जागतिक महासत्ता नेमकी कोणाकडे आहे, यासाठी वर्चस्वाची लढाई सुरु झाली आहे. अमेरिका स्वतःला महासत्ता म्हणवून घेत असताना आता चीननं अमेरिकेच्या वर्चस्वाला आव्हान द्यायला सुरुवात केली आहे (War). याचाच एक भाग म्हणजे थेट अमेरिकेच्या महत्त्वाच्या स्थळांवर जाऊन हेरगिरी करण्यात आली. चीननं खास उपकरणं लावलेले फुगे अमेरिकेच्या सुरक्षा संदर्भात काम करणा-या कार्यालयांच्या वर सोडल्यामुळे खळबळ उडाली होती. यामुळे झालेले वादळ कमी होते तोच पुन्हा चीन आणि अमेरिकेमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. आता चीनचा गुप्त उपग्रह अमेरिकेच्या लष्करी उपग्रहांची हेरगिरी करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यावरुनच या दोन देशात अवकाश युद्ध सुरू झाल्याची ही नांदी आहे का, हा प्रश्न विचारण्यात येत आहे. (War)

चीन अंतराळात अमेरिकन उपग्रहांची हेरगिरी करत असल्याची माहिती पुढे आली आहे. काही महिन्यांपूर्वी, एका गुप्त चिनी उपग्रहानं अमेरिकेच्या लष्करी उपग्रहांची पाहणी केल्याचे स्पष्ट झाले आहे. ही घटना पृथ्वीच्या कक्षेत घडली. अमेरिकन अंतराळ संस्था, नासानं ही माहिती उजेडात आणली आहे. या घटनेनंतर आता नासाकडून चिनी उपग्रहांच्या हालचालींवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. वास्तविक अमेरिका, रशियन आणि चिनी उपग्रह या कक्षेत एकमेकांची माहिती गोळा करण्यासाठी स्पर्धा करत असतात. पण कोणीही उघडपणे अशी खेळी करत नाही. मात्र यावेळी चीननं सर्व नियम मोडून थेट अमेरिकेच्या उपग्रहाची पाहणी केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. चीन वारंवार अमेरिका त्रस्त होईल अशी भूमिका घेत आहे. यामुळे दोन्ही देशांमधील तणावात मात्र अधिक भर पडली आहे. आता अमेरिकेन याबाबत जाहीर आरोप करत चीनी उपग्रहांवर नजर ठेवायला सुरुवात केल्यावर चीनचे परराष्ट्र मंत्री किन गँग यांनी एका पत्रकार परिषदेत अमेरिकेला इशाराच दिला आहे. अमेरिकेने चीनबद्दलचा आपला वाईट दृष्टीकोन बदलावा, अन्यथा दोन्ही देशांमधील वाद वाढू शकतो. चीनला चिरडून अमेरिका कधीही पुढे जाऊ शकत नाही. असे सांगून या किन गॅंग यांनी अमेरिका कधीही चीनचा विकास रोखू शकणार नाही, असे स्पष्ट केले आहे. (War)
वास्तविक पृथ्वीच्या भूस्थिर कक्षेत फिरणाऱ्या उपग्रहांवरुन आता महासत्ता नेमकं कोण आहे, हे ठरणार आहे. कारण काही वर्षानी युद्ध झाल्यास ते या उपग्रहांच्या गतीवर अवलंबून असेल. त्यामुळेच प्रत्येक देश आपल्या उपग्रहाची खास काळजी घेत असतो. त्यातील तंत्रज्ञान शत्रू राष्ट्रांच्या नजरेस पडणार नाही, इतपत ती काळजी घेतली जाते. अमेरिका, चीन, रशिया, भारत, जपान, जर्मनीसह अनेक देश अशी काळजी घेत आहेत. मात्र आता चीननं या सर्वांवर कुरघोडी करत थेट अमेरिकन उपग्रहांची हेरगिरी केली आहे. एका चिनी उपग्रहानं अमेरिकन उपग्रहांची हेरगिरी केल्याची माहिती उघड झाल्यावर एकच खळबळ उडाली आहे. TJS-3 नावाच्या या उपग्रहाचे वर्णन चीनने प्रायोगिक संचार उपग्रह असे केले जाते. 2018 च्या उत्तरार्धात जिओस्टेशनरी ऑर्बिटमध्ये प्रक्षेपित करण्यात आले. यानंतर त्यातून आणखी एक छोटा उप उपग्रह बाहेर आला. TJS-3 ची क्षमता वाढवण्यासाठी हा छोटा उपग्रह पाठवण्यात आल्याची माहिती आहे. चीन यामुळे अमेरिकन उपग्रहावर नजर ठेऊ शकतो. चीनच्या या कृतीमुळे आता थेट अंतराळात युद्ध होणार का, हा प्रश्न विचारला जात आहे. ऑर्बिटल फोकल नावाच्या ट्विटर अकाऊंटने अमेरिका आणि चीन या दोन्ही देशाच्या उपग्रहांचा कक्षीय मार्ग दाखवला आहे. अलीकडेच अमेरिकन उपग्रह यूएसए 233 आणि यूएसए 298 जवळून चीनचा उपग्रह गेला. पण तो अमेरिकेच्या उपग्रहाजवळ गेल्यावर काही काळ थांबला होता. मुख्य म्हणजे चिनी अंतराळयान ज्या अमेरिकन उपग्रहाच्या आसपास घुटमळेले तो अमेरिकन लष्करासंबंधीचा उपग्रह आहे. यामुळे आता पुन्हा चीननं अमेरिकेच्या लष्करी विभागाबाबत माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट झाले आहे (War). चीनच्या या कृतीचा अमेरिकन अंतराळ संस्थेनंही कडक शब्दात निषेध केला आहे. उपग्रहासंदर्भात असलेल्या नियमांचे हे उल्लंघन असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
=======
हे देखील वाचा : इराणमध्ये विद्यार्थिनींवर विषप्रयोग
=======
जागतिक स्तरावर चीनला लक्ष केले असतांना तिथे मात्र नॅशनल पीपल्स काँग्रेसची वार्षिक बैठक पार पडली. यात राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या नावावर तिसऱ्यांदा शिक्कामोर्तब करण्यात आले. याबैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घतले जाणार आहेत. फारकाय चीनचे पंतप्रधानही बदलले जाणार आहेत. आता चिनचे सर्वाधिकार शी जिनपिंग यांच्याकडे सोपावण्यात येणार आहेत. त्यामुळे त्यांच्या अधिकारात आणखी वाढ होणार आहे. एकूण चीन आणि अमेरिकेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर शी जिनपिंग यांची भूमिका काय आहे, याची जाणीव अमेरिकेला आहे. त्यामुळेच अमेरिकेच्या सुरक्षा दलांची बैठक लवकरच होणार आहे.
सई बने