Home » नागरिकांवर स्प्रिंग इन्फ्लूएंझाचा विळखा…

नागरिकांवर स्प्रिंग इन्फ्लूएंझाचा विळखा…

by Team Gajawaja
0 comment
Spring influenza
Share

देशात तापाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. अनेक लोक खोकला आणि सर्दीने त्रस्त आहेत. विशेष म्हणजे खोकला पकडला तर तो लवकर जात नाही. काही वेळा औषधेही काम करत नाहीत. तज्ज्ञांच्या मते रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे या तापाच्या रुग्णांची संख्या मोठ्या संख्येनं वाढत आहे. या रुग्णांना ताप आणि खोकला यांचा त्रास जाणवतो.  हे तापाचे रुग्ण मोठ्या संख्येनं वाढत असल्यामुळे पुन्हा एकदा कोरोनासारखे महामारीचे संकट तर आपल्या देशावर नाही ना, अशी शंका येत आहे. या तापाच्या वाढत्या संख्येमुळे मान्यवर डॉक्टरांनीही काळजी घेण्याचे आवाहन करीत स्वच्छतेबाबतच्या सूचना दिल्या आहेत. वेगानं या वाढणा-या तापाला H3N2 इन्फ्लूएंझा (Spring influenza) संसर्ग असे नाव देण्यात आले आहे.  हा विषाणू नवीन नसला तरी दरवर्षी त्याचा संसर्ग नव्यानं पुढे येत आहे. कोरोनानंतर रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेल्यांना याचा संसर्ग पटकन होत असल्याचे आढळून आले आहे.  हा विषाणू प्राणघातक नसला तरी कोरोनाप्रमाणेच यावर वेळीच योग्य उपचार न केल्यास तो जीवघेणा ठरू शकतो.  कारण त्यामुळे श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे डॉक्टरांनी या तापाची लक्षणे दिसताच वेळीच औषधोपचार करण्याचा सल्ला दिला आहे.  

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, H3N2 गेल्या दोन-तीन महिन्यांपासून सार्वजनिक आरोग्यासाठी धोकादायक आहे.  H3N2 इन्फ्लूएंझा (Spring influenza) देखील कोरोनाप्रमाणे पसरतो आणि लोकांना संक्रमित करतो. या तापाची संक्रमित व्यक्ती खोकते, शिंकते त्याचप्रमाणे H3N2 इन्फ्लूएंझा (Spring influenza) देखील पसरतो आहे.  ताप, घसादुखी, अंगदुखी आणि नाकातून पाणी येणे ही त्याची लक्षणे आहेत. हा एक प्रकारचा इन्फ्लूएंझा व्हायरस आहे. H3N2 इन्फ्लूएंझा (Spring influenza) हा संसर्गजन्य रोग आहे.  त्यामुळे त्याला टाळण्याचा पहिला उपाय म्हणजे गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे आणि हे टाळणे शक्य नसेल तर मास्कचा वापर आवश्यक आहे. याबरोबरच काही अन्य सूचनाही देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये, बाहेर लोकांशी हस्तांदोलन टाळा, बाहेरून आल्यानंतर हात, चेहरा स्वच्छ धुवा. शक्य असेल तर संपूर्ण शरीराची स्वच्छता कोमट पाण्यानं करा. डोळे आणि तोंडाला वारंवार स्पर्श करणे टाळा, भरपूर पाणी प्या, शक्यतो सूप, ताक आदींचे सेवन करा. थेट फ्रिजमधून काढलेले पाणी पिऊ नका,  तसेच बर्फ खाणेही टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  एवढी काळजी घेऊनही खोकला, अंगदुखी आणि सर्दी झाल्यासारखे वाटत असेल तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  या तापात काही घरगुती औषधांची मदत घेता येईल. 

======

हे देखील वाचा : जगातील सर्वाधिक मोठी स्मशानभूमी

======

पण त्यावर अवलंबून न रहाता प्रथम डॉक्टरांची मदत घ्या आणि त्याच्या सोबत घरगुती औषधांचे सेवन करा असे आवाहन करण्यात आले आहे.  असा ताप आलेल्या रुग्णांनी आलं, तुळशीची पानं टाकून केलेला काढा घेतल्यास त्याचा फायदा होऊ शकतो.  शिवाय हळदीचे दूध प्यायल्यानेही आराम पडू शकतो.  मुळात आजार होऊच नये म्हणून या सर्वांचा वापर नियमीत केल्यास त्याचाही फायदा होऊ शकतो.  देशाच्या विविध भागांतून इन्फ्लूएंझाची अनेक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. या आजाराने आजारी पडल्यानंतर बराच काळ खोकला, ताप, अंगदुखी आणि इतर लक्षणांमधून रुग्ण जात आहेत.  काही लोकांमध्ये तापासोबत फुफ्फुसाचा संसर्गही दिसून येतो. प्रदूषणामुळे लोक आजारांना बळी पडत असल्याचे काही आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. इंडियन मेडिकल असोसिएशननेही या तापाच्या बाबत सांगितले आहे की,  हा तीन दिवसांत बरा होतो. तथापि, खोकला तीन आठवड्यांपर्यंत टिकू शकतो.  वायूप्रदूषणामुळे या तापाचे प्रमाण  वाढले आहे. समितीने म्हटले आहे की,  या तापाचे  बहुतेक रुग्ण 15 वर्षांपेक्षा कमी आणि 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये आठळले आहेत.  दरम्यान इन्फ्लूएंझा (Spring influenza) ए विषाणूमुळे देशभरात फ्लूच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ झाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अधिका-यांची बैठक घेऊ आवश्यक ती उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.  जागतिक आरोग्य संघटनेनंही या तापाच्या साथीची दखल घेत आवश्यक ती उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे.  

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.