राजस्थानच्या सीकर जिल्ह्यातील श्री खाटू श्याम मंदिर (Khatu Shyam Temple) हे जगप्रसिद्ध आहे. महाभारतकालीन इतिहास असलेल्या या मंदिराला भेट देण्यासाठी जगभरातून भाविक येतात. श्री खाटू श्याम यांना द्वापारयुगात श्रीकृष्णाकडून वरदान मिळाले आहे. कलियुगात त्यांची श्याम नावाने पूजा केली जाईल असे वरदान श्रीकृष्णाकडून मिळाले आहे. या मंदिराला उत्सवादरम्यान दरदिवशी हजारो भाविक श्री खाटू श्याम मंदिराला भेट देतात. उत्सवादरम्यान मंदिराला भेट देण्यासाठी भाविक पालखीही काढतात. हजारो भाविक अनेक किलोमिटर पदयात्रा करुन या मंदिराला भेट देतात. आता याच श्री खाटू श्याम मंदिराचा नव्यानं जिर्णोद्धार करण्यात येणार आहे. येथे येणा-या भाविकांची सोय होण्यासाठी श्री खाटू श्याम मंदिराभोवती कॅरिडॉर बांधण्यात येणार आहे. या मंदिर परिसरात भाविकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र मंदिराकडे जाण्याचा मार्ग अगदी लहान आहे. तसेच या मार्गावर पूजा साहित्य विकणा-यांची गर्दी आहे. त्यामुळे उत्सवादरम्यान या भागात मोठी गर्दी होती. हा कॅरिडॉर झाल्यावर हा सर्व मार्ग प्रशस्त होणार असून त्यामुळे श्री खाटू श्याम मंदिर आणि भीमकुंडाकडे जाणा-या भाविकांची सोय होणार आहे.
श्री खाटुश्याम मंदिरामध्ये (Khatu Shyam Temple) होणा-या या कॉरिडॉर मधून व्हीव्हीआयपी आणि सामान्य भाविकांसाठी वेगळा मार्ग असणार आहे. पार्किंगमधून भाविक थेट मंदिराजवळील लखदातार मैदानावर पोहचणार आहे. सुमारे 3.5 किलोमीटर लांबीच्या या कॉरिडॉरसाठी 57.60 मीटर रुंदीची जमीन हस्तांतरीत केली जात आहे. या कॉरिडॉरमध्ये ग्रीन बेल्टही असणार आहे. ग्रीन बेल्टची रुंदी 27.6 मीटर असणार आहे. या सर्व मार्गावर भाविकांना सावली मिळेल अशी झाडे लावण्यात येणार आहे. राजस्थानमधील सीकर जिल्ह्यात उष्णतेचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे या मंदिरात येणा-या भाविकांना हा उष्णतेचा त्रास होऊ नये म्हणून हा ग्रीन बेल्ट विकसित करण्यात येणार आहे.
याशिवाय सात ते सात मीटर रुंदीचे दोन रस्ते करण्यात येणार आहेत. यातील एक व्हीव्हीआयपींची राखीव असेल तर दुसरा सर्वसामान्य भाविकांसाठी खुला करण्यात येणार आहे. हा कॉरिडॉर लखदाता मैदानापर्यंत बांधण्यात येणार आहे. या सर्व मार्गाच्या भूसंपादनासाठी 32 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.यासाठी राज्यसरकारनं तरतूद केली असून काही खर्च हा श्री खाटू श्याम मंदिरातर्फेही (Khatu Shyam Temple) करण्यात येणार आहे. श्री खाटू श्याम मंदिरात (Khatu Shyam Temple) फाल्गुन महिन्यात लाखी मेळा होतो. या मेळ्यासाठी जगभरातून आलेल्या भाविकांची मोठी गर्दी होते. या सर्वांमुळे या भागात वाहनांची आणि त्यांच्या भाविकांची मोठी गर्दी होते. पर्यायी स्थानिकांची मोठी गैरसोय होते. त्यामुळे या भागाचा विकास करण्याची मागणी करण्यात येत होती. आता हा कॅरिडॉर झाल्यावर स्थानिक आणि बाहेरुन येणा-या भाविकांची सोय होणार आहे.
श्री खाटु श्याम मंदिराला (Khatu Shyam Temple) दिवसभरात साधारण 20,000 भाविक मंदिराला भेट देतात. उत्सव आणि सुट्टीच्या काळात ही संख्या लाखापर्यंतही पोहचते. देवठाणी एकादशीला खातुश्याम बाबांचा जन्मदिवस साजरा होतो. तेव्हा तर भाविकांचा आकडा 10 लाखांच्या पार जातो. आता कॅरिडॉरचे काम करतांना भाविकांचा हा वाढता आकडा लक्षात घेण्यात येणार आहे. श्री खाटू श्यामबाबांची अनोखी कथा महाभारत काळापासून सुरू होते. त्यांना पूर्वी बार्बरिक या नावाने ओळखले जात होते. बार्वरिक हे भीम यांचे नातू. ते लहानपणापासूनच खूप शूर आणि महान योद्धे होते. त्यांनी युद्धाची कला आई आणि श्रीकृष्ण यांच्याकडून शिकून घेतली. घोर तपश्चर्या करून महादेवाला प्रसन्न करून तीन अखंड बाण मिळवले. माता दुर्गेने प्रसन्न होऊन त्यांना एक धनुष्य दिले होते. हे वीर पराक्रमी बार्बरिक महाभारत युद्धात सहभागी होण्यासाठी युद्धभूमीवर आले. मात्र त्यांच्या आईनं त्यांना हरलेल्या बाजूस पाठिंबा देण्याचे आदेश दिले होते. बार्बरिक माताभक्त होते.
======
हे देखील वाचा : रोगांपासून मुक्त करणारी शिमल्याची हटेश्वरी माता
======
भगवान श्रीकृष्णाला बार्बरिकांचे हे रहस्य माहित होते. बार्बरिक यांनी त्यांच्याजवळील तिन्ही बाण वापरल्यास संपूर्ण विश्वाचा नाश होईल. हे जाणून भगवान श्रीकृष्णाने त्यांच्यांकडे त्यांचे मस्तक देण्याची मागणी केली. यामागचा हेतू श्रीकृष्णानं सांगितल्यावर बार्बरिक आपला बळी देण्यासाठी तयार झाले. तेव्हा श्रीकृष्णानं त्यांना युद्धातील सर्वोत्तम वीर ही पदवी दिली. वीर बर्बरिकच्या महान बलिदानावर श्रीकृष्णाने खूप प्रसन्न होऊन वरदान दिले की, कलियुगात तू श्याम या नावाने ओळखला जाशील आणि तुझी पुजा करणारा मोठा भाग्यवान असेल. बार्बरिक यांचे मस्तक खातू नगर म्हणजेच सध्याचा राजस्थान राज्यातील सीकर जिल्हा असल्याचे सांगण्यात येते. याठिकाणी महाभारत काळात मंदिर बांधण्यात आले. त्यानंतर त्याचा जिर्णोद्धारही झाला. आता या मंदिराची ख्याती जगभरात झाली आहे. येथील भीमकुंडही भाविकांसाठी श्रद्धास्थान आहे. आता याच मंदिराभोवती कॅरिडॉरची उभारणी झाल्यावर श्री खाटू श्यामबाबांच्या दर्शनाला येणा-या भाविकांची संख्या वाढणार आहे.
सई बने