Home » ‘पाणीवली बाई’ म्हणून सर्वांना परिचित असलेल्या ‘या’ महिलेने थेट इंदिरा गांधींशी पंगा घेतला होता

‘पाणीवली बाई’ म्हणून सर्वांना परिचित असलेल्या ‘या’ महिलेने थेट इंदिरा गांधींशी पंगा घेतला होता

by Correspondent
0 comment
Mrinal Gore | K Facts
Share

भारतीय संस्कृतीमध्ये नेहमीच महिलांना दुय्यम दर्जाची वागणूक देण्यात आलेली आहे. महिलांनी फक्त चूल आणि मूल इतकच सांभाळायचं असे आजही कित्येकांना वाटते. पण ज्या महिला या सर्व रूढी परंपरा बाजूला ठेऊन समाजापुढे आल्या, त्यांनीच नवा इतिहास घडवला. आणि हा इतिहास आजही आदर्श महिलांच्या जीवनाची साक्ष देत आहे.

आज आपण अशाच एका महाराष्ट्राच्या राजकारणातील खंबीर अशा महिलेची गोष्ट पाहणार आहोत. ज्यावेळी महाराष्ट्राचे राजकारण पुरुषांच्या हातात होते, त्यावेळी या महिलेने आपले डॉक्टरकीचे शिक्षण सोडून समाजकारणात आणि राजकारणात भाग घ्यायला सुरुवात केली होती.

ही महिला म्हणजे मृणालताई गोरे (Mrinal Gore) की ज्यांना संपूर्ण महाराष्ट्र ‘पाणीवाली बाई’ म्हणून ओळखतो. आज आपण याच मृणालताई गोरेंची सामाजिक आणि राजकीय कारकीर्द पाहणार आहोत.

मृणालताईंचा जन्म एका सुशिक्षित घराण्यात दि. २४ जून १९२८ रोजी झाला. मृणालताईंवर पहिल्यापासूनच गांधीजींचा प्रभाव होता. त्यामुळे त्यांनी तरुणपणीच स्वतंत्र चळवळीत भाग घ्यायला सुरुवात केली होती. पुढे त्या एमबीबीएसच्या पहिल्या वर्षाची परीक्षा उत्तमरीत्या पास झाल्या. पण त्यांनी आपले शिक्षण थांबवून समाजकार्यात उतरण्याचा निर्णय घेतला. त्याबद्दल त्यांनी तसे आपल्या वडिलांना कळवले. आणि वयाच्या एकोणिसाव्या वर्षी त्या राष्ट्र सेवा दलाच्या कार्यकर्त्या बनल्या.

Mrinal Gore
Mrinal Gore

पुढे आंदोलन कार्यात असताना त्यांचा केशव गोरे ऊर्फ बंडू गोरे यांच्याशी परिचय झाला. आणि १९४८च्या सुमारास या दोघांचा विवाह झाला. विवाहानंतर गोरेगावातील टोपीवाला बंगला हे मृणालताईंचे निवासस्थान बनले. परंतु दुर्दैवने विवाहानंतर दहा वर्षांच्या आतच बंडू गोरे यांचे निधन झाले.

पण त्या डगमगल्या नाहीत. पतीच्या निधनानंतर त्यांनी केशव गोरे स्मारक ट्रस्टची स्थापना केली. आणि पुढे वर्षभरातच त्यांनी सोशालीस्ट पार्टी काढली. त्यानंतर त्या गोरेगाव ग्रामपंचायत निवडणूकीला उभ्या राहिल्यास. आणि सदस्या म्हणुन निवडुन आल्या.

मृणालताई ग्रामपंचायत सदस्य असतानाच, एकदा गोरेगावमध्ये राममनोहर लोहिया (Ram Manohar Lohia) यांची एक सभा होती.

सभा संपल्यावर परतत असताना लोहिया यांनी रस्त्यात हंडा घेऊन उभ्या असलेल्या काही महिला बघितल्या. आणि “मृणाल हा पाणी प्रश्न तू हातात घेऊन त्यावर काम कर” असे लोहिया यांनी मृणालताईंना सांगितले.

राममनोहर लोहिया यांच्या प्रेरणेमुळे मृणालताईंनी पुढे पाण्याच्या प्रश्नावर लढा सुरु केला. आणि इथूनच पुढे लोक त्यांना ‘पाणीवाली बाई’ म्हणुन ओळखू लागले.

