Home » काश्मिरी केशराला चांदीचा भाव

काश्मिरी केशराला चांदीचा भाव

by Team Gajawaja
0 comment
Kashmiri Saffron
Share

काश्मिरी केशराला (Kashmiri Saffron) जगभर मागणी आहे. अत्यंत मौल्यवान असणारे केशर हे भारतीय खाद्यसंस्कृतीचा महत्त्वाचा घटक आहे. जगभर हे काश्मिरी केशर अत्यंत चढ्या किंमतीत विकले जाते. काश्मिरमध्ये ठराविक महिन्यात या काश्मिरी केशराची शेती केली जाते. केशराची जांभळ्या रंगाची फुलं फुटल्यावर मोठा आनंदोत्सव केला जातो आणि मग प्रत्येक फुल हातानं तोडत त्यातील केशराच्या काड्या जमवल्या जातात. गेल्यावर्षी या काश्मिरी केशराला (Kashmiri Saffron) दोन लाखांच्यावर किलोचा भाव मिळाला होता. पण यावर्षी काश्मिरी केशर दुप्पट महाग झालं आहे.  जवळपास चार लाख किलोपर्यंत हे काश्मिरी केशर पोहचलं आहे. चांदीपेक्षाही महाग असलेल्या या काश्मिरी केशराची किंमत कितीही वाढली तरी त्याची मागणी काही कमी होत नाही. उलट ती मागणी दरवर्षी वाढतच जाते. त्यामुळेच केशराची किंमतही दरवर्षी लाखभरानं वाढते.

केशर आणि भारतीय खाद्यसंस्कृती हे घट्ट समीकरण आहे. पुलाव, बिर्याणी सारख्या मसालेदार पदार्थांमध्ये जेवढा केशराचा उपयोग होतो, तेवढाच केशराचा उपयोग मिठाईंमध्येही होतो. सोबत केशर हे औषधासारखेही वापरले जाते. केशर स्वादाच्या मिठाया केशराच्या दराप्रमाणेच सर्वाधिक दरानं विकल्या जातात. एवढा चढा दर असूनही काश्मिरी केशराला का मागणी असते, हे जाणून घ्यायला हवे. त्यामागे मुख्य कारण म्हणजे, केशराच्या एका काडीमध्ये असलेले अगणीत गुण.  

सध्या 10 ग्रॅम केशरची किंमत 3 हजार 250 रुपयांवर गेली आहे. या किंमतीमध्ये 47 ग्रॅम चांदी खरेदी करता येते. काश्मिर खो-यात यावर्षी एक किलो केशरासाठी 3 लाख 25 हजार रुपये मोजावे लागत आहेत. तर काश्मिरच्या बाहेर ही किंमत चार लाखाच्या आसपास पोहचली आहे. नुकताच काश्मिरी केशराला जीआय  टॅग मिळाला आहे. यामुळे काश्मिरी केशराला (Kashmiri Saffron) त्याच्या काश्मिरी या नावाचा अधिक फायदा मिळाला आहे. काश्मिरी केशराला खरतर जगभरात स्पर्धाच नाही, एवढी त्याची गुणवत्ता आहे. पण अलिकडे इराणमध्ये होत असलेले केशर बाजारात येत होते.  पण काश्मिरी केशराला जीआय टॅग मिळाल्यावर काश्मिरी केशराची गुणवत्ता पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे. 

काश्मीरमध्ये, पंपोर परिसरात केशराची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. दरवर्षी 18 टन केशराचे उत्पादन होते. येत्या काही वर्षांत हे उत्पादन 30 टनापर्यंत वाढेल असे प्रयत्न करण्यात येत आहेत. जिथे केशराचे उत्पादन होते, त्या भागात राष्ट्रीय केशर अभियान सुरू करण्यात आले आहे. याचा फायदा स्थानिक शेतक-यांना झाला आहे. जागतिक बाजारपेठेत हे शेतकरी थेट केशर विकत असून त्यांना मोठा फायदा मिळत आहे. काश्मिरी केशरचा रंग लाल असतो. हे केशर बारीक तंतूंनी बनलेले असते. त्याला कमळासारखा वास येतो. केशराच्या तिन्ही श्रेणींमध्ये हे सर्वोत्तम मानले जाते. तर इराण मधील केशर तंतुमय, फिकट पिवळ्या रंगाचे असते. त्याला आणि मधासारखा वास येतो. हा या दोन केशरमधील फरक लक्षात घेतला तर केशर घेतांना होणारी फसवणुकीही टाळता येते.  

=======

हे देखील वाचा : आधार- पॅन कार्ड लिंक न केल्यास टॅक्सपेअर्सला बसणार 6 हजारांचा झटका

=======

आयुर्वेदानुसार केशराचे अनेक फायदे आहेत. अगदी लहान वयापासून ते वृद्धांपर्यंत केशर उपयोगी आहे. गर्भवती मातांनाही केशराचे दूध पिण्यासाठी दिले जाते. त्याचप्रमाणे अशक्तपणा, सर्दी आणि ताप असेल तरीही केशर सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. केसांमध्ये कोंडा होण्याचा त्रास अनेकांना असतो. या कोंड्यामुळे अनेकवेळा डोक्यावर जखमाही होतात. पण यावर तेलात केशर टाकून मसाज केल्यास केसातील कोंडा दूर होण्यास मदत होते. लहानमुलांना सर्दीचा आजार वारंवार होतो. अशावेळी मुलांना दुधामधून केशर नियमीत दिल्यास सर्दी, कफाचा आजार दूर होतोच, शिवाय मुलांची रोगप्रतिकारक्षमताही वाढते. निरोगी पचनसंस्था हवी असेल तरीही केशराचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो. आतडयांच्या आजारात केशराचे सेवन केल्यास आराम पडतो. महिलांसाठी तर केशराच्या काड्या वरदान ठरतात.  मासिक पाळीदरम्यान होणा-या वेदनांवर केशर हा एक महत्त्वाचा उपाय आहे. केशर टाकलेले दुध प्यायल्यानं मासिक पाळीदरम्यान होणा-या वेदना कमी होतात. नाकातून होणारा रक्तस्त्राव, सांधेदुखी, मायग्रेन यासह मानसिक आजारातही केशराचा वापर हा फायदेशीर ठरतो.  

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.