गणपती हे महाराष्ट्राचे प्रिय आराध्यदैवत आहे. अष्टविनायक म्हणजे स्वयंभू गणपतीची आठ देवळे होय. ही आठही मंदिरे निसर्गरम्य अशा ठिकाणी स्थित आहेत. या प्रत्येक मंदिरांचा स्वतःचा असा एक स्वतंत्र इतिहास आणि त्यासोबत जोडलेली स्वतःची आख्यायिका आहे. आणि ही सर्व माहिती तितकीच अद्वितीय आहे.
पहिला गणपती – मोरगांवचा श्री मयुरेश्वर
अष्टविनायक तीर्थयात्रेची सुरुवात ही या मंदिराच्या दर्शनाने केली जाते.
आख्यायिका – आख्यायिकेनुसार मिथिला येथील गंडकी नगरीचा राजा चक्रपाणी राज्य करीत होता. तो आणि त्याची राणी उग्रा हे मुल नसल्यामुळे दुःखी होते. त्या दोघांनी सूर्याची उपासना केली आणि आशीर्वाद म्हणून राणीला दिवस गेले. परंतु त्या गर्भाचे तेज आणि प्रभा राणी सहन करू शकली नाही आणि तिने त्या गर्भाला समुद्रात सोडून दिले. त्यातून एका तेजस्वी पुत्राचा जन्म झाला. ब्राम्हणाच्या रुपात येऊन समुद्राने त्या मुलाला राजाच्या हवाली केले.
समुद्रात जन्म पावल्याने राजाने आपल्या मुलाचे नाव सिंधू ठेवले. सूर्याची उपासना करणारा हा सिंधू जस जसा मोठा होत गेला तसतसा तो अधिकाधिक बलशाली होऊ लागला. सिंधूवर प्रसन्न होऊन सूर्याने त्याला वरदान म्हणून अमृत देऊ केले आणि आशीर्वाद दिला की जोपर्यंत हे अमृत त्याच्या नाभीमध्ये आहे तोपर्यंत त्याचा मृत्यू होणार नाही. अमरत्वाचा वर प्राप्त झाल्यावर सिंधूने इंद्र आदि देवांवर आक्रमण केले.
त्याने सर्व देवांचा पराभव केला आणि त्यांना आपल्या तुरुंगात डांबले. मग उरलेल्या देवांनी गणपतींची प्रार्थना केली आणि असुर राजा सिंधूपासून त्यांना वाचवण्याची विनंती केली. प्रसन्न होऊन गणपतींनी त्रेतायुगात पार्वतीचा पुत्र म्हणून जन्म घेतला. यासाठी गणपती मयूरावर आरूढ होऊन पृथ्वीवर अवतीर्ण झाले आणि सिंधू राक्षसाला ठार मारले. त्यामुळे गणपतींना येथे मयुरेश्वर असे नाव पडले.
श्री मोरेश्वर मंदिर आणि परिसर
अष्टविनायक मंदिरांमध्ये हे सर्वात महत्वाचे देऊळ असून याला चार प्रवेशद्वार आहेत. प्रत्येक प्रवेशद्वारावर प्रत्येक युगातील गणपतीच्या अवताराचे चित्र आहे. हे मंदिर उत्तराभिमुख असून त्यास पन्नास फुट उंचीची तटबंदी आहे. मंदिराच्या आवारात दोन दीपमाळा आहेत. मंदिरात प्रवेश करताच सहा फुटी उंच दगडी उंदीर आणि भल्या मोठ्या बसलेल्या नंदीचे दर्शन होते. नंदीचे तोंड गणपतीकडे असून गणपतीसमोर नंदी असणारे हे एकमेव देऊळ आहे. उंदीर आणि नंदी हे मंदिराचे जणू पहारेकरी आहेत. या देवळातील स्वयंभू गणपतीची सोंड ही डावीकडे वळलेली असून गणपतीच्या नाभीत आणि डोळ्यात हिरे जडवलेले आहेत. यामुर्तीवर नागाचे संरक्षक छत्र आहे. मंदिरात रिद्धी (बुद्धी) आणि सिद्धी (क्षमता) यांच्यासुद्धा मूर्ती आहेत.
श्री मोरेश्वर पूजा
सकाळी ५ वाजता प्रक्षाल पूजा (गणपतीचे स्नान),
सकाळी ७ वाजता षोडपचार पूजा,
दुअपारी १२ वाजता दुसरी षोडपचार पूजा,
रात्री ८ वाजता पंचोपचार पूजा,
रात्री १० वाजता शेजारती.
मुख्य गणेश मूर्तीची पूजा दररोज सकाळी ७, दुपारी १२ आणि रात्री ८ वाजता केली जाते. माघ शुक्ल चतुर्थी म्हणजेच गणेश जयंती आणि भाद्रपद शुक्ल चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थी या दोन दिवशी भक्त मोठ्या प्रमाणावर मयुरेश्वराचे दर्शन घेण्यास गर्दी करतात.
कसे पोहोचाल
तुम्ही पुणे किंवा मुंबई तून अष्टविनायक यात्रा आरंभ करत असाल तर मोरगावला येण्यासाठी तुम्हाला पुण्यातून पुणे – हडपसर – सासवड – जेजूरी मार्गे मोरगावला जावे लागेल. हडपसर मधून आतमध्ये सासवडच्या दिशेने गेल्यावर रस्ता थोडा खराब आहे. पुण्यातून मोरगाव पर्यंतचे अंतर ६८ कि. मी. आहे.
शब्दांकन – शामल भंडारे.