Home » सिद्धू मुसेवालाच्या हत्येचा सूत्रधार लॉरेन्स बिश्नोईचा थक्क करणारा गुन्हेगारी प्रवास

सिद्धू मुसेवालाच्या हत्येचा सूत्रधार लॉरेन्स बिश्नोईचा थक्क करणारा गुन्हेगारी प्रवास

by Team Gajawaja
0 comment
Lawrence Bishnoi
Share

देशाची राजधानी दिल्लीपासून सात तास अंतरावर दुतरनवाली गावात एका साध्या पंजाबी कुटुंबात वाढलेला लॉरेन्स (Lawrence Bishnoi) आज देशाच्या चर्चेचा आणि पोलिसांच्या डोकेदुखीचा विषय झाला आहे. खरंतर गेल्या बऱ्याच काळापासून त्यानं आपल्या गुन्ह्यांमुळे दिल्ली- एनसीआर, राजस्थान, पंजाब, हरियाणा आणि हिमाचल प्रदेशच्या पोलिसांच्या नाकी नऊ आणले होते. पण प्रसिद्ध गायक- राजकारणी सिद्धू मूसवालाच्या हत्येत त्याचा हात असल्याचं आणि तिहारसारख्या उच्च दर्जाची सुरक्षा असलेल्या तुरुंगात बसून त्यानं ही हत्या घडवून आणल्याचं जाहीर झाल्यापासून वातावरण ढवळून निघालं आहे. 

विद्यार्थी नेता ते गुन्हेगार 

दुतरनवाली गावात राहत असताना कधी कुणाशी साधं भांडण न करणारा लॉरेन्स चंदीगढला डीएव्ही कॉलेजमध्ये शिकायला काय गेला, त्याच्या आयुष्याची दिशाच बदलून गेली. काही वर्ष पोलीस दलात काम केलेले आणि नंतर शेतीकडे वळालेले वडील आणि गृहिणी असलेली आई यांच्या संस्कारांमध्ये गावकऱ्यांना कधीच काही वावगं दिसलं नाही. इतर चारचौघांसारखाच तो ही होता, पण मुलाला चांगलं शिक्षण मिळावं म्हणून घरच्यांनी चंदीगढला पाठवलं आणि लॉरेन्सचं आयुष्य वेगळ्याच ट्रॅकवर गेलं. तिथं तो विद्यार्थी नेता बनला. पंजाब विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीला उभं राहिल्यावर त्यानं आपल्या प्रतिस्पर्धीवर गोळीबार केला. त्याला साथ द्यायला समविचारी मित्र होतेच. पोलीस सांगतात, की तेव्हाचे लॉरेन्सचे (Lawrence Bishnoi) मित्र आजही त्याच्या गँगमध्ये आहेत. किंबहुना लॉरेन्स मैत्रीचं नातं रक्ताच्या नात्यापेक्षा जास्त महत्त्वाचं मानतो असं ते म्हणतात. कॉलेजच्या चार- पाच वर्षांत त्यानं भरपूर राडे, मारामाऱ्या केल्या, तुरुंगात जाऊन आला. पदवीधर होईपर्यंत त्याची गँग आणि ताकद दोन्ही कल्पनेपेक्षा जास्त वाढली होती. 

असं उभारलं साम्राज्य

साध्या विद्यार्थी संघटनेपासून सुरू झालेली लॉरेन्सची (Lawrence Bishnoi) गुन्हेगारी पुढे वाढतच गेली. त्यानं दारूच्या व्यापारात गुंतवणूक करायला सुरुवात केली. जोडीला तो आणि त्याची गँग खंडणी उकळणे, गाड्या चोरणे असे वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हेही करत होती. ते करत असताना काही खुनांमध्येही त्याचं नाव जोडलं गेलं. २०१४ मध्ये पोलिसांवर गोळीबार करण्याइतपत त्याची मजल गेली आणि त्यानं परत मागे वळून पाहिलं नाही. आपलं साम्राज्य विस्तारण्यासाठी त्यानं दिल्ली आणि परिसरातल्या काही हाय-प्रोफाइल गुंडांशी ओळख वाढवायला सुरुवात केली. खंडणी आणि खुनाच्या सुपाऱ्या घेणं ही त्याची खासियत बनली. त्या क्षेत्रात त्याचं ‘नाव’ झालं. त्याची गँग भारताच्या राज्याराज्यांत पसरली होतीच, शिवाय थायलंड आणि कॅनडामध्येही त्यानं बस्तान बसवलं. असं करत आज त्याच्या शार्प शूटर्सची गँग ७०० पर्यंत विस्तारली आहे. १०० शूटर्स तर त्याचा आदेश झेलायला सदैव सज्ज थांबलेले असतात असं पोलीस सांगतात. त्यांच्याच मदतीने त्यानं तिहार तुरुंगात बसून सिद्धूची हत्या केल्याची चर्चा आहे. (Lawrence Bishnoi)

==========

हे देखील वाचा – आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार विजेती भारतातील पहिली लेखिका – गीतांजलि श्री

==========

आता काय?

‘पंजाब पोलिसांकडे माझा ताबा देऊ नका, कारण ते खोट्या एन्काउंटरमध्ये माझा बळी घेतील,’ अशी भीती व्यक्त करत लॉरेन्सनं (Lawrence Bishnoi) नुकतीच उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पण शहर न्यायालयानं सिद्धूच्या खूनाच्या संदर्भात दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलकडे पाच दिवसांसाठी त्याचा ताबा दिला आहे. या पाच दिवसांत त्याची कसून चौकशी केली जाणार हे उघड असलं, तरी त्यातून काहीतरी ठाम निष्पन्न व्हावं अशी भाबडी आशा सगळ्यांना आहे, कारण आपल्याला फक्त बॉलिवुडचा सरसो दा सांग, मक्के दी रोटी वाला, मोकळंढाकळं आदरातिथ्य करणारा पंजाब माहीत आहे, प्रत्यक्षात त्याला लॉरेन्ससारख्यांनी रक्तरंजित केलं आहे आणि हा लाल रंग सहज धुतला जाणारा नाही.

– कीर्ती परचुरे


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.