अमेरिकेमध्ये १ ऑक्टोबर पासून शटडाऊन जाहीर झाले आहे. आता या शटडाऊनला महिना होत आला असतांना येथील परिस्थिती चिंताजनक झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे जगभरातील युद्ध थांबण्यामध्ये आणि अतिरिक्त कराच्या दबावापोटी जगाला वेठीस ठेऊ पहात असले तरी, खुद्द अमेरिकेतील सामान्य लोकांच्या जीवनावर शटडाऊनचा गंभीर परिणाम झाला आहे. मेरीलँड, कॅलिफोर्निया, अॅरिझोना आणि टेक्साससह अनेक अमेरिकन शहरांमध्ये, हजारो लोक मोफत अन्न मिळविण्यासाठी बँकांमध्ये तासंतास रांगेत उभे असल्याचे दिसून येते. (Donald Trump)

बंदमुळे सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार थांबले असून हे कर्मचारी आपले घर चालवण्यासाठी हॉटेल वा अन्य ठिकाणी मिळेल ते काम करत आहेत. अशातच हजारो लोक एकाचवेळी अन्न बँकेकडून मोफत अन्न घेत असल्यामुळे या अन्न बँकांनाही अन्नटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे त्यांनीही १ नोव्हेंबरपासून मोफत अन्न कार्यक्रम बंद केले जाणार असल्याचे जाहीर केले आहे. यामुळे पुढच्या आठवड्याभरात अमेरिकेतील परिस्थिती अती गंभीर होण्याची शक्यता आहे. तेथील विमान वाहतुकीवरही याचा मोठा परिणाम झाला असून अनेक आंतरराष्ट्रीय विमानांची फेरीही रद्द करण्याची नामुष्की येत आहे. (International News)
शटडाऊनमुळे अमेरिकेतील परिस्थिती बिकट होत चालली आहे. मोफत अन्न मिळवण्यासाठी अनेक सरकारी कर्मचारीच रांगेत हतबलतेनं उभे असल्याचे चित्र येथे दिसत आहे. त्यातच हवाई वाहतूक नियंत्रण कक्षालाही या शटडाऊनचा सर्वात वाईट परिणाम सहन करावा लागत आहे. येथे काम करणा-या कर्मचा-यांना अत्यावश्यक कामगार मानले असले तरी त्यांचा अद्याप पगार मिळालेला नाही. त्यामुळे हे कर्मचारी घर चालवण्यासाठी फूड डिलिवरीसारखी कामंही करत आहेत. (Donald Trump)
हे सर्व कर्मचारी येथील मोफत अन्न उपक्रमाचा लाभ घेत होते. पण ट्रम्प प्रशासनाने १ नोव्हेंबरपासून कोणतीही संघीय अन्न मदत दिली जाणार नाही, असे जाहीर केल्यामुळे आता ट्रम्प सरकारविरोधात रोष अधिक वाढला आहे. १ ऑक्टोबरपासून सुरू झालेला अमेरिकेतील सरकारी शटडाऊन आता महिनाभराचा होत आहे. २० ऑक्टोबर रोजी संसदेच्या वरिष्ठ सभागृह सिनेटने निधी विधेयकावर ११ व्यांदा मतदान केले, परंतु राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा प्रस्ताव पुन्हा नाकारण्यात आला. यामुळे हे अमेरिकेच्या इतिहासातील दुसरे सर्वात मोठे शटडाऊन ठरले आहे. यात अमेरिकेतील सर्वसामान्य जनता भरडली गेली असून अमेरिकेतील अनेक सरकारी कर्मचाऱ्यांना आता अन्न पोहोचवून किंवा तात्पुरत्या नोकऱ्या घेऊन आपले कुटुंब चालवावे लागत आहे. शटडाऊनमुळे अमेरिकेतील ७,५०,००० सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार रोखण्यात आले आहेत. (International News)
