Home » दगडांच्या रचनेने उभारलेल ‘हर्षद माता मंदिराची’ खासियत ….

दगडांच्या रचनेने उभारलेल ‘हर्षद माता मंदिराची’ खासियत ….

by Team Gajawaja
0 comment
Harshad Mata Temple
Share

राजस्थानच्या दौसा जिल्ह्यातील हर्षद माता मंदिरात(Harshad Mata Temple) नवरात्रीच्या निमित्ताने भक्तांची गर्दी झाली आहे. दगडी वास्तुकलेसाठी ओळखले जाणारे हे मंदिर आता भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या ताब्यात आहे.  चौहान वंशाचा राजा चांद याने आठव्या-नवव्या शतकात येथे देवीचे भव्य मंदिर बांधले. यात असलेली देवीची मुर्ती निलमपासून तयार केलेली होती. राजा चांद हा तत्कालीन अभाणेरीचा अधिपती होता.  त्यावेळी आभाणेरी आभा नगरी म्हणून ओळखली जात होती. या भव्य मंदिराला तुर्क आणि मुघल आक्रमकांनी नष्ट केले. या मुघल आक्रमकांनी फक्त मंदिरच नष्ट केले नाही तर मंदिरावर केलेल्या कलाकृतीही पूर्णपणे नष्ट केल्या. उद्ध्वस्त केलेल्या या मंदिराच्या दगडांचा एक डोंगर रचण्यात आला.  नंतर स्थानिक लोकांनी हे मंदिराचे तुटलेले दगड गोळा केले आणि एकमेकांवर रचून पुन्हा मंदिराची उभारणी केली. तेच आताचे हर्षद माता मंदिर.  1300 वर्षांपूर्वी चुना किंवा सिमेंटशिवाय फक्त दगडांनी बांधलेल्या या मंदिराचा महिमा अगाध आहे. अनेक आक्रमणं सहन करुनही या मंदिराची वास्तू कधीही पडली नाही. ही सर्व देवीची कृपा असल्याचे स्थानिक मानतात.  त्यामुळे या देवीच्या दर्शनासाठी सदैव भक्तांची गर्दी असते.  आता नवरात्रीमध्ये येथे नऊ दिवस मोठी यात्रा भरलेली आहे. 

राजस्थानच्या दौसा जिल्ह्यातील आभाणेरी येथील हर्षद माता मंदिराचा(Harshad Mata Temple) इतिहास आणि देवीचा चमत्कार भाविकांना आकर्षित करतो. सुमारे 1300 वर्षे जुन्या हर्षद माता मंदिरात भक्तांची कायम गर्दी असते. 8व्या शतकात बांधलेल्या या मंदिरात हर्षद मातेची नीलम मूर्ती स्थापन करण्यात आली होती. ही मूर्ती कोणत्याही आपत्तीपूर्वी आजूबाजूच्या गावातील लोकांना सावध करत असे. मात्र 52 वर्षांपूर्वी ही नीलमची मूर्ती चोरीला गेली. तेव्हापासून येथे देवीची दुसरी मुर्ती बसवण्यात आली आहे.

हर्षद माता मंदिराचे(Harshad Mata Temple) बांधकाम हे भारतीय स्थापत्यकलेचे अनोखे रुप आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराच्या बांधकामात कोठेही चुना किंवा सिमेंटचा वापर केलेला नाही.  स्थानिक लोक सांगतात की कितीही मोठे वादळ आले तरी मंदिराचा एकही दगड कधीच आपल्या जागेवरून हलत नाहीत. या मंदिराच्या समोर चांदबावडी आहे. ही चांदबावडी आणि हर्षद माता मंदिर हे दोन्ही पुरातत्व विभाग, भारत सरकारद्वारे संरक्षित स्मारके म्हणून जाहीर करण्यात आले आहे. 

हर्षद माता म्हणजे आनंद देणारी देवता. राजा चांदचे आपल्या प्रजेवर खूप प्रेम होते. राजा स्वतः स्थापत्यकलेचा जाणकार आणि प्रेमी होता. तसेच राजा देवी दुर्गेचाही उपासक होता. आपल्या राज्यावर देवीचा कायम आशीर्वाद रहावा म्हणून त्याने येथे दुर्गामातेचे मंदिर बांधले. राजा चांदसह संस्थानातील लोकांचा विश्वास होता की राज्याची समृद्धी आणि आनंद ही देवी दुर्गेची देणगी आहे. या विचाराने दुर्गेचे हे मंदिर हर्षद म्हणजेच ‘हर्ष की दात्री’ म्हणूनही ओळखले जाऊ लागले. पुढे याचे नाव हर्षद माता मंदिर असे पडले. या मंदिरासमोर भगवान हनुमानाचे छोटेसे मंदिर आहे. हे मंदिर प्रसिद्ध चांद बावडी आणि हर्षद माता मंदिराच्या मधोमध आहे. मंदिराचा दरवाजा भव्य आणि लोखंडी आहे.

==========

हे देखील वाचा :रघुवंशीयांची कुलदेवी असलेल्या ‘या’ देवीचे स्थान

=========

मंदिरात आल्यावर प्रथम मंदिराबाबतची माहिती वाचायला मिळते. पुरातत्व विभागानं एका मोठ्या फलकावर मंदिराचा इतिहास लिहिलेला आहे.  यात हे मंदिर महामेरू शैलीचे असल्याचा उल्लेख आहे. मंदिराच्या  गर्भगृहात प्रदक्षिणा मार्ग आहे. मंदिराचा घुमटही पूर्णपणे रचलेल्या दगडांनी उभारण्यात आला आहे. तसेच मंदिराच्या प्रत्येक दिशेला अत्यंत सुंदर अशा प्रतिमा ठेवण्यात आल्या आहेत. परिक्रमा मार्गावर असलेल्या खांबांवर कोरलेली शिल्पे बसवली आहेत. हे सर्व तुटलेले हजारो दगड पाहून मुळ मंदिर किती अप्रतिम असेल याचा अंदाज येतो.  मंदिराचा मुख्य मंडप भव्य शिल्पे आणि खांबांनी अद्भूतपण उभारला आहे. मंदिराच्या भव्य मोकळ्या प्रांगणात खांब आणि भिंतींवर नक्षीकाम असून त्यावरही शिल्पे पाहायला मिळतात. या मंदिराचे सध्याचे सौंदर्य पाहून जुन्या काळातील मंदिराच्या वैभवाचा अंदाज येतो. आपल्या पूर्वजांच्या वैभवाचा समृद्ध वारसा म्हणून आता या हर्षद माता मंदिराकडे (Harshad Mata Temple)बघितले जाते.

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.