अयोध्येमध्ये प्रभू श्री रामांचे भव्य मंदिर आज उभे आहे. मात्र या मंदिरामागे अनेक वर्षांचा लढा आहे. या लढ्यात एका आखाड्याचे नाव सर्वप्रथम घेण्यात येते. हा आखाडा म्हणजे, श्री निर्वाणी अनी आखाडा. श्री राम मंदिरासाठी अयोध्येत मुघलांसोबत जो सर्वप्रथम लढा दिला, त्यात या श्री निर्वाणी अनी आखाड्याचे साधू सर्वप्रथम होते. फक्त मुघलांसोबतच नाही, तर या साधूंनी इंग्रजांबरोबरही संघर्ष केला. श्री निर्वाणी अनी आखाडा अयोध्येमधील प्रमुख आखाडा मानण्यात येतो. या आखाड्यामधील साधू संत भिक्षा मागत नाहीत. निर्वाणी आखाडा ची स्थापना अभयरामदास जी यांनी केली असून या आखाड्याचा हनुमानगढीवर अधिकार आहे. हरद्वारी, वासंत्य, उज्जयिनी आणि सागरिया अशा चार विभागात या आखाड्यातील साधूंचे विभाजन होते. प्रयागराज येथे होणा-या महाकुंभामध्ये या श्री निर्वाणी अनी आखाड्याचे स्थान मोठे आहे. राममंदिर आंदोलनाशी जोडला गेलेल्या या आखाड्याची अनेक वैशिष्ट्ये आहेत. (Ayodhya)
उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे 13 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या महाकुंभासाठी साधूंचे आखाडे त्यांच्या शिबिरात दाखल झाले आहेत. सनातन परंपरेशी निगडित असलेल्या 14 प्रमुख आखाड्यांची भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली होती. या आखाड्यांमध्ये अयोध्येतील हनुमानगढीवर अधिकार असलेला श्री निर्वाणी अनी आखाडा प्रमुख मानला जातो. श्री निर्वाणी अनी आखाड्याचा मुख्य मठ अयोध्येच्या हनुमान गढीमध्येच आहे. या मठाचे श्रीमहंत म्हणजे धरमदास हे आहेत. याशिवाय गुजरातमधील सुरत येथेही या आखाड्याचा मोठा मठ असून तेथील प्रमुख श्रीमहंत जगन्नाथ दास आहेत. अनी म्हणजे समूह. संताचा समुह असे या आखाड्याच्या नावाचे विश्लेषण केले जाते. श्री निर्वाणी अनी आखाड्याचे स्वतःची घटना आणि नियम आहेत. ही घटना 1825 मध्ये संस्कृत भाषेत लिहिली गेली. देशाच्या स्वातंत्र्यानंतर 1963 मध्ये त्याचे हिंदीत भाषांतर करण्यात आले. या आखाड्यात संत होण्यासाठी कठोर तपश्चर्या करावी लागते. त्यासाठी अयोध्येतील हनुमानगढीमधील प्रमुख आश्रमात जावे लागते. तिथे पोहोचल्यावर सुरुवातीला त्यांना प्रवासी म्हणून काम करावे लागते. या काळात त्यांचे आचार-विचार, रहाणी आणि अभ्यास हा आखाड्याच्या प्रतिष्ठेनुसार असतील तरच त्यांना मुरेठियाचा दर्जा दिला जातो. यानंतर यासर्वांना आखाड्याच्या कठोर निमयांचे काटेकोरपणे पालन करावे लागते. (Social News)
आखाड्याच्या परंपरेनुसार धार्मिक ग्रंथाचा अभ्यास करावा लागतो. ध्यान धारणा करावी लागते. त्यानंतर मंदिराच्या रजिस्टरमध्ये त्यांचे नाव नवीन सदस्य भिक्षू म्हणून नोंदवले जाते. हा कालावधी निघून गेल्यावर त्यांना ‘हुडदांगा’ असे नाव दिले जाते. या नंतर या सर्व नवीन सदस्यांना मंदिरात शास्त्र आणि पुराणांचे शिक्षण मिळते. श्री निर्वाणी अनी आखाड्याची शस्त्र परंपरा मोठी आहे. येथील सर्व साधू शस्त्र वापरात माहीर असतात. या सर्व नव्या सदस्यांना आश्रमातील संतांना भोजन आणि प्रसाद वाटपासह अन्य सेवाही कराव्या लागतात. यातूनच मग त्यांना ज्येष्ठ संतांच्या श्रेणीत घेण्यात येते. हनुमानगढीमध्ये दर 12 वर्षांनी नागपान सोहळा होतो. हा सोहळा या आखाड्यात सामील होण्याची इच्छा असलेल्या साधूंसाठी खूप मोठा दिवस असतो. यामध्ये धर्मप्रसाराची शपथ घेऊन नवीन सदस्यांना साधूपदी दीक्षा दिली जाते. ही दिक्षा दिल्यावर ऐहिक संसार सोडून धर्मप्रसाराची प्रतिज्ञा घेतली जाते. या आखाड्यातील साधू भिक्षा मागण्यासाठी कोठेही जात नाहीत. त्यांच्यासाठी जेवण, प्रसाद, फळे, कपडे आदींची व्यवस्था मंदिराच्या परंपरेनुसार केली जाते. (Ayodhya)
========
हे देखील वाचा : महिला नागा साधूंची कठोर साधना !
======
श्री निर्वाणी अनी आखाड्याचे आणखी एक वैशिष्ट म्हणजे, त्यांची स्वतःची न्यायव्यवस्था. साधुसंतांमध्ये काही वाद असल्यास तो लोकशाही परंपरेनुसार हनुमानगढीमध्ये सोडवला जातो. आखाड्याच्या श्री महंतांची गादी सुद्धा दर 12 वर्षांनी महाकुंभाच्या निमित्ताने लोकशाही पद्धतीने निवड केली जाते. श्री निर्वाणी अनी आखाड्याचे देशभरातील सुमारे 60 हजार संत आणि साधू आहेत. ही सर्व मंडळी भगव्या किंवा पांढ-या रंगाचे कपडे परिधान करतात. त्यांच्या गळ्यात मोठ्या माळा असतात. हे सर्व साधू सनातन धर्म आणि संस्कृतीचा प्रचार करणे हे आपले परम कर्तव्य मानतात. या आखाड्याचे साधू हनुमानगढीवर रोज दीड मण देसी तूपामध्ये पुरी हलवा तयार करतात. सोबत दूध आणि तुपापासून बनवलेल्या विविध पदार्थांचा प्रसाद प्रथम हनुमानाला दाखवला जातो. नंतर या प्रसादाचे वाटप भाविकांना करण्यात येते. मंदिरात मुख्य पुजारी व्यतिरिक्त आखाड्यातील प्रत्येक गटातील एक पुजारी हनुमानजींच्या सेवेत असतो. हनुमानगढी आणि अय़ोध्येच्या रक्षणाची जबाबदारी आपल्यावर आहे, असे श्री निर्वाणी अनी आखाड्याचे साधू मानतात. आता होत असलेल्या महाकुंभमेळ्यामध्ये या आखाड्याचे 60 हजार साधू उपस्थित आहेत. (Social News)
सई बने