Home » सहाव्याचे आव्हान

सहाव्याचे आव्हान

by Correspondent
0 comment
Rajya Sabha Seat maharashtra
Share

राज्यसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. छत्रपती संभाजी राजे यांच्या उमेदवारीबाबत झालेल्या राजकीय नाट्यानंतर ही निवडणूक बिनविरोध होण्याची असलेली शक्यता आता पुरती मावळलीय. भाजपानं शिवसेनेची कोंडी करण्यासाठी या निवडणुकीत स्वतःचा सातवा आणि विशेषतः कोल्हापुरचाच उमेदवार रिंगणात उतरवलाय. सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात असल्याने सहाव्या जागेच्या विजयासाठी महाराष्ट्र विकास आघाडी आणि भाजपा आघाडी यांच्यात होणाऱ्या मतांच्या चढाओढीत घोडेबाजार होणार, हे निर्विवाद आहे. दोन्ही पक्षांकडून आम्ही घोडेबाजार करणार नाही, असे राजकीय सूर उमटवले जात असले तरी शिवसेनेला त्यांचा दुसरा आणि भाजपाला त्यांच्या तिसरा उमेदवार निवडून आणायचा असेल तर अतिरिक्त मतांची बेगमी करावीच लागेल.

या दोन्ही पक्षांची नजर त्यांच्याकडे असलेली अधिकची मते आणि अपक्षांवर आहे. जो पक्ष अधिकची मते स्वतःकडे मिळवण्यात यशस्वी होईल साहजिकच तो बाजी मारेल. मविआकडे स्वतःच्या ह्ककाची १६९ मते आहेत. निवडणुकीच्या पध्दतीप्रमाणे एका उमेदवाराला पहिल्या पसंतीची किमान ४२ मते मिळणे अपेक्षित आहे… आता मविआचे दोन मंत्री तुरूंगात आहेत, त्यांना मतदानाचा हक्क मिळावा यासाठी ते प्रयत्नशील आहेत. शिवसेनेचे रमेश लटके यांचं अलिकडेच निधन झाल्यामुळे ते एक मत शिवसेनेचे कमी झालं आहे. मविआसाठी यागोष्टी तोट्याच्या आहेत.

राज्यात मविआ सरकार तीन पक्षाचं असलं तरी त्यातील काँग्रेस पक्षात सध्या मोठ्या प्रमाणावर चलबिचल आहे. अशातच हायकमांडने महाराष्ट्रातून राज्यसभेवर पाठवण्यासाठी इम्रान प्रतापगढी यांच्या नावाची घोषणा केल्यामुळे स्थानिक नेत्यांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे. या नाराजीचा फायदा शिवसेना वा भाजपा यापैकी जो पक्ष उचलेल त्याची सरशी होण्याची शक्यता नाकारत येत नाही. शिवसेनेने संजय राऊत आणि निष्ठावान शिवसैनिक असलेले कोल्हापूर मधील संजय पवार यांचे अर्ज दाखल केले आहेत. तर भाजपाने पियुष गोयल, अनिल बोंडे आणि कोल्हापूरचे धनंजय महाडिक यांचे अर्ज दाखल केले आहेत. भाजपाने शिवसेनेला शह देण्यासाठीच महाडिक यांना उमेदवारी दिल्याचे बोललं जातंय. (Dhananjay Mahadik)

राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल त्यांच्या पक्षाकडे असलेल्या मतांनी सहज निवडून येवू शकतात. त्यांची अतिरिक्त मते शिवसेनाला फायदेशीर ठरतील. मात्र मविआकडील अपक्ष आणि राष्ट्रवादीची उरलेली मते यावर शिवसेनेचा दुसरा उमेदवार निवडून येणार नाही. त्यासाठी त्यांना भाजपाकडे असलेल्या अपक्षांची मते खेचून आणावी लागतील, किंवा पसंतीक्रमांकाने मिळणाऱ्या मतांमध्ये दुसऱ्या पंसतीची मते मिळवून दुसरा उमेदवार निवडून आणावा लागेल. हिच गत भाजपाचीही आहे. दोन्ही पक्षीय आघाड्यांवर सहाव्या जागेसाठी मतांची जुळवाजुळव करताना घोडेबाजार हा होणारच आहे.

विधानपऱिषदेच्या १२ जागांसाठी भाजापाने मविआतील तिन्ही पक्षांची केलेली कोंडी पाहता या निवडणुकीतही भाजपा मविआची कोंडी करण्याची शक्यता अधिक आहे. भाजपच्या या रणनितीत शिवसेनेलाच घाम फुटला आहे. काँग्रेसमधील अंतर्गत नाराजीचा फायदा शिवसेनेच्या दुसऱ्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी होवू शकतो. मात्र, काँग्रेसचे वरिष्ठ नेते याकडे लक्ष ठेवून आहेत. या शिवेसेना आणि भाजपाच्या राजकीय चाणक्यांची कसोटी लागू शकते. निवडणूक रिंगणात असलेल्या सात उमेदवारांपैकी ज्या उमेदवाराला सर्वात आधी पहिल्या पसंतीची मते पडतील तो उमेदवार विजयी होईल, त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या पसंतीची मतांची मोजणी होते. या प्रक्रियेत भाजपाला स्वतःचे उमेदवार निवडून आणण्याची संधी आधिक आहे. कारण त्यांच्याकडे स्वतःचीच १०७ मते आहेत आणि ७ अपक्ष त्यांच्यासोबत आहेत.

