Home » म्हणून लावतात अखंड ज्योत

म्हणून लावतात अखंड ज्योत

by Team Gajawaja
0 comment
Navratri
Share

शारदीय नवरात्री, काल 15 ऑक्टोबर 2023 पासून सुरु झाली आहे. नवरात्रीचे हे नऊ दिवस मातेच्या उत्सवाचे आणि तिच्या पुजनाचे आहेत.  या दिवसात देवीची ओटी भरली जाते,  तिला फळा-फुलांनी सजवले जाते.  देवीचा वास आपल्या घरी असावा म्हणून नवरात्रीच्या (Navratri) पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते.  एका कलशावर नारळ आणि त्याच्या खाली माती, धान्य पेरुन देवीला अर्पण केले जाते.  याशिवाय घरोघरी देवीसाठी या नऊ दिवसात अखंड ज्योत लावण्यात  येते. नवरात्रीच्या पवित्र 9 दिवसांत अखंड ज्योती प्रज्वलित करण्याचे अनेक फायदे आहेत. या 9 दिवसात देवीच्या 9 रुपांची पूजा होते.  विविध रुपात असणारी देवी आपल्या घरी कायम रहावी, तिचा आशीर्वाद रहावा हा यामागील उद्देश आहे.  यावर्षी  नवरात्री 23 ऑक्टोबरला संपणार असून 24 ऑक्टोबरला दसरा साजरा होणार आहे.  या वर्षी नवरात्रीच्या काळात मातेचे हत्तीवर बसून आगमन होत आहे. माता हत्तीवर बसून येणार हे अत्यंत शुभ असून यामुळे या नऊ दिवसात घरात अखंड ज्योत लावल्यास हे अत्यंत शुभयोगाचे लक्षण आहे. मात्र ही अखंड ज्योत लावतात कशी आणि ती लावल्यावर काय काळजी घ्यावी, हे जाणणेही महत्त्वाचे आहे.  (Navratri)

नवरात्रीमध्ये कलशाची स्थापना,  माळ लावणे आणि अखंड ज्योती प्रज्वलित करण्याचे खूप महत्त्व आहे. अखंड ज्योती प्रज्वलित करण्याचे अनेक फायदे असले तरी ही अखंड ज्योत लावतांना काही नियमही पाळावे लागतात.   अखंड ज्योती प्रज्वलित केल्याने घरात समृद्धी येते आणि देवीचा आशीर्वाद प्राप्त होतो. देवी सर्व इच्छा पूर्ण करते,  मात्र हा अखंड दिवा आपण कुठला लावणार आहोत, यालाही महत्त्व आहे.  देवीचा दिव तुपाचा असणार की तेलाचा यावरु तो कुठल्या दिशेला लावायचा हे ठरते.  तसेच घरात जर अखंड दिप लावणार असल्यास घर शक्यतो, बंद ठेवता येत नाही.  कारण दिवा अचानक गेल्यास तो पुन्हा लावणे गरजेचे असते.  शक्यतो हा दिवा नऊ दिवसात कधी जाणार नाही, याची काळजी घ्यावी लागते.  पण वा-यानं अथवा तेल, तूप कमी झाल्यास दिवा गेल्यास तो पुन्हा लगेच लावावा लागतो.  त्यामुळेच अखंड दिप लावणे जेवढे चांगले असते,  तेवढीच त्याची काळजीही घेणे ही गरजेचे असते. (Navratri)

याशिवाय अखंड ज्योती थेट जमिनीवर ठेवू नये. अखंड दिप लावल्यावर तो शक्यतो मोठ्या पाटावर ठेवावा.  त्याच्या खाली गहू किंवा तांदूळ पेरुन ठेवावे.  हे जर शक्य नसल्यास दिव्याच्या खाली लाल रंगाचे कापड ठेवावे. अखंड ज्योत लावलेला दिवा कधीच जमिनीवर ठेवू नये. तसेच दिव्याच्या समोर रांगोळी काढावी. रोज सकाळ संध्याकाळ त्या दिव्याची पूजा करावी.  शक्यतो अखंड ज्योत पितळेच्या किंवा मातीच्या मोठ्या दिव्यात प्रज्वलीत करण्यात येते.  अखंड ज्योती दिव्यात वातीऐवजी लाल रंगाची वात वापरावी. अखंड ज्योतीची वात ही रक्षासूत्रापासून म्हणजेच कलवापासून बनवलेली असावी.  ही अखंड ज्योत कापसाच्या वातीने लावत नाहीत.  कारण कापसाची वात नऊ दिवस अखंड प्रज्वलीत करता येत नाही. (Navratri)

ती लवकर जळण्याचा धोका असतो.  त्यामुळे अखंड ज्योत लवकर जाऊ शकते.  हे टाळण्यासाठी लाल रंगाच्या कलाव्यापासून वात तयार करावी.    तुपाची अखंड ज्योत असल्यास ती देवीच्या उजव्या बाजूला ठेवावी. दिव्यात मोहरीचे तेल टाकले असेल तर अखंड ज्योतीचा दिवा देवीच्या डाव्या बाजूला ठेवावा.  अखंड ज्योत वाऱ्याने विझू नये म्हणून भोवती काचेचे कवच ठेवणेही गरजेचे आहे.  याशिवाय  अखंड ज्योती आग्नेय कोपर्‍यात ठेवणे शुभ मानले जाते. पूजेच्या वेळी ज्योत पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून ठेवावी. अखंड ज्योत ज्या दिपात आहे, त्याची स्वच्छता आणि पूजा रोज करावी.  त्याच्यासमोर रोज रांगोळी काढावी.  हे करतांना शुद्धतेची काळजी घ्यावी. घरातील सर्व सदस्यांनी सात्विक अन्न खाणेही गरजेचे आहे.  तसेच घरात नऊ दिवस जे अन्न बनवले जाते.  त्याचा देवीला आणि अखंड ज्योतीला प्रथम नैवेद्य दाखवावा. (Navratri) 

============

हे देखील वाचा : कैलास पर्वताची रखवाली करणारा रान समाज…

============

नवरात्रीचे 9 दिवस पूर्ण झाल्यावर अखंड ज्योती विझवण्याचा प्रयत्न करू नये.  ही ज्योत तेल किंवा तूप कमी झाल्यावर आपोआप विझली जाईल.  काहीघरात अखंड ज्योत पूर्ण झाल्यावर उरलेले तूप किंवा तेल राखून ठेवतात.  हे तेल, तूप औषधी होते, असे मानून त्वचा रोगांवर त्याचा वापर करण्यात येतो. अखंड ज्योत लावल्यास त्याचे अनेक फायदे आहेत.  घरातून नकारात्मकता दूर होते.  कौटुंबिक अडथळे दूर होऊन कुटुंबात एकी होते. अखंड ज्योत प्रज्वलित केल्याने देवीचा आशीर्वाद प्राप्त होते. कुटुंबात सुख-शांती नांदते,  याशिवाय घरात सकारात्मकता येते.  नवरात्रीमध्ये अखंड ज्योतीच्या प्रभावामुळे शनीच्या महादशीपासून मुक्ती मिळते. तसेच वास्तू दोष दूर होतात,  असेही सांगितले जाते.  

सई बने  


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.