यातील बहुतांशी कर्मचारी मिळेल ती नोकरी करुन आपल्या दैनंदिन गरजा भागवत आहेत. त्यातच आता अमेरिकेत कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे विमानसेवा प्रभावित होऊ लागली आहे. पगार गोठवल्यामुळे, हजारो नियंत्रकांना त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. परिस्थिती इतकी भयानक आहे की अनेक नियंत्रक त्यांची नियमित शिफ्ट पूर्ण केल्यानंतर इतर नोकऱ्या करत आहेत. काहीजण टॅक्सीचालक झाले आहेत, तर काही हॉटेलमध्ये वेटर. पण या सर्वांमुळे त्यांच्या आरोग्यावरही मोठा परिणाम झाला आहे. विमान नियंत्रण कक्षात काम कऱणा-या या कर्मचा-यांवर असलेला मानसिक ताण आणि त्यांची होणारी शारीरिक ओढाताण यामुळे त्यांच्या कामावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नुकतेच दक्षिण कॅलिफोर्निया एअर ट्रॅफिक सेंटरमध्ये कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे लॉस एंजेलिस आंतरराष्ट्रीय विमानतळावरील उड्डाणे तात्पुरती थांबवण्यात आली. (Donald Trump)

फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनने यासंदर्भात पत्रक जाहीर करुन जे मोजके वाहतूक नियंत्रक कामावर आहेत, त्यांच्यावर अतिरिक्त कामाचा ताण आल्यानं त्यांची मानसिक परिस्थिती योग्य नसल्याचे सांगितले होते. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक नियंत्रक आजारी पडत आहेत. अशाच वाहतूक नियंत्रकांच्या भरोशावर काम होत राहिल्यास मोठा अपघात होण्याची भीती आता व्यक्त होत आहे. अमेरिकेचे आर्थिक वर्ष १ ऑक्टोबरपासून सुरू होते. हे मूळतः सरकारचे आर्थिक वर्ष असते. यामध्ये सरकार खर्च आणि बजेटचे नियोजन करते. या काळात, सरकार लष्कर, आरोग्य किंवा शिक्षण यासारख्या क्षेत्रात कुठे गुंतवणूक करायची हे ठरवते. मात्र या तारखेपर्यंत नवीन अर्थसंकल्प मंजूर झाला नाही, तर सरकारी कामकाज ठप्प होते. याला शटडाऊन म्हणतात. या शटडाऊनला जबाबदार असलेले, अमेरिकेतील दोन प्रमुख पक्ष, डेमोक्रॅट्स आणि रिपब्लिकन, ओबामा आरोग्य सेवा अनुदान कार्यक्रमावरून एकमेकांशी भांडत आहेत. या भांडणात तेथील सर्वसामान्य नागरिक होरपळले आहेत. (International News)
हे देखील वाचा :
=======
Queen Sirikit : फॅशन क्वीनची एक्झीट !
========
या शटडाऊनचा परिणाम म्हणून ७,८०० हून अधिक उड्डाणांना विलंब झाला आहे. तर ११७ विमान उड्डाने रद्द झाली. या शटडाऊनचा फटका लष्कर, पोलिस, सीमा सुरक्षा आणि हवाई वाहतूक नियंत्रक यासारख्या आवश्यक कर्मचाऱ्यांना बसला आहे. अमेरिकेचे जे लष्करी जवान अन्य देशात तैनात आहेत, त्यांच्या पगाराचीही मुश्किल झाली आहे. परिस्थिती एवढी बिकट झाली आहे की अमेरिकेला आता त्यासाठी अन्य देशांची मदत मागावी लागत आहे. विशेष म्हणजे राष्ट्रीय अण्वस्त्र सुरक्षा एजन्सीने १,४०० कर्मचाऱ्यांना निवृत्त केले आहे. याचा अण्वस्त्रांच्या सुरक्षेवर गंभीर परिणाम होणार असल्याचा इशारा तज्ञांनी दिला आहे. पुढच्या आठवड्याभरात हा शटडाऊन असाच चालू राहिला तर अमेरिकेमधील परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता असून यामुळे तेथील नागरिकांमध्ये असंतोष वाढत आहे. (Donald Trump)
सई बने
