उत्तरप्रदेशमधील प्रभू श्री रामांच्या अयोध्येत आज एक लगबग चालू आहे. ही लगबग आहे, श्रीराम आणि माता सीता यांच्या लग्नाची….विवाह पंचमीच्या दिवशी प्रभू राम आणि माता सीता यांचा विवाह(Marriage of Rama and Sita) झाला…या दिवशी अयोध्येतील 11 मंदिरात हा विवाह सोहळा साजरा करण्यात येतो. आजही हा सोहळा अयोध्येत साजरा होत असून त्यासाठी अवघी अयोध्यानगरी सजवण्यात आली आहे. श्री राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न यांच्या विवाहानिमित्त अयोध्येतील 11 मंदिरात लगबग चालू आहे. प्रभू रामांसह लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न यांना लावली हळद लावण्यात आली असून प्रभू रामांची मिरवणूक काढण्यात येणार आहे. या विवाहसोहळ्यासाठी स्वतः राजा दशरथ महंत असणार आहेत. रात्री या मंदिरांमध्ये सीता आणि रामाच्या लग्नाचा भव्य सोहळा होणार असून या सोहळ्यासाठी विदेशी पर्यटकही मोठ्या संख्येने अयोध्येत पोहोचले आहेत.
हिंदू संस्कृतीत विवाह पंचमी सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. याच दिवशी श्री राम यांचा विवाह साता सीता (Marriage of Rama and Sita)यांच्याशी झाला. अयोध्या आणि नेपाळमध्ये हा दिवस सण म्हणून मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. हिंदू कॅलेंडरनुसार विवाहपंचमी हा सण मागर्शिष महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीला साजरा केला जातो. यावर्षी हा उत्सव आज साजरा केला जात आहे. विवाहपंचमीच्या दिवशी श्री राम आणि माता सीता यांची पूजा केल्याने वैवाहिक जीवनात येणाऱ्या सर्व अडचणी दूर होतात असे सांगण्यात येते.

या विवाहपंचमीनिमित्त अयोध्येतील 11 मंदिरांमध्ये 5 दिवसीय राम विवाह सोहळा सुरू आहे. अयोध्येतील 11 प्रमुख मंदिरांमध्ये 5 दिवस चालणाऱ्या विवाह महोत्सवानिमित्त मोठी सजावट करण्यात आली आहे. उत्सवाच्या पहिल्या दिवशी श्रीगणेशाची पूजा करण्यात आली. या उत्सवासाठी सर्व मंदिराची सजावट करण्यात आली असून मोठ्या मंडपांची उभारणी झाली आहे. या उत्सवासाठी भाविक देशभरातून भेटवस्तू आणि लग्नासंबंधीच्या वस्तू घेऊन दाखल झाले आहेत.
जानकी महल ट्रस्ट येथे राम विवाह सोहळ्याची सुरुवात प्रभू श्री रामांच्या पुजनानं करण्यात आली. रामविवाहातील पाहुण्यांच्या स्वागतासाठी जयपूरहून खास कपडे आणण्यात आले आहेत. रामभक्त संजीव शंकर दिल्लीहून फुले आणि पगडी घेऊन आले आहेत. दिल्लीच्या मानवी आश्रयस्थानाचे संस्थापक संजीव शंकर हे लग्नसोहळ्यासाठी 5 क्विंटल देशी-विदेशी फुले आणि हार घेऊन आले आहेत. सूरतचे दिनेश पांडे हे या विवाहसोहळ्यासाठी चांदीची भांडी घेऊन आले आहेत. तर सुरतचे पद्मभूषण कन्नू भाई टेलर प्रभू रामांच्या सजावटीची जबाबदारी पार पाडत आहेत.
जानकी महल ट्रस्टचे स्वामी राजकुमार दास यांनी सांगितले की, विवाह सोहळ्यात प्रभू रामांना पिवळे वस्त्र आणि विशेष दागिन्यांनी सजवले जाईल. अयोध्येतील सर्व मंदिरांमध्ये श्री राम विवाह (Marriage of Rama and Sita) महोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जात असला आणि त्याची तयारी खूप आधीपासून सुरू होते. मुख्य सोहळा विवाह पंचमीला असला तरी या सर्व मंदिरात विवाहपूर्व विधीही मोठ्या उत्साहात पार पाडल्या जातात.
=======
हे देखील वाचा : कालभैरव जयंतीसाठी काशी नगरी सज्ज
=======
या विविह पंचमीबाबत या मंदिरात कथाही सांगितल्या जातात. भगवान राम आणि सीता यांच्या विवाहाचा (Marriage of Rama and Sita) संदर्भ गोस्वामी तुलसीदासांच्या श्री रामचरितमानस आणि वाल्मिकी रामायणासह विविध रामायण आणि पुराणांमध्ये आहे. त्यानुसार जेव्हा राजा जनक यांनी आपली कन्या सीतेच्या विवाहासाठी धनुष यज्ञ केला तेव्हा भगवान राम आणि लक्ष्मण ऋषी विश्वामित्रांसह तेथे पोहोचले. देश-विदेशातून आलेले राजे ते शिवधनुष्य हलवूही शकले नाहीत. यावर राजा जनक सीतेसाठी योग्य वर न मिळाल्याने दुःखी झाले, तेव्हा विश्वामित्रांनी रामाला धनुष्य उचलण्यास सांगितले. प्रभू रामांनी धनुष्य उचलून पण पूर्ण केला. यानंतर माता सीता आणि प्रभू राम यांचा विवाह झाला. तो दिवस विवाह पंचमीचा होता. ही विवाह पंचमी अयोध्येत मनोभावे साजरी करण्यात येते.
देवाच्या लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी कोलकाता, मुंबई, पंजाबसह देशातील अनेक शहरातून भाविक अयोध्येत दाखल झाले आहेत. जानकी महलचे व्यवस्थापक आदित्य सुल्तानियन यांनी सांगितले की, भगवान श्रीराम आणि सीता यांच्या मूर्तींना हळद लावण्यात आली. यावेळी 150 महिलांनी गाणी गायली. लग्नासाठी खास मिरवणूक काठण्यात येणार आहे. यात 4 घोडे, 2 उंट, आणि गाड्या असणार आहेत. आज 28 नोव्हेंबर रोजी जलग्रहणाचा विधीही पूर्ण होणार असून भक्त कन्यादानात सीतेला शक्तीस्वरूप अर्पण करतील. दुसरीकडे, 29 नोव्हेंबर रोजी प्रभू रामांचा माता सीतेच्या कुटुंबाकडून सुरेल गाण्यांनी सत्कार करण्यात येणार आहे. अयोध्येत श्री रामांच्या लग्नाचा सोहळा चालू असतांनाच 41व्या रामायण सोहळ्याचेही आजोयजन करण्यात आले आहे. या सोहळ्यासाठी ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल, तृप्ती शाक्य, सुरभी सिंग आणि संजोली पांडे हे कलाकार दाखल झाले आहेत. प्रभू रामांच्या भजनाचा सोहळाही त्यामुळे रंगतदार होणार आहे. एकूणच आज अयोध्या नगरीत होणा-या या विवाह सोहळ्याची उत्सुकता फक्त देशातीलच नव्हे तर परदेशातील रामभक्तांनाही लागली आहे. एकूण अयोध्या नगरी राम नामात पुन्हा रंगली आहे.
सई बने