ये काकडी, ब्रोकोली, फुलकोबी यांची विक्री मर्यादीत स्वरुपात करण्यात येईल असे जाहीर केले आहे.  याशिवाय सॅलेडसाठी वापरण्यात येणा-या भाज्याही येथे उपलब्ध नसल्याचे बोर्डच लावण्यात आले आहेत.  

========

हे देखील वाचा : शापित झरा, जनावर पाण्यात गेल्यानंतर बनतात दगडं

========

ब्रिटनमध्ये सर्वसाधारणपणे स्पेनमधून सर्वाधिक कृषी उत्पादने मागवण्यात येतात. मात्र तेथील हवामानाच्या बदलांमुळे शेती उत्पादने कमी झाली आहेत.  त्यातच ब्रिटनमध्ये शेतीचे काम मार्चच्या अखेरीस किंवा एप्रिलमध्ये सुरू होते. परंतु यावेळी प्रथमच ब्रिटनमध्येही  मजुरांची कमतरता जाणवू लागली आहे. त्यातच वाढलेल्या विजेच्या दराचा फटका आणि खतांच्या किंमतीही वाढल्यामुळे अनेक शेतक-यांनी शेतीउत्पादनाकडे पाठ फिरवली आहे. या सर्वांचा परिणाम म्हणजे ब्रिटनमधील शेती उप्तादनात कमालीची घट झाली आहे. विशेष म्हणजे तेथील समारंभामध्येही सॅलड आणि तस्सम पदार्थ आता ठेवले जात नाहीत. याचीच सोशल मिडीयावर खिल्ली उडवण्यात येत आहे.  ब्रिटनच्या सुपरमार्केट गटांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ब्रिटीश रिटेल कन्सोर्टियमचे संचालक अँड्र्यू ओपी यांना यासंदर्भात ब्रिटनच्या मिडीयानं घेरलं.  तेव्हा त्यांनी दक्षिण युरोप आणि उत्तर आफ्रिकेतील कठीण हवामान या सर्वांचा फटका भाजीपाला आणि फळांच्या उत्पादनाला बसला असून त्यामुळेच ब्रिटनमध्येही भाज्यांचे उत्पादन कमी झाल्याचे सांगितले आहे. तसेच काही महिन्यात ही परिस्थिती सुधारेल आणि भाज्यांचे वाढलेले दर कमी होतील, असे आश्वासन दिले आहे. एकूण काय सायबाचा देश म्हणून ओळखल्या जाणा-या ब्रिटनची परिस्थिती सध्या इतर देशांपेक्षा वाईट झाली आहे.

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.