Home » पुष्कर मेळाव्यामध्ये उंट मेळाव्याचे दर्शन

पुष्कर मेळाव्यामध्ये उंट मेळाव्याचे दर्शन

by Team Gajawaja
0 comment
Pushkar Mela
Share

राजस्थान हे भारतातीलच नव्हे तर परदेशातील पर्यटकांचेही आवडते स्थळ आहे.  राजस्थानच्या पुष्कर येथे भरणारा पुष्कर मेळा (Pushkar Mela) तर पर्यटकांसाठी अत्यंत आवडता उत्सव ठरत आहे.  यंदा कोरोनाचे सावट दूर झाल्यावर हा पुष्कर मेळा मोठ्या उत्सहानं भरणार आहे.  31 ऑक्टोबर पासून सुरु झालेला हा पुष्कर मेळा 9 नोव्हेंबर पर्यंत पर्यटकांचे मनोरंजन करणार आहे.  यात हेलिकॉप्टर रायडिंग, काइट फेस्टिव्हल सोबत उंट आणि घोड्यांची होणारी सौदर्य स्पर्धा हा मोठा उत्सुकतेचा भाग असतो.  नयनरम्य तलावाच्या काठावर असलेल्या या पुष्कर शहरात या मेळाव्या दरम्यान देश-विदेशातील हजारो पर्यटक भेट देतात. भारतातील अतिशय लोकप्रिय जत्रोत्सव म्हणून पुष्कर मेळ्याची नोंद आहे.   

राजस्थानमधील पुष्करचे नाव आल्यावर दोन गोष्टींची प्रामुख्याने आठवण येते.  एक म्हणजे ब्रह्माजींचे मंदिर आणि दुसरे म्हणजे पुष्कर मेळा.  संपूर्ण भारतात जत्रा आणि मेळे मोठ्या प्रमाणात भरत असले तरी पुष्करच्या मेळाव्यामधील उंटांची जत्रा  वैशिष्टपूर्ण ठरली आहे. हा पुष्कर मेळा (Pushkar Mela) कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी सुरु होतो.  आता हा मेळा 31 ऑक्टोबर सुरु होऊन 9 नोव्हेंबर रोजी मेळा संपन्न होणार आहे.  हा पुष्कर मेळा अनेक वर्षांपासून सुरू असून राजस्थान सरकार यासाठी विशेष अनुदानही देत आहे.  पुष्करचे वाळवंट या मेळाव्या दरम्यान एका मोठ्या समारंभासारखे सजवण्यात आले आहे.   पुष्करचा मेळा (Pushkar Mela) हा परदेशी पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्र आहे.  यावर्षीही हजारो पर्यटक या मेळाव्यासाठी दाखल झाले आहेत.  जत्रेचे ठिकाण रंगीबेरंगी फुग्यांनी सजवण्यात आले आहे.  या मेळाव्यामध्ये (Pushkar Mela) हेलिकॉप्टर रायडिंग आणि काइट फेस्टिव्हलचे आयोजन खास ठरणार आहे.  याशिवाय  भक्तीपर कार्यक्रम, संस्कृती, क्रिडा आणि चित्रपट कलाकारांचेही कार्यक्रम होणार आहेत. दररोज सकाळपासून सायंकाळपर्यंत देशी-विदेशी भाविक आणि पर्यटकांना विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. मेळाव्याची सर्व तयारी प्रशासनाने पूर्ण केली असली तरी या मेळाव्यावर लंम्पी रोगाचेही सावट आहे.  राजस्थानमध्ये लंम्पी रोगामुळे अनेक गायींचा मृत्यू झाला आहे.  त्यामुळे जनावरांमध्ये आणखी लंम्पी रोगाचा प्रचार होऊ नये म्हणून यावेळी  कमी प्रमाणात उंट आणि घोडे येथे आणण्यात आले आहेत.   

यंदा या पुष्कर मेळ्यात  1 नोव्हेंबर रोजी वाळू कला महोत्सव होणार आहे.  तसेच विद्यार्थिनींचे मांडना स्पर्धा आणि सामूहिक नृत्य होणार आहे. देशी-विदेशी पर्यटकांमध्ये चक दे ​​राजस्थान फुटबॉल सामनाही होणार आहे. सायंकाळी पुष्कर सरोवर घाटावर दीपदान, रांगोळी, महाआरती, पुष्कर अभिषेक आणि मेणबत्ती बलून असे कार्यक्रम होतील.  2 नोव्हेंबर रोजी  सांझी छटावर निसर्ग यात्रा, सँड आर्ट, मेळा, लंगडी लेग, सातोळ्याचा सामना, गिली दांडा स्पर्धा होतील.  3 नोव्हेंबर रोजी पतंग स्पर्धा होणार असून यात परदेशी पर्यटक मोठ्या प्रमाणात सहभागी होणार आहेत.  4 नोव्हेंबर रोजी ग्रामीण खेळांची माहिती पर्यटकांना देण्यात येणार आहे.  तसेच हे खेळ खेळण्याची संधीही पर्यटकांना मिळणार आहे.   5 नोव्हेंबर रोजी लगान स्टाईल क्रिकेट सामना आणि पगडी स्पर्धा प्रमुख आकर्षण आहे.  6 नोव्हेंबर रोजी महिलांची मटका शर्यत आहे.  7 नोव्हेंबर रोजी होणा-या फोटोग्राफी स्पर्धेत पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात नोंदणी केली आहे.  8 नोव्हेंबर रोजी मेगा कल्चरल इव्हेंट होणार आहे.  या मेळाव्याच्या सर्व दिवस राजस्थानमधील कलाकुसरीच्या वस्तुंची खरेदी करता येणार आहे.  तसेच रोज सायंकाळी भजन संध्या, पुष्कर सरोवर येथे दीपदान आणि महाआरती होणार आहे.  

========

हे देखील वाचा :

========

पुष्कर मेळा कार्तिक पौर्णिमेला सुरू होतो त्यावेळी पुष्कर तलावात स्नान करणे पवित्र मानले जाते.  या दिवशी लाखो भाविक तलावात स्नान करून ब्रह्मदेवाचा आशीर्वाद घेतात. या पुष्कर मेळाव्याला उंट मेळावा असेही स्थानिकांमध्ये म्हटले जाते.  यावर्षी लंम्पी रोगाचा फैलाव बघता मोजक्या उंटांनाच या मेळाव्यात आणले जाणार आहे.  हा उंटमेळा जवळपास 100 वर्षापासून आयोजित केला जात आहे.  उंट हे पुष्कर मेळाव्याचे मुख्य आकर्षण आहे, त्यामुळे हे सजवलेले उंट बघण्यासाठी आणि त्यांचे छायाचित्र घेण्यासाठीही येथे पर्यटकांची गर्दी झाली आहे.  9 नोव्हेंबर पर्यंत पुष्कर येथे  भरलेला हा पुष्कर मेळा (Pushkar Mela)जस्थानी संस्कृतीचे प्रतिक आहे.  यावर्षीच्या अखेरीस भरणा-या या मेळाव्याला पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे.  राजस्थानी पदार्थांची मेजवानी आणि कलाकुसरीच्या वस्तूंच्या खरेदीसाठी या पुष्कर मेळाव्याला नक्की भेट द्यायला हवी.  

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.