दक्षिणेचे सुपरस्टार आणि आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा 8 वर्षाचा मुलगा, मार्क शंकर सिंगापूर येथील ज्या शाळेत शिक्षण घेत आहे, त्या शाळेत आग लागली. या आगीमध्ये एका लहान मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर मार्क शंकरसह काही विद्यार्थी जखमी झाले. पवन कल्याण आपल्या मुलाला घेऊन भारतात परतले असून त्यांनी नुकतीच पत्नी अण्णा लेझनेवासह तिरुमला येथील भगवान वेंकटेश्वराचे दर्शन घेतले. अण्णा लेझनेवा यांनी भगवान वेंकटेश्वराकडे आपल्या मुलाच्या सुरक्षिततेसाठी नवस केला होता, त्यानुसार त्यांनी मुंडणही केले. या सर्वाचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. पण आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री असलेल्या पवन कल्याण यांनी आपल्या 8 वर्षाच्या मुलाला सिंगापूरच्या शाळेत का दाखल केले, हा प्रश्नही विचारण्यात येत आहे. (Singapore)
अर्थात फक्त पवन कल्याणच नव्हे तर भारतातील अनेक मान्यवरांची मुले सिंगापूरमधील शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत. त्यात चित्रपट अभिनेते, राजकीय व्यक्ती, उद्योजक आणि आंतराष्ट्रीय पातळीवरील कंपनीमधील अधिका-यांच्या मुलांचा समावेश आहे. याला मुख्य कारण म्हणजे, भारतात या मुलांभोवती कायम स्टारवलय असते. त्यामुळे त्यांच्या शिक्षणात आणि सुरक्षतेतही अडचणी येतात. पण सिंगापूरमध्ये या मुलांना मोकळेपणे शाळेत वावरता येते. तसेच या सिंगापूरमधील शाळांचा शैक्षणिक स्तर हा जगात सर्वाधिक चांगला असल्याचीही माहिती आहे. त्यामुळेच भारतातील अनेक विद्यार्थी या शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत. (International News)
सिंगापूरमधील शिक्षण व्यवस्था जगातील सर्वोत्तम शिक्षण व्यवस्था मानली जाते. फक्त भारतातूनच नव्हे तर जगभरातून विद्यार्थी या शाळांमध्ये शिक्षण घेण्यासाठी येतात. आंतरराष्ट्रीय स्तरावरील या शाळांमधील शिक्षण सर्वव्यापी असते. यात विविधता असते. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचे विषय निवडण्याचे स्वातंत्र्य मिळते. या शाळांमध्ये अभ्यासासह विद्यार्थ्यांना खेळ, कला, संगीत आणि इतर उपक्रमात सहभागी व्हावे लागते. यामधून विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडवण्यात येते. यात नेतृत्व क्षमता आणि टीमवर्क विद्यार्थ्यांमध्ये विकसीत करण्यात येतात. अर्थातच या शाळांचे शुल्क हे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असते. या शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांच्या निवासापासून ते त्यांच्या रोजच्या डायट आहारापर्यंत सर्व सुविधा देण्यात येतात. सध्या सिंगापूरमध्ये 50 हून अधिक आंतरराष्ट्रीय शाळा असल्याची माहिती आहे. त्यात जागतिक दर्जाचे कॅम्पस असलेल्या शाळाही आहेत. स्टॅमफोर्ड अमेरिकन इंटरनॅशनल स्कूल, द विन्स्टेड स्कूल, मेलबर्न स्पेशलिस्ट इंटरनॅशनल स्कूल, द गिल्ड इंटरनॅशनल कॉलेज, डोव्हर कोर्ट इंटरनॅशनल स्कूलसारख्या मान्यताप्रत शाळा सिंगापूरमध्ये आहेत. (Singapore)
यामध्ये प्राथमिक शिक्षणापासून ते डिग्रीपर्यंतच्या शिक्षणाची व्यवस्था आहे. सिंगापूरमधील शाळांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, येथे अनेक भाषा शिकवल्या जातात. फक्त भाषा बोलायलाच नाही, तर त्यांचा सखोल अभ्यास विद्यार्थ्यांकडून करुन घेण्यात येतो. त्यासाठी या शाळांमध्ये अनेक भाषिक पुस्तकांची ग्रंथालये आहेत. विद्यार्थ्यांकडून वाचन आणि लिखाणही करुन घेण्यात येते. काही शाळा या खेळासाठी ओळखल्या जातात. व्हाईट लॉज, पिबोस गार्डन प्लेस्कूल सिंगापूरमध्ये विद्यार्थांमध्ये मैदानी खेळाप्रती गोडी लावण्याबाबत ओळखल्या जातात. कॅनेडियन इंटरनॅशनल स्कूल सिंगापूर ही 1990 मध्ये स्थापन झालेली शाळा सर्वाधिक लोकप्रिय आहे. या शाळेत इंग्रजीसह, चीनची मॅडरिन, फ्रेंच या भाषाही शिकवल्या जातात. आंतरराष्ट्रीय बॅकलॅरिएट वर्ल्ड स्कूल आणि वेस्टर्न असोसिएशन ऑफ स्कूल्स अँड कॉलेजद्वारे मान्यताप्राप्त असलेल्या या शाळेत प्रवेश घेण्यासाठी दरवर्षी देशविदेशातील विद्यार्थ्यांची गर्दी होते. (International News)
=======
हे देखील वाचा : Donald Trump : महासत्ता करणार भारताचे अनुकरण !
Pahalgam Attack : आधी धर्म विचारला मग गोळ्या झाडल्या…
=======
याशिवाय इंग्लडमधील मान्यताप्राप्त विद्यापीठांशी संलग्न असलेले डुलविच कॉलेजही येथे लोकप्रिय आहे. येथे ब्रिटिश शिक्षण पद्धतीचा वापर केला जातो. याशिवाय जर्मन विद्यापीठातील अभ्यासक्रमांवर आधारित असलेले बॅकलॅरिएट वर्ल्ड स्कूलमध्येही प्रवेशासाठी गर्दी असते. स्टॅमफोर्ड अमेरिकन इंटरनॅशनल स्कूलमध्येही गेल्या काही वर्षात जगभरातील विद्यार्थी दाखल होत आहेत. मोठा कॅम्पस, अभ्यासासह खेळण्याच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा विद्यार्थ्यांना आकर्षित करतात. या शाळेतील अभ्यासक्रम हे कौन्सिल ऑफ इंटरनॅशनल स्कूल्स आणि वेस्टर्न असोसिएशन ऑफ स्कूल्स अँड कॉलेजेसतर्फे मान्यताप्राप्त असल्यानं पदवीचे शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांचीही येथे गर्दी असते. एकूण काय सिंगापूर हे सध्या जागतिक दर्जाचे शैक्षणिक हब झाले आहे. (Singapore)
सई बने