ज्याच्या कॅप्टन्सी मुळे दिल्ली कॅपिटल्स संघ फायनल मध्ये पोहोचला असा श्रेयस अय्यर या अपघातानंतर पुढे IPL मध्ये खेळू शकणार आहे की नाही यावर सगळ्यांचं लक्ष होतं मात्र आता ते स्पष्ट झालं. टीम इंडियामधील महत्त्वाच्या खेळाडूचा हा अपघात कसा झाला आणि त्यानंतरच्या त्याच्या या प्रवासाबद्दल …
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये श्रेयस अय्यरची आतापर्यंतची कामगिरी चांगली राहिली आहे. त्याने आतापर्यंत 22 एकदिवसीय सामन्यांमध्ये 42.8 च्या सरासरीने 813 धावा जमवल्या आहेत. त्यामध्ये एक शतक आणि 8 अर्धशतकांचा समावेश आहे. तर टी-20 क्रिकेटमध्ये त्याने 29 सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व केलं आहे. यामध्ये 26 डावांमध्ये त्याने 3 अर्धशतकांच्या मदतीने 550 धावा फटकावल्या आहेत.
मात्र आता आयपीएलचा १४ वा मोसम सुरू होण्याआधीच दिल्ली कॅपिटल्स संघाला मोठा धक्का बसला आहे. दिल्लीच्या संघाचा हुकमी एक्का आणि कर्णधार श्रेयस अय्यर संपूर्ण स्पर्धेला मुकणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना श्रेयस अय्यरच्या खांद्याला दुखापत झाली होती.
श्रेयसच्या खांद्याचं हाड निखळलं होतं. श्रेयस अय्यरवर ८ एप्रिलला शस्त्रक्रिया केली गेली. त्यामुळे आयपीएलच्या १४व्या पर्वाला सुरुवात होण्यापूर्वीच कर्णधाराच्या दुखापतीमुळे दिल्ली कॅपिटल्सला धक्का सहन करावा लागला.
भारतीय संघातील आक्रमक फलंदाज श्रेयस अय्यर हळू हळू दुखापतीतून सावरत आहे असं त्याच्याकडून वारंवार क्रिकेटप्रेमींना दाखवण्यात आलं. त्याबद्दल अनेकदा सोशल मिडीयावर काही व्हिडीओ शेअर केले होते. श्रेयस मैदानात उतरण्यासाठी सज्ज होतोय, असं त्या व्हिडीओमधून स्पष्ट दिसत होतं. शस्त्रक्रियेनंतर त्याने आपल्या फिटनेसवर काम देखील सुरू केलं असल्याचं दिसत होतं. दुखापतीवर मात करत त्याने जोमाने सराव सुरु केला.
याबद्दलचा व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला होता ज्यात तो एका उंच टेकडीवर चढताना दिसतोय, तो वेगाने धावत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसतंय. या व्हिडीओशिवाय अय्यरने त्याचा आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो व्यायाम करताना दिसत होता. खांद्यांना तंदुरुस्त ठेवण्यासाठीचे व्यायाम करत असल्याचे त्याने स्पष्ट केले होते.
दरम्यान, या महिन्याच्या शेवटी श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाची निवड होणार होती. जर सर्व काही ठीक झाले असते आणि जूलैपर्यंत तो पूर्ण फिट झाला असता, तर बीसीसीआयची निवड समितीने त्याची नक्की दाखल घेतली असती. निवड समिती त्याचीदेखील श्रीलंका दौऱ्यासाठी निवड करु शकणार होती, मात्र सगळ्या प्रयत्नांती श्रेयसला यश आलेलं पाहायला मिळालं नाही. अखेर इंग्लडविरुद्धच्या वनडे मालिकेतून बाहेर पडल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार असलेला श्रेयस अय्यर आयपीएल २०२१ मधून बाहेर झाला.
श्रेयस आयपीएल २०२१ खेळणार नसला तरी त्याला प्लेयर्स इन्शुरन्स स्कीम अंतर्गत प्रती पर्वानुसार यंदाही ७ कोटी रुपये मिळणार आहेत. बीसीसीआयच्या करारबद्ध खेळाडूंसाठी ही इन्शुरन्स पॉलिसी आहे. २०११मध्ये बीसीसीआय सचिव एन श्रीनिवासन व भारतीय खेळाडूंत झालेल्या चर्चेनंतर ही पॉलिसी आणली गेली. या पॉलिसीनुसार खेळाडूला दुखापतीमुळे/अपघातामुळे आयपीएलमध्ये खेळता न आल्यास त्यांना भरपाई दिली जाणार आहे. राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व करताना खेळाडूला दुखापत झाली आणि त्याला आयपीएलला पूर्णतः किंवा अंशतः मुकावे लागते, तर तो या भरपाईसाठी पात्र ठरतो.
श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत आता दिल्ली कॅपिटल्सची धुरा आता २३ वर्षीय रिषभ पंतच्या खांद्यावर असणार आहे. रिषभनं याआधी २०१७ साली सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत दिल्लीच्या संघाचं नेतृत्व केलं आहे.
शब्दांकन – शामल भंडारे.
=====
हे देखील वाचा: आयपीएल टीम्सचे मालकी हक्क आणि आर्थिक नफा- तोटा
=====
हे देखील वाचा: एकेकाळी स्टार प्लेअर असलेली आणि वर्ल्डकपमध्ये चमकलेली ही मंडळी… आता कोण बस चालवतंय तर कोण सुतारकाम करतंय …