Shiv Sena's Sanjay Raut, Sanjay Pawar
Shiv Sena’s Sanjay Raut, Sanjay Pawar

मविआची एकत्रित संख्या मोठी दिसत असली तरी त्या-त्या पक्षांची वैयक्तिक मते पाहता दुसरा उमेदवार निवडून येण्याएवढी त्यांच्याकडे मते नाहीत. भाजपला ही खेळी अधिक सोपी जाण्याचीच शक्यता अधिक असल्याने भाजपच्या तिसऱ्या उमेदवारांमुळे शिवसेनेची सर्वाधिक डोकेदुखी वाढली आहे. भाजपच्या दोन उमेदवारांना पहिल्या पसंतीची कोट्याएवढी मते मिळाल्यावर त्यांच्याकडे एकगठ्ठा राहणारी मते अधिक आहेत. त्याच्या जोरावर त्यांना दुसऱ्या पसंतीच्या मतांचा आधार जास्त मिळू शकतो. ज्या पक्षाकडे एकापेक्षा अधिक उमेदवार आहेत, त्यांनी त्यांचा कोणता उमेदवार आधी निवडून आणायचा याचे गणित पक्षाचे नेते-प्रतोद ठरवून देत असतात. त्यामुळे अशा निवडणुकीत दुसऱ्या पसंतीची मते मोठी कामगिरी करत असतात. कारण नंतरच्या फेऱ्यामध्ये मतांचे मूल्य कमी होत जाते याचा फटका शिवसेनेच्या दुसऱ्या आणि भाजपाच्या तिसऱ्या उमेदवाराला बसू शकतो. (Maha Vikas Aghadi)

महाराष्ट्रातील मविआ सरकारच्या स्थापनेनंतर पुन्हा सत्ताधीश होण्याचे भाजपाचे स्वप्न कोणत्याही परिस्थितीत पूर्ण होवू शकले नाही. आमचे सरकार काही दिवसातच येणार, असे म्हणता म्हणता मविआचे सरकार अधिक घट्टपणे पाय रोवून महाराष्ट्रात उभे राहिले आहे. मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, असे म्हणता म्हणता पहाटेचा शपथविधीही काही चमत्कार करू शकला नसल्याने विरोधकांना नामोहरम करण्याची नामी संधी भाजपा कोणत्याही परिस्थितीत गमावणार नाही.

आपल्या पक्षाकडे असलेला अधिक मतांचा कोटा आपल्या उमेदवाराला देण्याची खेळी त्यावेळी खेळता येते. त्यामुळे या निवडणुकीत थेट कोणाचा पराभव करत येत नसला तरी राजकीय चाणाक्यनिती वापरून शत्रूला चीतपट नक्कीच करता येत असल्यानं भाजपानं अत्यंत हुशारीनं त्यांचा तिसरा उमेदवार रिंगणात उतरवला आहे. या गणिताचा फटका शिवसेनेचे पवार, भाजपाचे बोंडे वा महाडिक किंवा काँग्रेसच्या प्रतापगढी यापैकी कोणा एकाला बसणार आहे. गेल्या काही दिवसात शिवसेना आणि भाजपातील वाद अधिक शिगेला पोहचल्यानं दोन्ही पक्षांनी ही निवडणूक अटीतटीची केली आहे. (Dhananjay Mahadik)

फडणवीस यांनी शिवसेनेला शह देण्यासाठी तिसरा उमेदवार रिंगणात आणून डोकेदुखी वाढवली आहे.

भाजपाच्या तिन्ही जागा निवडून आल्यास मविआला हा मोठा धक्का असेल. मुळात रिक्त होणाऱ्या जागांमध्ये भाजपा तीन आणि शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांचे प्रत्येकी एक खासदार निवृत्त झाले आहेत. त्यात शिवसेनेने आपला दुसरा उमेदवार रिंगणात आणला आहे. त्या उमेदवाराला चीतपट करणे हिच भाजपाची रणनिती आहे. भाजपाला आपले राज्यातील वर्चस्व सिद्ध करण्याची ही नामी संधी आहे. त्यात ते यशस्वी होतील असा दावा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सगळ्याच वरिष्ठांनी केला आहे. गोव्यात झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत फडणवीसांची निती भाजपाला सत्ता देवून गेली आहे. आता त्याच फडणवीस यांनी शिवसेनेला शह देण्यासाठी तिसरा उमेदवार रिंगणात आणून शत्रू पक्षाची डोकेदुखी वाढवली आहे.

महाविकास आघाडी  169
शिवसेना (५६)
राष्ट्रवादी काँग्रेस (५३)
काँग्रेस (४३)
बहुजन विकास आघाडी (३)
प्रहार जनशक्ति (२)
समाजवादी पक्ष (२)
शेकाप (१)
स्वाभीमानी शेतकरी पक्ष (१)
अपक्ष (८)

भाजपाप्रणित आघाडी ११४
भाजपा (१०७)
रासप (१)
जनसुराज्य (१)
अपक्ष (५)

अन्य एकूण ४
एमआयएम (२), सीपीएम (१) मनसे (१), रिक्त (१)

-स्वाशिष अक्कलकोटकर.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.