Home » Syria : महिलांची नग्न मिरवणूक सिरियात परिस्थिती बिकट !

Syria : महिलांची नग्न मिरवणूक सिरियात परिस्थिती बिकट !

by Team Gajawaja
0 comment
Syria
Share

जगभरात महिला दिनाचे निमित्त साधत महिलांचा सन्मान होत असतांना सिरिया या देशातील महिलांना मात्र नरकयातना सहन कराव्या लागत आहेत. माजी राष्ट्राध्यक्ष बशर-अल-असद यांच्या विरुद्ध सुरु झालेल्या बंडानंतर काही काळ शांत झालेल्या सिरायामध्ये पुन्हा प्रचंड प्रमाणात हिंसाचार सुरु झाला आहे. यात माजी राष्ट्रपती बशर यांना पाठिंबा देणा-यांना पकडण्यात येत असून त्यांना जाहीरपणे मारण्यात येत आहे. यातील महिलांना नग्न करुन त्यांची मिरवणूक काढण्यात आली आहे. (Syria)

सिरियामधील परिस्थिती एवढी भयंकर आहे की, येथील मुख्य शहरात सर्वत्र मृतदेह पडले आहेत. यापैकी अनेक मृतदेह कुजले असून 1000 हून अधिक लोकांना येथे हालहाल करुन मारण्यात आले आहे. सिरियामध्ये सध्या जे सरकार आहे, त्या सरकारच्या पाठिराख्यांनीच हा हिंसाचार सुरु केल्यामुळे सिरियाच्या रस्त्यावर सर्वत्र या बंदुकधा-यांचा वावर आहे. गेल्या तीन महिन्यातील ही सर्वात दारुण परिस्थिती असून याबाबत जागतिक मानवाधिकार संघनेनंही चिंता व्यक्त केली आहे. त्यातही या हिंसाचारात महिलांच्या होणा-या विटंबनेबाबत चिंता व्यक्त केली आहे. (International News)

सिरियामध्ये माजी राष्ट्राध्यक्ष बशर-अल-असद यांना देशाबाहेर काढल्यावर शांतता येईल, हा समज खोटा ठरला आहे. सध्या सिरिया बसर यांच्या विरोधात उठलेल्या बंडापेक्षा अधिक मोठ्या हिंसाचारातून जात आहे. सिरियातील हयात तहरीर अल-शामच्या अंतरिम सरकारच्या सुरक्षा दलांमध्ये आणि माजी राष्ट्रपती बशर अल-असद यांच्या समर्थकांमध्ये रोज हिंसाचाराच्या घटना होत आहेत. तीन महिन्यांपूर्वी सिरियात नवीन राजवट आल्यापासून अलावाइट समुदयातील व्यक्तींवर मोठ्याप्रमाणात हल्ले होत आहेत. हा अल्पसंख्यात समुदाय असून बशर-अल-असद यांच्या राजवटीत या समुदायाच्या लोकांची नेमणूक अनेक महत्त्वाच्या पदावर करण्यात आली होती. यातून बशर यांनी जे अत्याचार केले, त्यांना या अलावाइट समाजातील लोकांचीही साथ होती, त्यामुळे आता त्यांच्यावर राग काढण्यात येत आहे. हा राग एवढा आहे की, ज्या भागात अलावाइट समाजाचे सर्वाधिक लोक रहातात, त्या भागातील वीज आणि पाणीपुरवठाच बंद कऱण्यात आला आहे. शिवाय एकट्या दुकट्या या समाजातील माणसाला पकडून रस्त्यावरच मारण्यात येत आहे. (Syria)

या हिंसाचारामुळे अलावाइट समुदयातील लोकांनी लेबनॉनमध्ये आसरा घ्यायला सुरुवात केली आहे. ज्या घरातील पुरुष लेबनॉनमध्ये पळून गेले आहेत, त्या घरातील एकट्या महिलांना पकडून त्यांना नग्न करुन त्यांची मिरवणूक काढण्यात येत आहे. महिलांच्या शरीराची विटंबना करुन त्यांना गोळ्या मारुन ठार कऱण्यात येत आहे. सिरियाच्या रस्त्यावर कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह पडलेले आहेत. हयात तहरीर अल-शाम आणि बशर अल-असद समर्थकांमध्ये सुरु असलेल्या या हिसांचाराचा सर्वात मोठा फटका बनियास या भागाला बसला आहे. येथे रस्त्यांवर आणि इमारतींच्या छतावर मृतदेह पडलेले आहेत. सीरियन ऑब्झर्व्हेटरी फॉर ह्युमन राईट्सच्या मते, या मृतदेहांना पुरण्यासही विरोध करण्यात येत आहे. बनियासमध्ये अलावाइट समुदायातील लोकांची घरेही लुटण्यात आली आहेत. लुटीनंतर घरे आणि गाड्यांना आग लावण्यात येत आहेत. यात जे लोक हिंसक जमावाच्याहाती लागत आहेत, त्यांना थेट रस्त्यावर फाशीही देण्यात आली आहे. सध्या एचटीएस नेते अबू मोहम्मद अल-जुलानी यांनी स्वतःला सीरियाचे नवे अध्यक्ष म्हणून घोषित केले आहे. त्यांनी हा हिंसाचार असदच्या निष्ठावंतांच्यामुळेच होत असल्याचे सांगितले आहे. (International News)

===============

हे देखील वाचा : Black Turmeric : भारताच्या काळ्या सोन्याला परदेशात मोठी मागणी !

America : अमेरिकेत जन्मलेल्या मुलांनाही देश सोडावा लागणार !

===============

असदच्या निष्ठावंत लढवय्यांनी सुरक्षा दलांवर हल्ला केला, त्यामुळेच हा हिंसाचार उसळला आहे. शिवाय असदच्या लोकांनी बॉम्बस्फोट करत सरकारी सैन्यावर हल्ला केल्याचा दावाही मोहम्मद जुलानी यांनी केला आहे. अर्थातच या हिसांचाराला सरकारचा पाठिंबा असून कोणत्याही व्यक्तिला हिंसाचार प्रकरणी अटक करण्यात आलेली नाही. बशर अल-असद हे सलग 24 वर्षे सीरियाचे राष्ट्राध्यक्ष होते. सध्या बशर आपल्या कुटुंबासह रशियामध्ये असून त्यानीच अलावाइट समुदयाच्या लोकांना हिंसा करायला प्रोत्साहन दिल्याचेही सांगण्यात येत आहे. आता सिरियाचा अध्यक्ष असलेला जुलानी हा 2016 पासून बशर यांच्या विरोधात सेना तयार करीत होता. त्याच्या सैन्यात चीनमधील उइगर मुस्लिमांपासून ते अरब आणि मध्य आशियातील नागरिकांचा समावेश आहे. आता हेच जुलानीचे सैन्य अलावाइट समाजातील लोकांच्या घरात घुसून त्यांना गोळ्या घालत आहेत. (Syria)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.