Home » दुर्गा भोळेंच्या ज्योत्स्ना भोळे कशा झाल्या? काय होतं नाव बदलण्याचं खरं कारण? 

दुर्गा भोळेंच्या ज्योत्स्ना भोळे कशा झाल्या? काय होतं नाव बदलण्याचं खरं कारण? 

by Team Gajawaja
0 comment
Jyotsna Keshav Bhole
Share

मराठी रंगभूमीवर पाऊल ठेवणाऱ्या पहिल्या महिला कलाकर म्हणून मान दिला जातो तो जोत्स्ना भोळे यांना. जोत्स्ना भोळे म्हणजे मराठी रंगभूमीला मिळालेली दैवी देणगी, एक बहुआयामी व्यक्तिमत्व.  आकाशवाणीच्या जमान्यात जोत्स्ना भोळे यांच्या गाण्यांचे लाखो चाहते होते. भावगीत, नाट्यगीत गायिका असलेल्या जोत्स्ना भोळे या तेवढ्याच सक्षम अभिनेत्री आणि लेखिकाही होत्या. त्या सुपरस्टार होत्या, पण हा स्टारडम या बाईंनी कधीही दाखवला नाही की मिरवला नाही.(Jyotsna Keshav Bhole)

अत्यंत साधी रहाणी आणि तेवढीच उच्च विचारसरणी. आपल्या मातीचं कायम ऋण मानणाऱ्या संस्कार जपणाऱ्या आणि आधुनिक विचारांना सोबत घेऊन चालणाऱ्या जोत्स्ना भोळे यांचा सर्वच जीवनप्रवास हा कायम नवोदित गायकांना प्रेरणादायी राहीला आहे. आज त्यांची 21 वी पुण्यतिथी. मात्र येवढ्या कालावधीनंतरही जोत्स्ना भोळे हे नाव ऐकू आलं की, चाहत्यांच्या मनात जोत्स्नाबाईंचा आवाज घुमू लागतो…हीच  जोत्स्ना भोळे नावामागची जादू आहे आणि ती सदैव कायम रहाणार आहे.  

पु.ल. देशपांडे यांनी संगीतबद्ध केलेलं “माझीया माहेरा जा…माझीया माहेरा जा…पाखरा…” हे जोत्स्ना भोळे यांनी गायलेलं भावगीत जेव्हा आकाशवाणीवर चालू व्हायचं तेव्हा प्रत्येक माहेरवाशीण आपल्या आईच्या आठवणीनं डोळ्यातून आसवं काढायची. जोत्स्नाबाईंचा आवाजच असा…ह्दयाचा ठाव घेणारा…ज्योत्स्ना यांचा जन्म 11 मे 1914 रोजी गोव्यातील एका छोट्या गावात झाला. राधाबाई आणि वामन केळेकर यांना जन्मलेल्या चौदा भावंडांपैकी त्या एक होत्या.  

त्यांचं माहेरचं नाव दुर्गा. अगदी बालवयापासून त्यांना गाण्याची आवड. मंदिरातील पुजारी हातावर प्रसाद देऊन देवाचे गीत गायला सांगायचे, त्यातून गाणं फुलत गेलं. आपल्या गाण्याच्या समृद्धीचे सगळे श्रेय त्या आपल्या कुटुंबियांना द्यायच्या.(Jyotsna Keshav Bhole) 

लहानपणापासून गाता गळा असलेल्या जोत्स्नाबाईंना त्यांच्या कुटुंबियांनी कधी रोखलं नाही.  “शाळेत मन लागत नाही का…मग तुला गाणं आवडतं का…शिक ना गाणं…”, असं म्हणत घरच्यांनी पाठिंबा दिला. ‘दुर्गाबाय’ हे त्यांचं घरगुती नाव. पण प्रसिद्धी मिळाल्यावरही ‘दुर्गाबाय’ या नावाला आणि गोव्याच्या कोकणी भाषेला कधीही अंतर दिलं नाही.  

जोत्स्नाबाईंच्या मोठ्या भगिनी गिरिजाबाईही गायिका. या गिरीजाताईंचा हात धरुन वयाच्या आठव्या वर्षी त्या मुंबईत आल्या. या निर्णयानं त्यांच्या आयुष्यातलं नवं पर्व सुरु झालं कारण गाण्याचं शास्त्रीय शिक्षण चालू झालं. लॅमिंग्टन रोडवरील महापालिकेच्या शाळेत त्यांनी चौथीपर्यंत शिक्षण घेतलं, नंतर मात्र शिक्षणाला कायमचा रामराम करत त्यांची संगीतातील सूरांमध्ये मास्टरी चालू झाली.  

