श्री क्षेत्र सिद्धेश्वराचीआख्यायिका
आख्यायिकेनुसार जेव्हा ब्रम्हदेवाला सृष्टी निर्माण करायची होती तेव्हा त्यांनी “ॐ”काराचा अखंड जप केला. त्यांच्या या तपस्येने गणपती प्रसन्न झाला आणि त्याने ब्रम्हदेवाला सृष्टी निर्माण करण्याच्या त्यांच्या इच्छेला पुर्णत्वास जाण्याचा वर दिला. आणि गणपतीने ब्रम्हदेवाच्या दोन कन्यांचा पत्नी म्हणून स्वीकार केला. जेंव्हा ब्रम्हदेव सृष्टी निर्माण करीत होते तेंव्हा भगवान विष्णू हे निद्राधीन झाले. विष्णूच्या कानातून मधु आणि कैतभ हे दैत्य निर्माण झाले. ते देवी-देवतांना छळू लागले. ब्रम्हदेवाच्या लक्षात आले की केवळ विष्णूच या दैत्यांना मारू शकतो, विष्णूने प्रयत्न केले पण ते त्यांना मारू शकला नाही.
विष्णूने प्रयत्नांची शिकस्त केली परंतु ते त्या दैत्यांना मारू शकले नाही. तेव्हा त्यांनी युद्ध थांबवले आणि गंधर्वाचे रूप धारण करून गायन सुरु केले. शंकराने त्यांचे गायन ऐकले आणि त्याला बोलावले, तेव्हा विष्णूने शंकराला दैत्यांबरोबरच्या युद्धाविषयी सांगितले. मग शंकराने त्यांना “ॐ गणेशाय नमः” या मंत्राचा जप करावयास सांगितला. हा जप करण्यासाठी विष्णूने सिद्धटेक या ठिकाणाची निवड केली. या डोंगरावर विष्णूने चार दरवाजे असलेले मंदिर उभे केले आणि त्यात गणपतीच्या मूर्तीची स्थापना केली. गणेशाची आराधना केल्यावर विष्णूला सिद्धी प्राप्त झाली आणि त्यांनी मधु आणि कैतभ या दैत्यांचा संहार केला. कालांतराने विष्णूने उभारलेले मंदिर नष्ट पावले.
दुसऱ्या आख्यायिकेनुसार एका गुराख्याने येथे गणपतीला पाहिले आणि तो गणपतीला पुजू लागला. नंतर इथे पूजा-अर्चा करण्यासाठी त्याला एक पुरोहित मिळाला. अखेरीस पेशव्यांच्या राज्यात इथे पुन्हा मंदिर उभारले गेले. असे मानले जाते की संत श्री मोरया गोसावी आणि खेडचे संत नारायण महाराज यांना या ठिकाणी मुक्ती मिळाली.
श्री सिद्धेश्वर/सिद्धिविनायक मंदिर परिसर
सिद्धिविनायक देवळातील मूर्ती ही स्वयंभू असून ती तीन फुट उंच आहे. ही मूर्ती उत्तराभिमुख असून या गणपतीची सोंड उजवीकडे आहे. अष्टविनायकांपैकी हा एकच गणपती आहे ज्याची सोंड उजवीकडे आहे. ही गणपतीची स्वयंभू मूर्ती एका पितळेच्या चौकटीत स्थित आहे. गणपतीचे पोट जास्त मोठे नसून मांडीवर रिद्धी-सिद्धी बसलेल्या आहेत. गणपतीच्या दोन्ही बाजूला जय-विजय यांच्या पितळ्याच्या मूर्ती स्थित आहेत. गणपतीची मुद्रा अतिशय शांत आहे. असे म्हटले जाते की सिद्धिविनायकाच्या पाच प्रदक्षिणा करणे हे अतिशय फलदायक आहे. एक प्रदक्षिणा म्हणजे ५ किमीचा प्रवास कारण ही मूर्ती डोंगराला जोडलेली आहे. एका प्रदक्षिणेला जवळजवळ अर्धा तास लागतो.
श्री सिद्धिविनायक पूजा
मंदिराचे द्वार सकाळी ४ वाजता उघडले जाते.
४.३० ते ५ श्रींचे पूजन.
सकाळी १० वाजता देवाला खिचडीचा नैवेद्य.
११ वाजता पंचामृती पूजा
दुपारी १२.३० वाजता महानैवेद्य
सूर्यास्तानंतर तिसरी पूजा
रात्री ८.३० ते ९.१५ यावेळात आरती त्यानंतर मंदिर भक्तांसाठी बंद
विजयादशमीला येथे जत्रा भरते
कसे पोहोचाल
मंदिर अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा पासून ४८ किमी अंतरावर पुणे-सोलापूर महामार्गावर स्थित आहे. हे मंदिर भीमा नदीच्या काठावर आहे. मोरगांवहून दोन तासांच्या अंतरावर सिद्धटेक येथे हे मंदिर असून तेथे पोचण्यासाठी चौफुला-पाटस मार्गे प्रवास करावा लागतो.
यात्रेला पुणे आणि सर्व अष्टविनायक मंदिरे यादरम्यान राज्य परिवहन मंडळाच्या विशेष बस जातात. खासगी टूर कंपन्यासुद्धा या टूर्स आयोजित करतात. भक्तांना राहण्यासाठी सर्व मंदिरांच्या ठिकाणी धर्मशाळा, हॉटेल आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे रिसोर्ट उपलब्ध आहेत.
शब्दांकन – शामल भंडारे.
=====
हे देखील वाचा: सातवा गणपती – महाडचा श्री वरदविनायक
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.