हिंदू धर्मात असं मानलं जातं की आत्मा पुन्हा पुन्हा जन्म घेतो. तर अब्राहमिक धर्मांची अशी मान्यता आहे की, मृत्यूनंतर आत्मा थेट स्वर्गात किंवा नरकात जातो. थोडक्यात, हे धर्म आत्मा आहे यावर विश्वास ठेवतात. तुमच्या आयुष्यात तुम्ही एकदा तरी हे ऐकलं असेल, माणसाची इच्छा अपूर्ण राहिली तर त्याची आत्मा भटकत राहते. हे ऐकून तुम्हाला प्रश्न पडलाय का की आत्मा खरंच असते का? हाच प्रश्न एका डॉक्टरला पडला होता. आत्मा असते की नाही याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुद्धा त्याने केला. त्याने चक्क आत्म्याचं वजन करण्याचा एक एक्सपरिमेंट केला. या एक्सपरिमेंट मधून काय समोर आलं ? आत्मा असते की नाही या प्रश्ननाचं उत्तर काय? जाणून घेऊ.
अमेरिकेतील बोस्टन शहरात राहणाऱ्या डंकन मॅकडोगल. ज्याने अमेरिकेतील ह्यूस्टन विद्यापीठाच्या स्कूल ऑफ मेडिसिनमध्ये शिक्षण घेतलं होतं. त्यानंतर तो हॉस्पिटलमध्ये काम करत होता. ज्या हॉस्पिटलमध्ये तो कामाला होता त्याचा मालक एक व्यापारी होता जो अनेकदा व्यापाराच्या निमित्ताने चीनला जायचा. तिथून त्याने एक तराजू आणला होता. या तराजूच्या मदतीने मोठ्या वस्तूंचं अचूक मोजमाप घेणं सोपं होतं. हा तराजू पाहिल्याबरोबर डंकनच्या मनात विचार आला की, या तराजूच्या मदतीने माणसाच्या आत्म्याचं वजन मोजू शकलो तर? तसंही डंकन ज्या हॉस्पिटलमध्ये काम करत होता त्या हॉस्पिटलमध्ये रोज एखादा रुग्ण दगावायचाच.
पण हा प्रयोग करण्याआधी डंकनच्या डोक्यात आलेला विचार असा होता की, “माणूस जिवंत असतो आणि तो मरण पावतो. म्हणजे, काहीतरी अशी गोष्ट असते जी माणसाला जिवंत ठेवते आणि मरणानंतर ती शरीरातून निघून गेलेली असते. जर ही गोष्ट शरीरात असेल, तर ती एक ठराविक स्थान व्यापत असावी आणि तिचं वजन देखील असावं. म्हणजेच जर प्रयत्न केले, तर ती ‘गोष्ट’ जी माणसाला जिवंत ठेवते, तिचं वजन नक्कीच मोजता येईल.”
यानंतर तो कामाला लागला, त्याने विचार केला की मृत्यूपूर्वी आणि नंतर लोकांच्या शरीराचं वजन मोजलं तर दोघांमध्ये येणारा फरक म्हणजे आत्म्याचं वजन असेल. असा या प्रयोगामागचा त्याचा अभ्यास होता. या प्रयोगासाठी डंकनने एक विशिष्ट प्रकारचा तराजू सुद्धा तयार केला. त्याच्या एका बाजूला एक पलंग ठेवला होता, ज्यावर माणसाला झोपवता येईल. आणि वजन घेता येईल. त्याने प्रयोगासाठी टीबीच्या रुग्णांची निवड केली. याच कारण असं होतं की, टीबी रुग्ण त्यांच्या शेवटच्या दिवसांत खूप कमकुवत होतात, त्यांना हालचाल सुद्धा करता येत नाही. त्यामुळे त्यांच वजन घेताना जास्तीत जास्त अचूक वजन येऊ शकतं. अचूक वजन येण महत्त्वाच होतं कारण डंकनचा विश्वास होता की मृत्यूआधी आणि नंतर येणाऱ्या वजनामध्ये फक्त काही ग्रामचाच फरक असेल. कारण आत्म्याचं वजन फारच कमी असेल.
या प्रयोगाच पहिली चाचणी १० एप्रिल १९०१ साली झाली. एका रुग्णाच्या मृत्यूपूर्वीचं त्याने त्याच वजन नोंद करून ठेवलं होतं. व रोज वजनात होणारे बदल सुद्धा तपासत होता. वजनाची आकडेवारी नोंदवताना त्याने हे लक्षात ठेवल की, मृत्यूनंतर शरीरात पाणी, रक्त, घाम, विष्ठा आणि ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे वजनात फरक होऊ शकतो. ही गोष्ट लक्षात घेतल्यानंतर डंकनच्या लक्षात आलं की, रुग्णाच्या मृत्यूनंतर वजन २१.२ ग्राम इतक कमी झालं आहे. मग काय, हा डंकनसाठी युरेका मोमेंट होता. त्याच्या या प्रयोगाच्या निकालाने खळबळ माजली आणि सगळी कडे ही माहिती पसरली की आत्म्याचं वजन २१ ग्राम असतं.
