Home » ‘सोच की चिंगारी’

‘सोच की चिंगारी’

by Correspondent
0 comment
Share

रंग काळा …काळाकुट्ट
कुट्ट अंधार …अंधारगट्टी
गर्द काळा …काळा ढग …

कुणी घरकोंबडी कवयित्री आपल्या सुंदर कवितेच्या वहीत… हातात गरम गरम चहाचा कप घेऊन वगैरे पावसाळी चारोळी लिहू लागली.
अंधारगट्टीला -हायमिंग काय बरं जोडावं?  गट्टीला पट्टी …नको फुटी…हां…
ढगफुटी.

रंग काळा …काळाकुट्ट
कुट्ट अंधार …अंधारगट्टी
गर्द काळा …काळा ढग
ढग ढग … ढगफुटी.

वा… मस्त जमली की चारोळी.’खाली आपलं नाव लिहून, तिनं तारीख टाकली…
26 जुलै.’
…………..

26 जुलै…
ढग ढग ढगफुटी आणि मुसळधार पाऊस… प्रलयात सापडलेलं एक महानगर. गच्च अंधारलेली दुपार.
एरवी हा पाऊस सगळ्यांचा प्रेमिक. त्याच्यावर कविता काय, चित्रं काय…पण… पण त्या दिवशी ?

जलप्रलयात हरवलेले रस्ते नि त्यातून वाट काढत चाललेली, गारठलेली, ओली शरीरं.
कमरेपर्यंत वाढत आलेलं पाणी. माहीत नाही आधाराला कुणाचे हात धरलेत कुणी.

तिने अचानक त्याचा हात धरला घट्ट …. नि एकदाच अनोळखी नजरानजर … अफाट
भयानं दाटलेली. मग तोही तिचा हात पकडून पाण्यातून चालू लागला अंदाज घेत…
पायाखाली खड्डा, मॅनहोल तर नाही?

भोवताली मुसळधार आकांत. छत्र्या, रेनकोट, हाका, वाहात येणा-या चपला, पिशव्या,
कचरा, कुत्री. थंड प्रेतं चालावीत तसे चालत होते सगळेच.
ते दोघंही हातात हात घट्टपणे गुंतवून. जवळजवळ तासभर. तासाभरात काही जुजबी
शब्दांचीच देवघेव.

“मला या सर्कलवरून पुढे शिवाजी चौकातून जायचंय, डावीकडे वळावं लागेल.”
ती त्याला सांगू लागली. “अहो, नका जाऊ शिवाजी चौकातून. तिकडे इथल्याहीपेक्षा खूप पाणी भरलंय म्हणे, पाण्याला ओढ आहे. माझ्याबरोबर सरळ चालत रहा. पुढे पोलीस चौकी आहे, काही मदत मिळेल, प्लीज लिसन टू मी. हात नका सोडू.”
“अहो माझी आई एकटीए घरी. जाईन मी. डोन्ट वरी. थँक्यूऽऽ  अँड यू टेक केअर,
बाऽऽय.”

हात सुटले. पाण्यातल्या एका नावेपासून दुसरीनं वेगळं व्हावं नि आपली दिशा बदलावी तसं वळून, पाण्यातनं माग काढत ती दुस-या दिशेनं निघाली. जांभळ्या रंगाच्या ड्रेसमधली तिची आकृती, खांद्यावरच्या लालचुटूक ओढणीला पाण्यावर मागे तरंगत ठेवून…
त्या काळोखात लुप्त होत गेली.

पाण्याला ओढ होती. त्याच्या मनालाही. असं कसं होऊ शकतं? त्याने तो आगतुंक प्रश्न
पाण्यावर वाहत आलेल्या कच-याला बाजूला सारावं, तसा बाजूला सारला.
प्रवाहाच्या उलट्या दिशेला तोंड करून त्या कल्लोळात तो तसाच उभा राहिला.
‘नावंही विचारलं नाही आपण… एरवी सांगितलं असतं, पोहोचल्यावर दिलेल्या नंबरवर
फोन करा…’ अशा अवस्थेतही त्याला हसू आलं.
का कुणास ठाऊक, पण तिनं जायला नको होतं असं राहून राहून त्याच्या मनात येऊ लागलं.

रात्री खूप उशिरा कसातरी तो घरी पोहोचला.
दुस-या दिवशी बातम्यांचा धो धो महापूर.
ऑफीसला जाणं केवळ अशक्य… आजही बाहेर पावसाचा आकांत चालूच…
आणि त्याच्या मनातही.
त्याला उगीचच लहानपणीची बालभारतीच्या पुस्तकातली कविता आठवली…
लाडकी बाहुली होती माझी एक…
आत्ता का ही कविता आठवावी? त्याला कळेना.
काही दिवसांपूर्वीच कुठेतरी कुणीतरी लिहिलेलं त्यानं वाचलं होतं,
आपल्या हाती असलेलं प्रिय काही निसटून गेलं की, एक विचित्र हुरहुर लागते,
अस्वस्थता येते.

अचानक एक बातमी दिसली न्यूज चॅनेलवर,

‘शिवाजी चौक भागातील वाहून गेलेल्या चार नागरिकांपैकी दोन मृतदेहांची
ओळख पटली आहे… छायाचित्रे व नावे…
1. सूर्याजी मानकामे, वय 64
2. मुक्ता पाटील, वय 24′

‘आई एकटीए घरी, मी जाईन… बाऽय,’ 
काळोखी दुपार, काळ्या पाण्याचा कल्लोळ नि हात सोडून जाणारी लालचुटूक ओढणी….
‘ती..ती मुक्ता ?…ओह्… मी का जाऊ दिलं तुला…?
मला वाटत होतं मनापासून तू जाऊ नयेस असं… परत कधी, कशी भेटशील?’
तो दिङमूढल्या अवस्थेत तसाच कितीतरी वेळ बसून राहिला.

राजहंसासारख्या पांढ-याशुभ्र कॅनव्हासला आज त्याने जांभळ्या रंगात जणू बुचकळून काढलं. उमटवला त्यावर मधोमध फक्त एकच मोठा लाल ठिपका,
जो अलवार खाली ओघळत येत होता.
………………………….

मैं तैनूं फ़िर मिलांगी
कित्थे? किस तरां पता नही
शायद तेरी सोच की चिंगारी बनकर
तेरी केनवस ते उतरांगी
या शायद तेरी केनवस पर
एक रहस्यमई लकीर बन कर
खामोश तुझे देखती रहूंगी
— अमृता प्रीतम.

मी तुला परत भेटेन
कुठे? कशा त-हेनं माहीत नाही
कदाचित तुझ्या विचारांची ठिणगी बनून
तुझ्या कॅनव्हासवर उतरीन
किंवा तुझ्या कॅनव्हासवर
एक रहस्यमयी रेष बनून
अबोलपणे तुला बघत राहीन

——- © डाॅ. निर्मोही फडके.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.