Home » Suneung College : दक्षिण कोरियातील शैक्षणिक स्पर्धेचे भयाण वास्तव

Suneung College : दक्षिण कोरियातील शैक्षणिक स्पर्धेचे भयाण वास्तव

by Team Gajawaja
0 comment
Share

भारतामध्ये सर्वात कठीण परीक्षा कुठल्या हा प्रश्न विचारल्यावर नागरी सेवा परीक्षा, चार्टर्ड अकाउंटन्सी परीक्षा, आयआयटी प्रवेश परीक्षा, वैद्यकीय प्रवेश परीक्षा, गेट, कॅट अशा परीक्षांची नावे समोर येतात. या परीक्षांची तयारी विद्यार्थी दहावीपासून सुरु करतात. अलिकडच्या काही वर्षात या परीक्षांमध्ये वाढलेली स्पर्धा पाहून काही विद्यार्थी आठवीपासूनही या स्पर्धा परीक्षांची तयारी सुरु करतात. मात्र या परीक्षांपेक्षा एक सर्वात अवघड परीक्षा आहे. ही परीक्षा अवघ्या जगात सर्वात अवघड मानली जाते. या परीक्षेसाठी विद्यार्थी वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षापासून तयारी सुरु करतात. ही परीक्षा दक्षिण कोरियामध्ये होते. दक्षिण कोरियामध्ये सर्वात कठीण आणि महत्त्वाची परीक्षा म्हणजे सुनेयुंग किंवा कॉलेज स्कॉलॅस्टिक अॅबिलिटी टेस्ट. या परीक्षेचा तणाव येथील विद्यार्थ्यांवर एवढा असतो की, ८ ते ९ तासांच्या या परीक्षेच्यावेळी अवघं दक्षिण कोरिया ठप्प होऊन जातं. फारकाय विमान वाहतूकही बंद ठेवण्यात येते, अगदी सुई पडली तरी आवाज होईल, अशी परिस्थिती तिथे असते. कारण या परीक्षेसाठी हे विद्यार्थी अगदी वयाच्या चौथ्या वर्षापासून तयारीला लागलेले असतात. ( Suneung College )

दक्षिण कोरियामधील शैक्षणिक जीवनाचे हे भयाण वास्तव आहे. येथील शैक्षणिक व्यवस्था एवढी अवघड आहे की, मुल जन्माला आल्यापासून त्याचे पालक त्याच्या शैक्षणिक भवितव्यासाठी काळजी करतात. कारण या सर्व परीक्षांच्या मार्गातूनच त्यांची नोकरी आणि भावी आय़ुष्य निश्चित होते. दक्षिण कोरियामधील सुनेयुंग ही परीक्षा सर्व जगातील सर्वात अवघड परीक्षा म्हणून ओळखली जाते. मात्र या परीक्षेसाठी विद्यार्थी अवघ्या चौथ्या वयापासून तयारीला लागतात. दक्षिण कोरियामधील शालेय विद्यार्थी या सर्व कठीण परीक्षेच्या तयारीसाठी आपला बहुतांश वेळ शाळा आणि कोचिंग क्लासमध्ये घालवत आहेत. या परीक्षांच्या तणावामुळे येथील विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचे अवघे आयुष्यच परीक्षामय होऊन गेलेले आहे. परिणामी अनेक विद्यार्थी मधल्या वर्षापर्यंत शाळाही सोडत आहेत. यासंदर्भात केलेल्या एका अहवालामध्ये दक्षिण कोरियाच्या शिक्षण पद्धतीमागचे दाहक वास्तव उघड झाले आहे.

दक्षिण कोरियाची शिक्षण व्यवस्था जगातील सर्वात कठोर आहे. कारण इथे तीव्र स्पर्धा आहे. येथील शाळांमधील वर्गाचे तासही अधिक असतात. शाळा लवकर चालू होते आणि उशीरा संपते. मुख्य म्हणजे, या कठोर शैक्षणिक व्यवस्थेबद्दल येथील पालक आपल्याकडे जसे आंदोलन होते, तसे आंदोलनही करु शकत नाहीत. कारण येथील शाळा या काहीवेळा रात्रीही चालवल्या जातात. आणि जर रात्री शाळा चालू राहिल्या, तर पालक त्या शाळेच्या कडक व्यवस्थापनाचं कौतुक करतात. याला हॅगवॉन शिक्षण पद्धती असे नाव आहे. या शाळेत विद्यार्थ्यांची पुढच्या शैक्षणिक वर्षासाठी कसून तयारी करुन घेतली जाते. शाळेत प्रवेश घेण्यासाठीच येथे पहिली परीक्षा द्यावी लागते ती वयाच्या चौथ्या वर्षी. त्या शाळेत प्रवेश मिळाल्यावर मग पालक आणि तेथील शिक्षक या विद्यार्थ्यांना वरिष्ठ शाळांसाठी चालणा-या परीक्षांच्या तयारीला लावतात. ( Suneung College )

=======

हे देखील वाचा : Kim Ju-ae : उत्तर कोरियाची सत्ता आता किम जोंग उनच्या कन्येच्या हाती

=======

यासाठी अनेक विद्यार्थ्यांचे पालक खाजगी कोचिंग संस्थांचाही आधार घेतात. त्यामुळे बहुतांशी विद्यार्थी हे शाळा सुटल्यावर लगेच या खाजगी कोचिंग संस्थेत दाखल होतात. इथे हे विद्यार्थी कठीण प्रवेश परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी गणित, कोरियन आणि इंग्रजी भाषा शिकतात. आठवड्याचे सातही दिवस विद्यार्थी या कोचिंग सेंटरमध्ये बसलेले आढळून येतात. दक्षिण कोरियामध्ये, ८०% शाळकरी मुलांना कोणत्या ना कोणत्या प्रकारचे प्रशिक्षण मिळते. एका अहवालानुसार येथील शाळांसोबत कोचिंग सेंटरची संख्याही मोठी वाढली आहे. बरं या कोचिंग सेंटरमधून बाहेर पडलेले विद्यार्थी आपल्या घरी न जाता, रस्त्याच्या एका बाजुला अभ्यास करतांना दिसतात. येथील सोल शहराच्या रस्त्यांवर ध्वनीरोधक केबिन बांधण्यात आल्या आहेत. येथे अनेक विद्यार्थी शांततेत अभ्यास करतांना दिसतात. सोल शहरातील अनेक कॅफेमध्येही विद्यार्थी अभ्यास करतांना दिसतात. हा सर्व अभ्यास विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षांसाठी असतो. अर्थात विद्यापीठात प्रवेश केल्यावरही चांगले गुण प्राप्त करण्यासाठी आणि त्यापुढील पदवी प्राप्त करण्यासाठी हे विद्यार्थी चोवीस तास अभ्यास करतांना दिसतात. दक्षिण कोरियाच्या या शिक्षण पद्धतीवर आता टीका होत आहे. अनेक सामाजिक संस्थांनी या पद्धतीमुळे विद्यार्थ्यांच्या आत्महत्येमध्ये वाढ झाल्याचे सांगितले आहे. या परीक्षांच्या ताणामुळे अनेक विद्यार्थ्यांनी मध्येच शाळा सोडून दिल्या आहेत. ही संख्या वाढत असून भविष्यात दक्षिण कोरियाची शिक्षण व्यवस्था बदलण्याची गरज भासणार असल्याचे शिक्षण तज्ञांचे मत आहे. ( Suneung College )

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.