मृणालताई, अहिल्याताई, ताराताई आज हव्या होत्या.. |
लाटणे मोर्चा

१९६१ साली महापालिका अस्तित्वात आली. तिथेही त्या निवडून आल्या. आणि तिथे त्यांनी सर्वात पहिल्यांदा महापालिकेचा कारभार मराठीतूनच चालावा यासाठी बंड पुकारले. पुढे १९७२ साली माधवराव परांजपे यांच्या विरुद्ध त्या विधानसभा निवडणूकिसाठी उभ्या राहिल्या. त्यावेळी परांजपे यांच्या प्रचाराला खुद्द पंतप्रधान इंदिरा गांधी गोरेगाव मध्ये आल्या. मात्र तरीही मृणालताई विधानसभेत निवडून आल्या.

त्यानंतर १९७५ साली आणीबाणीच्या काळामध्ये मृणालताईंनी विरोधी भूमिका घेतली. म्हणून त्यासाठी त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला. आणीबाणी सुटल्या नंतर १९७७ ला त्या जेव्हा समाजवादी पक्षाच्या तिकिटावर लोकसभेवर निवडून गेल्या त्यावेळी लोक “पाणी वाली बाई दिल्ली में और दिल्लीवाली बाई पाणी मैं” असे म्हणत होते.

नंतर १९७८ साली पुलोद चं सरकार आले. व तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी मृणालताई गोरे यांचे नाव मंत्रिपदासाठी सुचवले होते. पण मंत्रिपदापेक्षा लोकांमध्ये राहून काम करण्यात आपल्याला जास्त रस असल्याचे सांगत त्यांनी नकार दिला होता.

महाराष्ट्रात सक्रिय असताना ताईंचे नाव मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत राहिले होते. त्यांच्याकडे जनता पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्षपद होते. इतकंच काय तर मृणालताईंनी राजकारणातील अनेक भ्रष्टाचारी प्रकरणे बाहेर काढली होती.

१९८९ मध्ये शरद पवार (Sharad Pawar) मुख्यमंत्री असताना मृणालताई गोरे या विरोधी पक्ष नेत्या होत्या. त्यावेळी २८५ भूखंडांच्या वाटपामध्ये झालेला भ्रष्टाचार त्यांनी बाहेर काढला होता. त्याचवेळची मृणालताईंची ‘भूखंडाचे श्रीखंड’ अशी उपहासात्मक केलेली टीका खूप गाजली होती.

भेसळीच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी गव्हामध्ये धोतऱ्याच्या बिया कशा बेमालूम पद्धतीने मिसळल्या जातात हे दाखवण्यासाठी त्याचे नमुनेच आणले होते. ए. आर. अंतुले मुख्यमंत्री असताना मृणालताईंनी सिमेंटच्या भ्रष्टाचाराचे प्रकरण खूप गाजवले होते.

Mrunal Gore
Mrunal Gore

इतकंच काय तर, रॉकेलचा काळाबाजार व वाढत्या किमतीवर मुंबई महापालिकेच्या परिसरात शंभर चुली पेटवुन चपात्या लाटण्याचेही आंदोलन त्यांनी केले होते. तसेच महागाईच्या प्रश्नावर लाटणे मोर्चा आणि हंडा मोर्चा नावाचा एक आंदोलनाचा वेगळाच प्रकार मृणालताईंनी आणला होता. गर्भलिंग निदान चाचणीच्या विरोधातील आंदोलन व स्त्रीभ्रूण हत्ये बाबतीतला कायदा पास करण्यात त्यांचे मोठे योगदान होते.

त्यांनी त्यांच्या कार्यकाळात दलितांचे, आदिवासी लोकांचे, महिलांचे प्रश्न धडाडीने मांडले होते. त्यांनी त्यांच्या आयुष्यात सर्वसामान्यांसाठी जवळपास ७६ आंदोलने केली होती.

राज्यातील गोरगरीब लोकांना हक्काचे घर मिळावे म्हणून मृणालताईंच्या प्रयत्नातून सुरू झालेल्या नागरी निवारा योजना अंतर्गत सरकारी जमिनीवर ६ हजार लोकांना घरे उपलब्ध करून देण्यात आली.

अशा या झुंजार सामाजिक कार्यकर्त्या मृणालताई गोरेंचे वयाच्या ८४व्या वर्षी दि. १७ जुलै २०१२ ला दुःखद निधन झाले. आणि एक हरहुन्नरी नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले.

– निवास उद्धव गायकवाड


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.