इंग्लडच्या राजघराण्यातला वादग्रस्त असा राजकुमार प्रिन्स हॅरी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. प्रिन्स हॅरी यांनी राजघराण्यातील सर्व पदांचा आणि त्याच्या कर्तव्याचा त्याग केला आहे. मात्र काही ना काही कारणांनी इंग्लडचे राजघराणे आणि त्यांचा हा राजकुमार यांच्यात कायम वादाचे नाते कायम राहीले आहे. प्रिन्स हॅरीनं राजघराण्याचे नियम अनेकवेळा तोडले आहेत. अमेरिकन अभिनेत्री मेघन मार्कलसोबत विवाह करत तर त्यांनी अनेकांची नाराजी ओढून घेतली. आता तर प्रिन्स हॅरीनं राजघराण्यातला अनेक रुढी परंपरावर एक पुस्तकच लिहिलं आहे.10 जानेवारीला प्रकाशित झालेल्या स्पेअर (Spare) नावाच्या या पुस्तकात त्यानं आपल्या कुटुंबाबाबत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. हॅरीचे हे स्पेअर पुस्तक सध्या विक्रमी ठरलं आहे. एका दिवसात 1.4 दशलक्षाहून अधिक प्रती या स्पेअरच्या विकल्या गेल्या आहेत. स्पेअरने अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या 2020 मध्ये प्रकाशित झालेल्या ‘अ प्रॉमिस्ड लँड’ या पुस्तकाचा विक्रम मोडला आहे.

प्रिन्स हॅरीच्या राजघराण्याबाबातच्या वादग्रस्त आठवणी असलेल्या स्पेअर या पुस्तकाने आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. गिनीज बुक ऑफ इंडियाच्या मते, युनायटेड किंगडम, युनायटेड स्टेट्स आणि कॅनडामध्ये स्पेअरच्या प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी 1,430,000 प्रती विकल्या गेल्या. यासह, हे आतापर्यंतचे सर्वात जलद विकले जाणारे नॉन-फिक्शन पुस्तक बनले आहे. प्रिन्स हॅरीच्या ‘स्पेअर’ने (Spare) अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या 2020 मध्ये प्रकाशित झालेल्या ‘अ प्रॉमिस्ड लँड’ या पुस्तकाचा विक्रम मोडला आहे. आकडेवारीनुसार, ‘अ प्रॉमिस्ड लँड’ रिलीज झाल्याच्या पहिल्याच दिवशी 8,87,000 प्रती विकल्या गेल्या. ‘स्पेअर’च्या दोन लाख प्रती अमेरिकेत छापल्या गेल्याचे प्रकाशक सांगतात. मात्र, मोठ्या मागणीनंतर पुनर्मुद्रण करण्यात आले आहे. पुस्तकाच्या मुखपृष्ठाची किंमत यूएसमध्ये $36 (रु. 2,926) आणि यूकेमध्ये £28 (रु. 2,783) आहे. त्याचवेळी, अमेरिकेच्या काही मोठ्या पुस्तकांच्या दुकांनामध्ये स्पेअर्सवर 50 टक्क्यांपर्यंत सूट देण्यात आली आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल ओबामा यांच्या ‘बिकमिंग’ या पुस्तकाच्या एका आठवड्यात 14 लाख प्रती विकल्या गेल्या. त्यालाही स्पेअरनं मात दिली आहे.