पण हे एकाच चाचणीत डंकन संतुष्ट झाला नाही. त्याने आणखी काही चाचण्या करण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या रुग्णाचा वजनामधील फरक हा १५ ग्राम होता. तर तिसऱ्या रुग्णाचं वजन मृत्यूनंतर आधी १५ ग्रामने कमी झालं. मग काही वेळाने २८ ग्राम कमी झालं. चौथी चाचणी ही एका महिलेवर करण्यात येणार होती. जी डायबिटीजमुळे मरण पावली होती. पण धार्मिक लोकं डंकनच्या या चाचणीचा विरोध करत होते. ज्यामुळे त्या महिलेचं वजन योग्यरित्या मोजता आलं नाही. पाचव्या चाचणीत तर तराजुच बिघडला. सहाव्या चाचणीत तर डंकन जेव्हा तराजू एडजस्ट करत होता, तेव्हाच महिला मरण पावली.
एवढा खटाटोप करून सुद्धा हवा तसा या प्रयोगांचा निकाल आला नाही, म्हणून मग डंकनने हा प्रयोग १५ कुत्र्यांवर करून बघितला. पण कोणत्याही कुत्र्याच्या वजनात मृत्यूनंतर काही फरक दिसून आला नाही. त्यामुळे असा निष्कर्ष काढण्यात आला की, कुत्र्यांमध्ये आत्मा नसते. डंकनने एकूण 6 वर्षे प्रयोग केले आणि अखेर त्याचा निष्कर्ष एका रिसर्च पेपरमध्ये त्याने प्रकाशित केला. जर्नल ऑफ़ द अमेरिकन सोसायटी फॉर सायकिक रिसर्च’ नावाच्या जर्नलमध्ये त्याचा रिसर्च प्रकाशित करण्यात आला होता.
ज्यात् डंकनने लिहिलं होतं की, “जेव्हा माणूस शेवटचे श्वास घेत असतो, तेव्हा त्याचं वजन अर्ध्या टे सवा आउंसने कमी होत असतं. असं वाटतं की त्याच्या शरीरातून काहीतरी बाहेर निघालं आहे.” त्याच्या या निष्कर्षामुळे त्याचा रिसर्च प्रसिद्ध झाला. काही धार्मिक दृष्टिकोन असलेल्या न्यूज पेपर्संनी तर सरळ सरळ लिहिलं होतं की “यातून सिद्ध होतं की आत्मा असते.”
=================
हे देखील वाचा : Irani cafe : इराणी हॉटेल्स आणि कॅफेचा इतिहास आहे तरी काय ?
================
पण या प्रयोगावर प्रश्न उपस्थित करणारे सुद्धा अनेक जन होते. डंकन स्वत: म्हणाला होता की, या प्रयोगाने आत्माच्या अस्तित्वाची पुष्टी होतं नाही. त्याला यावर आणखी संशोधन करायचं होतं. शस्त्रज्ञांनी या प्रयोगाला पूर्णपणे नाकारलं. कारण वैज्ञानिक दृष्टिकोनातून, या प्रयोगाचे पॅरामिटर चुकीचे होते. पहिली गोष्ट म्हणजे, आत्म्याचं वजन कधी 15 ग्राम, कधी 48 ग्राम होत होतं. याचा अर्थ, आत्म्याचं वजन वेगवेगळं असू शकतं.
दुसरा मोठा प्रश्न होता की, हा प्रयोग आत्म्याचं वजन सिद्ध करत नाही. तो फक्त हे दाखवत होता की, माणसाच्या वजनात फरक येतो. याचं कारण काय, डंकनच्या प्रयोगात त्याचं काहीही उत्तर नव्हतं. त्याने आधीच मानलं होतं की, हे आत्म्याचं वजन आहे. त्याला या विषयावर आणखी प्रयोग करायचे होते. पण हा विषय इतका वादग्रस्त झाला की, त्याला माणसाच्या शरीरावर प्रयोग करण्याची परवानगी मिळाली नाही. त्यानंतर कधीच कोणीच असा प्रयोग केला नाही.
डंकन केलेला प्रयोग आजही अनेकांच्या चर्चेचा विषय आहे. या प्रयोगामुळे अनेक जण आजही असं मानतात की मानवी आत्म्याचं वजन हे २१ ग्राम असतं. तर बरेच लोक असे सुद्धा आहेत जे आत्म्याला आणि आत्म्याच्या वजनाच्या प्रश्नाला निरर्थक मानतात. तर काहींना, आत्मा भटकत राहते, कधी कधी दुसऱ्या शरीरात प्रवेश करते या गोष्टी मृत्यूची भीती मिटवण्यासाठी तयार केलेल्या आहेत असं वाटतं. पण खरी गोष्ट हीच आहे की आत्मा असते की नसते हे मानवासाठी रहस्यच आहे.