Home » आतापर्यंत ‘या’ संघांनी आयपीएल जेतेपद पटकावले…

आतापर्यंत ‘या’ संघांनी आयपीएल जेतेपद पटकावले…

by Team Gajawaja
0 comment
IPL Winners
Share

आयपीएलचं विजेतेपद (IPL Winners) पटकावण हे प्रत्येक संघाचं ध्येय असत. साखळी सामन्यात सर्वोत्तम प्रदर्शन करून अंतिम सामन्यात धडक मारत विजेतेपदाला गवसणी घालण्यासाठी दरवर्षी प्रत्येक संघ मैदानात उतरत असतो. दोन महिने चालणारी ही स्पर्धा भारतीय क्रिकेट जगातला एक वेगळी कलाटणी देणारी ठरली यात शंका नाही. कित्येक युवा खेळाडूंना जागतिक पातळीवरील दर्जेदार खेळाडूंच्या सोबतीने खेळण्याची संधी या स्पर्धेने मिळवून दिली आहे. इथे प्रदर्शन करत भारतीय संघात स्थान मिळवण्याचे कित्येक युवा भारतीय खेळाडूंचे स्वप्नं आयपीएल मुळेच पूर्णत्वास जाऊ शकले आहे. एक ना अनेक प्रकारच्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या आयपीएलचे प्रमुख आकर्षण मात्र या स्पर्धेचे चषकच राहिले आहे. या चषकाला गवसणी घालण्याचा प्रयत्न प्रत्येक संघ करत असतो, मात्र या स्पर्धेच्या विजेतेपदाचे भाग्य काही मोजक्याच संघांना लाभले आहे. आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून आजतागायत कोणत्या संघांनी हंगाम गाजवत जेतेपदाला गवसणी घातली आहे, बघुया.(IPL Winners)

राजस्थान रॉयल्स (२००८)

२००८ साली पार पडलेल्या आयपीएलच्या पहिल्यावहिल्या हंगामात जेतेपदाचा मान राजस्थान रॉयल्सने पटकावला होता. १ जून २००८ रोजी पार पडलेल्या अंतिम सामन्यात राजस्थानने चेन्नईचा तीन विकेटने फाडसा पाडत आपले जेतेपद सुनिश्चित केले होते. कर्णधार शेन वार्नच्या नेतृत्वाखालील राजस्थानचे हे पहिले आणि एकमेव जेतेपद ठरले. त्यानंतर त्यांना आजतागायत जेतेपदाला गवसणी घालता आलेली नाही.

डेक्कन चार्जर्स (२००९)

२००९ सालची आयपीएल स्पर्धा दक्षिण आफ्रिकेमध्ये खेळवण्यात आली. बंगळूरू आणि डेक्कन चार्जर्स यांच्यातील अगदी अटीतटीच्या सामन्यात बंगळूरूला धूळ चारत डेक्कन चार्जर्सने बाजी मारली होती. डेक्कन चार्जर्सने उभ्या केलेल्या १४३ धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या बंगळूरूचा डाव ९ बाद १३७ धावांवर येवून अडकला. कर्णधार गिलख्रिस्टने चार्जर्सला त्यांचे पहिले जेतेपद मिळवून दिले.

चेन्नई सुपर किंग्स (२०१०, २०११, २०१८, २०२१)

आयपीएलच्या इतिहासातील दुसरी सर्वात यशस्वी ठरलेल्या चेन्नई सुपर किंग्सने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात आतापर्यंत २०१०, २०११, २०१८ आणि २०२१ अशी चारवेळा आयपीएल जेतेपदाला गवसणी घातली आहे. २०१० साली अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सला हरवत त्यांनी आपले पहिले जेतेपद जिंकले होते. पहिल्या विजयानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. त्यानंतर चेन्नईच्या आयपीएलमधील एकहाती वर्चस्वाचे पर्व सुरु झाले. २०११ साली बंगळूरू, २०१८ साली सनरायझर्स हैद्राबाद तर २०२१ ला कोलकता नाईट रायडर्सला अंतिम सामन्यात धूळ चारत त्यांनी जेतेपद जिंकले होते.(IPL Winners)