इंग्लंडचे प्रिन्स हॅरी यांनी त्यांच्या ‘स्पेअर’ या पुस्तकात राजघराण्यातील अनेक रुढी परंपरांचा उल्लेख केला आहे. प्रिन्स हॅरी आणि त्याची पत्नी मेघन मार्कल यांना आलेला अनुभव व्यक्त केला आहे. तरीही हॅरीच्या मते या पुस्तकात अनेक गोष्टींचा उल्लेख केला नाही. कारण ही रहस्ये प्रकाशित झाल्यानंतर त्याचे वडील राजा चार्ल्स आणि त्याचा मोठा भाऊ विल्यम त्याला कधीही माफ करणार नाहीत, अशी भीती वाटत होती. आपल्या कुटुंबानं आपल्यावर बहिष्कार टाकला असता. त्यामुळेच मी पुस्तकात वडील, भाऊ आणि अन्य कुटुंबियांनी मला दिलेली वागणूक या पुस्तकात मांडली नसल्याचे प्रिन्स हॅरीनं सांगितले आहे. प्रिन्स हॅरीनं टेलीग्राफला दिलेल्या मुलाखतीत याबाबत त्याची भूमिका स्पष्ट केली आहे. माझ्या आणि माझ्या भावामध्ये अनेक गोष्टी घडल्या. माझ्या वडिलांसोबतही अनेक गोष्टी घडल्या. पण या सगळ्या गोष्टी जगाला कळू नयेत, असं मला वाटतं, म्हणून मी पुस्तकात या गोष्टींना स्थान दिलेलं नाही. असे असले तरी हॅरीनं स्पेअरमध्ये अशा अनेक गोष्टी लिहिल्या आहेत, ज्यामुळे ब्रिटनच्या राजघराण्यात त्याच्याबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
प्रिन्स हॅरीचे हे स्पेअर (Spare) पुस्तक सुरुवातीला 800 पानांचे लिहिले होते. पण नंतर त्यातून अनेक गोष्टी काढून टाकण्यात आल्या. या गोष्ट वादग्रस्त होत्या. त्यामुळे जवळपास 400 पानं कमी झाली. आता स्पेअर हे पुस्तक 400 पानांचे झाले आहे. या पुस्तकाचा काही भाग प्रकाशनाआधीच उघड झाला होता. तसेच प्रिन्स हॅरीनं काही वृत्तवाहिन्यांना मुलाखतही दिली होती. त्यातून त्यांनी स्पेअरमध्ये (Spare) काय आहे, हे आधीच उघड केले होते. प्रिन्स हॅरीने राजघराण्याला त्याची पत्नी मेघन मार्कलची माफी मागायला सांगितले आहे. एवढ्यावरच प्रिन्स हॅरी थांबला नाही. त्यानं आपला मोठा भाऊ प्रिन्स विल्यमच्या मुलांची काळजी वाटत असल्याचे सांगितले आहे. विल्यमच्या 3 पैकी 1 मुलाची अवस्था माझ्यासारखीच होणार आहे. त्यामुळे मला त्याची काळजी वाटत असल्याचे प्रिन्स हॅरी यांनी जाहीर मुलाखतीत सांगितले आहे. अर्थात प्रिन्स हॅरीच्या पुस्तकावर एकही प्रतिक्रिया व्यक्त न करणा-या प्रिन्स विल्यमनं त्याच्या मुलांबाबतच्या हॅरीच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. त्यानं माझ्या मुलांची काळजी घेण्यासाठी मी समर्थ असल्याचे वक्तव्य केले आहे.
========
हे देखील वाचा : सूर्यास्त ते सुर्योदयापर्यंत न अन्न न पाण्याचे सेवन, असे असते जैन साधुंचे आयुष्य
========
या पुस्तकात प्रिन्स हॅरीनं प्रिन्स विल्यमबाबत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. मोठा भाऊ प्रिन्स विल्यम याने आपल्यावर प्राणघातक हल्ला केल्याचा उल्लेख या पुस्तकात करण्यात आला आहे. प्रिन्स हॅरीने स्पेअरमध्ये (Spare) सांगितले की, जेव्हा प्रिंसेस डायना म्हणजेच त्याची आई मरण पावली तेव्हा राजा चार्ल्सने त्याला मिठीही मारली नाही. हॅरीने पुस्तकात खुलासा केला की त्याने वयाच्या 17 व्या वर्षी पहिल्यांदा ड्रग्ज घेतले होते. हॅरीने पुस्तकात असेही लिहिले की प्रिन्स हॅरी आणि प्रिन्स विल्यम यांना कॅमिला आवडत नव्हती. दोन्ही भावांनी त्यांच्या वडिलांना म्हणजे राजा चार्ल्स यांना कॅमिला पार्करबरोबर लग्न करू नका असे सांगितले. याशिवाय प्रिन्स विल्यमबाबत त्यांनी अनेकवेळा नाराजी व्यक्त केली आहे. अगदी पहिल्यांदा हॅरी विल्यम शिकत असलेल्या इटन कॉलेजमध्ये गेल्यावर प्रिन्स विल्यमनं त्याबाबत नाराजीही व्यक्त केली होती.
प्रिन्स हॅरीने आपल्या ‘स्पेअर’ (Spare) या चरित्रात राजघराण्यातील अनेक महत्त्वाची गुपिते उघड केली आहेत.अगदी राजघराण्यातील वक्तींच्या खाण्यापिण्याची आपड ते त्यांच्या कपड्यांवर होणार खर्च….प्रिन्स हॅरीनं या सर्व गोष्टींचा उल्लेख केलेलं स्पेअर (Spare) हे पुस्तक सध्या सर्वाधिक खपाचे पुस्तक झाले आहे. मात्र या सर्वात ब्रिटनच्या राजघराण्याची प्रिन्स हॅरीबाबत असलेली नाराजी अधिक वाढली आहे आणि प्रिन्स हॅरीला राजघराण्याचे सर्व दरवाजा बंद झाल्याची चर्चा आहे.
सई बने