आग्रा घराण्यातील खादिम हुसेन खान आणि इनायत हुसेन खान यांच्याकडे त्यांनी गाण्याचे धडे गिरवले. मुंबईतील आंतरशालेय गायन स्पर्धांची कित्येक बक्षिसं त्यांनी जिंकली. इंडियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन रेडिओच्या बॉम्बे स्टेशनवरही त्या गायच्या. त्यातून बालगायीका म्हणून प्रसिद्धी मिळाली. वयाच्या तेराव्या वर्षीच जोत्स्नाबाई…अर्थात तेव्हाच्या ‘दुर्गा केळकर’ गाण्यात पारंगत झाल्या होत्या.   

====

हे देखील वाचा – आणि भारतात आलेले ओबामा तब्बल ११ मिनिटं गाडीतच बसून राहिले

====

भावगीत प्रकारात तेव्हा केशवराव भोळे हे संगीतप्रेमींमध्ये लोकप्रिय होते.  नाटक आणि संगितकार म्हणून त्यांची ओळख होती. ज्योत्स्नाबाईंचे भाऊ रामराय हे केशवरावांचे मित्र होते. त्यांनी केशवरावांकडे, जोत्स्नाबाईंची शिफारस करुन गाणं शिकवण्याची विनंती केली. केशवरावांनी जोत्स्नाबाईंची ही ओळख लवकरच विवाहात बदलली. तेव्हा जोत्स्नाबाई अठरा वर्षाच्या होत्या.  

विवाहानंतर 1933 साली केशवराव भोळे यांनी नाटयमन्वंतर ही संस्था काढली. आंधळ्यांची शाळा हे या नाट्संस्थेतर्फे काढलेले पहिले नाटक. 1 जुलै 1933 रोजी मुंबईच्या रिपन थेटरमध्ये या नाटकाचा पहिला प्रयोग झाला. यात जोत्स्ना भोळे यांनी नायिकेची भूमिका केली. या नाटकाचे त्याकाळी शंभर प्रयोग झाले आणि विशेष म्हणजे जोत्स्ना भोळे तेव्हा अवघ्या 18 वर्षाच्या होत्या.  

या बाईंनी समाजात खऱ्या अर्थानं महिला स्वातंत्र्यांची मुहूर्तमेढ रोवली. पण त्यातही कुठेही आताताईपणा  केला नाही. रंगभूमी गाजवताना आपण कुणी मोठ्या आहोत, आपला स्टारडम आहे, ही भावनाही त्यांना कधी शिवली नाही. जशा त्या गाण्यात रमायच्या तशाच आवडीनं गजरा गुंफायच्या आणि क्रोशाचे कामही करायच्या.  

रंगभूमीवर त्यांचा वावर सुरु झाला तो त्यांचे पती, केशव भोळे यांच्या प्रोत्साहनानं. त्यांनी कधी जोत्स्नाबाईंना रोखलं नाही. स्त्री पात्र हे महिलांनीच करावं यासाठी केशवराव आग्रही होते. यासाठी आपल्याच घरातून त्यांनी सुरुवात केली. कोण काय म्हणेल याचा विचार न करता, त्यांनी जोत्स्नाबाईंना प्रोत्साहन दिलं आणि रंगभूमीवर आणलं. भावगीत गायिका म्हणून जोत्स्नाबाईंचं नाव झालं. त्यांच्या गाण्याला आकाशवाणीवर कायम मागणी असायची. त्यातून आकाशवाणीने जोत्स्नाबाईंच्या गाण्याचा एक राष्ट्रीय कार्यक्रम आयोजित केला.(Jyotsna Keshav Bhole)   

रंगभूमीवर वावरणाऱ्या आणि आकाशवाणीवर गाणाऱ्या जोत्स्ना भोळे यांना जोत्स्ना ही ओळख मिळाली याचीही एक मजेदार गोष्ट आहे. अनेकांना असं वाटतं की, त्यांनी लग्न झाल्यावर जोत्स्ना हे नाव लावायला सुरुवात केली. मात्र प्रत्यक्षात मात्र वेगळीच कहाणी आहे. 