कोलकता नाईट रायडर्स (२०१२, २०१४)

कोलकता नाईट रायडर्सला आपल्या पहिल्या जेतेपदाला गवसणी घालायला २०१२ साल उजडावे लागले. डावखुरा फलंदाज गौतम गंभीरच्या नेतृत्वात कोलकता नाईट रायडर्सने २०१२ आणि २०१४ अशी दोन वेळा जेतेपदाला गवसणी घातली आहे. २०१२ साली चेन्नई सुपर किंग्ससोबत झालेल्या अंतिम लढतीत चेन्नईने दिलेल्या १९० धावांचा त्यांनी यशस्वीपणे पाठलाग करत आपल्या पहिल्या जेतेपदाला गवसणी घातली. २०१४ साली अंतिम सामन्यात त्यांच्यासमोर किंग्स इलेव्हन पंजाबचे आव्हान होते. पंजाबने दिलेल्या १९९ धावांचा त्यांनी यशस्वीपणे पाठलाग करत आपल्या नावासमोर जेतेपदाची मोहोर उमटवली.

मुंबई इंडियन्स (२०१३, २०१५, २०१७, २०१९, २०२०)

आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी संघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाने आतापर्यंत तब्बल पाचवेळा जेतेपद आपल्या नावावर केले आहे. हे पाचही जेतेपद जिंकून देण्यात कर्णधार रोहित शर्माचा सिंहाचा वाटा आहे. २०१३ साली मात्र १४८ धावांचे राखण करत त्यांनी आपले पहिले जेतेपद पटकावले होते. अंतिम सामन्यात त्यांना महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नईला धूळ चारत दिमाखात आयपीएल चषक उंचावले होते. त्यानंतर २०१५ साली पुन्हा चेन्नई सुपर किंग्स, २०१७ साली रायझिंग पुणे सुपरजायन्ट्स, २०१९ साली चेन्नई सुपर किंग्स तर २०२० साली दिल्ली कॅपिटल्सला अंतिम सामन्यात धूळ चारली होती.(IPL Winners)

सनरायझर्स हैद्राबाद (२०१६)

आयपीएलच्या सुरुवातीपासून स्पर्धेचा भाग नसलेल्या, तुलनेने नवख्या सनरायझर्स हैद्राबादने २०१६ साली अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूला हरवत डेव्हिड वार्नरच्या नेतृत्वात आपल्या पहिल्या आणि एकमेव जेतेपदाला गवसणी घातली होती. अंतिम सामन्यात पहिली फलंदाजी करतांना हैद्राबादने २० षटकात ७ बाद २०८ धावांचा डोंगर रचला होता. या महाकाय लक्षाचा पिच्छा करतांना विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूला २०० धावांपर्यंतच मजल मारता आली. अवघ्या सात धावांनी निसटता विजय मिळवत हैद्राबादने जेतेपदावर आपले नाव कोरले.(IPL Winners)

======

हे देखील वाचा : ‘द जयस्वाल शो’ कोहलीकडून कौतुक!

======

गुजरात टायटन्स (२०२२)

आपल्या पहिल्याच हंगामात जेतेपदाला गवसणी घालण्याचा पराक्रम गुजरात टायटन्सने करून दाखवला. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील या संघाने अंतिम सामन्यात राजस्थान रॉयल्सचा पराभव करत जेतेपद आपल्या नावावर केले होते. अंतिम सामन्यात राजस्थानने प्रथम फलंदाजी करत गुजरातला १३० धावांचे माफक लक्ष दिले होते. गुजरातने या लक्षाचा सहज पाठलाग करत हा सामना आणि आयपीएल चषक आपल्या खिशात घातले होते. (IPL Winners)

अशाप्रकारे वेगवेगळ्या वर्षी, वेगवेगळ्या संघांनी जेतेपदाला गवसणी घातली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू, पंजाब किंग्स, दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायन्ट्स या संघांना अजूनतरी जेतेपद पटकावता आलेले नाही.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.