‘संत सखू’ या चित्रपटाला केशवराव भोळे यांनी संगीत दिले होते. या चित्रपटात ज्योत्स्नाबाईंनी सखूची भूमिका साकारली होती. त्यावेळी त्यांचे नाव दुर्गा होते. मात्र, दुर्गा शिरोडकर नावाची दुसरी अभिनेत्रीही या चित्रपटात काम करत होती.  चित्रिकरणादरम्यान दोन अभिनेत्रींच्या नावात गोंधळ नको, म्हणून केशवराव भोळे यांनीच दुर्गा यांचे जोत्स्ना केले आणि नंतर तेच नाव कायम झाले.  

====

हे देखील वाचा – ‘लोकमान्य टिळकांना’ राजकीय पुढारी व्हायचं नव्हतं; वाचा काय होतं त्यांचं ध्येय…

====

ज्योत्स्नाबाईंच्या रंगभूमीवरील पदार्पणामुळे अन्य महिला कलाकारांना पाठिंबा मिळाला. जोत्स्नाबाई गायिका-अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध झाल्या. त्यांनी केलेली अनेक संगीत नाटकं लोकप्रियतेच्या शिखरावर होती. संगीत कुलवधू या नाटकाचे प्रयोग खेडोपाडीही हाऊसफूल चालायचे. आशीर्वाद, अलंकार, एक होता म्हातारा, रंभा, विद्या हरण, भूमिकन्या सीता, राधामयी अशी त्यांची अनेक नाटकं लोकप्रिय झाली होती. त्यांची गाणीही तेवढीच लोकप्रिय ठरत होती.  

आकाशवाणीवर जोत्स्नाबाईंच्या गाण्याला विशेष पसंती असायची. ‘आला खुशीत्‌ समिंदर…’ हे कोळीगीत, ‘कां रे ऐसी माया’ सारखे नाट्यगीत किंवा ‘माझिया माहेरा जा…’ सारखे भावगीत असो, जोत्स्नाबाईचं प्रत्येक गाणं हिट ठरत होतं.  

जोत्स्ना भोळे यांचं जस गाण्यावर प्रेम होतं तसंच त्यांचं गोव्यावर आणि गोव्याच्या संस्कृतीवरही प्रेम होतं.  अगदी तिथल्या खाद्यसंस्कृतीबद्दलही त्या भरभरून बोलायच्या. मासे त्यांच्या विशेष आवडीचे. आपल्या गुढघ्यापर्यंत लांब केसांचं श्रेयही त्या गोव्याच्या खाद्यसंस्कृतीला द्यायच्या. मासे आणि खोबऱ्याच्या मुबलक वापरानं केस छान झाल्याचे त्या सांगत. गोव्याच्या मातीतच गाणं असल्याचं त्या सांगायच्या…(Jyotsna Keshav Bhole)

गाण्याची समृद्धी जपणात्या ज्योत्स्नाबाईं या उत्तम लेखिकाही होत्या. आराधना नावाच्या नाटकाचे लेखन त्यांनी केले. त्यांनी आपल्या मुलीला लिहिलेल्या पत्राचेही एक पुस्तक प्रकाशित केले आहे. तसेच ‘तुझी ज्योत्स्ना भोळे’ नावाचे त्यांचे आत्मचरित्रही प्रसिद्ध आहे.  

संगीत क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्द्ल त्यांना अनेक मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. त्यामध्ये  संगीत नाटक अकादमी पुरस्कार, विष्णुदास भावे पुरस्कार, लता मंगेशकर पुरस्कार या नामांकित पुरस्कारांचा समावेश आहे. चौसष्ठच्या नाट्य संमेलनाच्या त्या बिनविरोध अध्यक्षही झाल्या होत्या. 

ज्योत्स्ना भोळे यांच्यावर एक लघुपटही निघाला आहे. ज्योत्स्नाबाईंचे 5 ऑगस्ट 2001 रोजी पुणे येथे वयाच्या 87 व्या वर्षी निधन झाले. याआधीच त्यांची एक मुलाखत झाली होती. या मुलाखतीत जोत्स्ना भोळे यांना, “तुम्हाला पुन्हा कुठला जन्म आवडेल”, असा प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा जोत्स्नाबाईंनी काही उत्तर देण्यापेक्षा त्यांचंच एक गाणं गाऊन दाखवलं, “दे मज देवा हा जन्म हा…थकले मी जरी ही मागते पुन्हा दे मज देवा जन्म हा….”(Jyotsna Keshav Bhole)

संगीतावर प्रेम करणाऱ्या आणि संगीताबरोबर आपल्या संस्कृतीला, आपल्या मातीला जपणाऱ्या जोत्साबाई अर्थात दुर्गाबाय कायम रसिकांच्या मनात रहाणार आहेत.

– सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.