विश्वेश्वर (Shri Kashi Vishwanath Temple) हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. शंकराचे हे रूप काशीत पूजले जाते. पूर्वी वाराणसी काशी विश्वनाथ मंदिर होते.
विश्वेश्वराची अख्यायिका
काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग संदर्भात अनेक पौराणिक कथा प्रचलित आहेत. एका पौराणिक कथेनुसार, जेव्हा पार्वतीशी लग्न केल्यानंतर सुद्धा भगवान शंकर कैलास पर्वतावर राहू लागले, तेव्हा देवी पार्वती रागावली. तीने आपल्या हृदयाची इच्छा भगवान शंकरासमोर ठेवली. आपल्या प्रियकराकडून हे ऐकून भगवान शिव यांनी कैलास पर्वत सोडला आणि देवी पार्वतीबरोबर काशी शहरात राहण्यास सुरुवात केली. अशाप्रकारे काशी शहरात आल्यानंतर येथे भगवान शिव यांची स्थापना ज्योतिर्लिंगच्या रूपाने झाली. तेव्हापासून विश्वनाथ ज्योतिर्लिंग काशी शहरात भगवान शिवाचे निवासस्थान बनले. असेही मानले जाते की काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग कोणत्याही मनुष्याच्या उपासनेने, तपश्चर्येने प्रकट झाले नाही, परंतु इथे निराकार देव शिव बनून विश्वनाथच्या रूपात प्रकट झाला.
ऐतिहासिक पार्श्वभूमी
हे काशीचे मुख्य विश्वनाथ मंदिर क्रूर आक्रमक कुल्बउद्दीन ऐबक याने पाडले. या मंदिराच्या ठिकाणी मशीद उभारली. अनेक वर्षे दुर्लक्षित आणि मुस्लिमांद्वारे प्रतिबंधित राहिल्यावर अकबराच्या काळात तोरडमल या अभिमानी राजाने या मंदिराचे पुनर्निर्माण केले. परंतु क्रूर आणि धर्मांध औरंगजेब याने हे मंदिर परत पाडून टाकले. अनेक शतके तशीच गेल्या नंतर तेथे अहिल्याबाई होळकर यांनी विश्वनाथ मंदिर बांधले. राजा रणजितसिंग या हिंदू देशाभिमानी राजाने त्याच्या मुख्य शिखरावर सोन्याचा मुलामा चढविला होता. परंतु तो मुसलमानांनी लूटमार करून नेला. १६ व्या शतकात येथेच सन्त एकनाथानी “श्रीएकनाथी भागवत” हा वारकरी सम्प्रदायाचा महान ग्रन्थ लिहीला.
मंदीराचे नियम
मंदिराच्या गाभाऱ्यात दर्शनासाठी जाताना पुरुषांना धोतर-कुर्ता आणि महिलांना साडी परिधान करावी लागते. उज्जैन येथील महाकाल मंदिराच्या धर्तीवर वाराणसीच्या काशी विश्वनाथ मंदिरात भाविकांसाठी ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. या नव्या ड्रेसकोडनुसार, काशी विश्वनाथ मंदिरात भगवंताच्या दर्शनासाठी पुरुषांना धोतर-कुर्ता आणि महिलांना साडी नेसावी लागते. ही पारंपरिक वस्त्रे परिधान करून गेल्यानंतरच भाविकांना देवाला स्पर्श करून दर्शन घेता येणार आहे. मंदिर व्यवस्थापनानं घेतलेल्या निर्णयानुसार आता जीन्स, पॅंट, टी-शर्ट आणि सूट परिधान केलेल्या भाविकांना दर्शन घेता येणार आहे पण देवाला स्पर्श करून दर्शन घेण्याची परवानगी मिळणार नाही.
काशी विश्वनाथची भव्य आरती
काशी विश्वनाथमध्ये केलेली आरती जगभरात प्रसिद्ध आहे. येथे दिवसातून पाच वेळा आरती होते. मंदिर दररोज सकाळी 2.30 वाजता उघडते. बाबा विश्वनाथ मंदिरात, पहाटेची मंगळा आरती दिवसातून चार वेळा केली जाते. मंदिर भक्तांसाठी पहाटे 4 ते सकाळी 11 पर्यंत खुले असते, त्यानंतर आरती झाल्यानंतर भाविक पुन्हा दुपारी 12 ते संध्याकाळी 7 पर्यंत मंदिरात पूजा करू शकतात. संध्याकाळी सात वाजता सप्तऋषी आरतीची वेळ आहे. त्यानंतर भाविक 9 वाजेपर्यंत मंदिरात येऊ शकतात. 9 वाजता भोग आरती सुरू होते, त्यानंतर मंदिरात भक्तांच्या प्रवेशावर बंदी आहे. रात्री 10.30 वाजता शयान आरती होते. रात्री 11 वाजता मंदिर बंद होते.
कसे पोहचाल
उत्तर भारतात स्थापन झालेल्या श्री विश्वेश्वर (काशी विश्वनाथ) ज्योतिर्लिंगला भेट देण्यासाठी तुम्हाला प्रथम वाराणसी शहरात यावे लागेल. त्यासाठी वाहतुकीची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. तुम्ही एकतर हवाई मार्गाने वाराणसीला पोहोचू शकता किंवा तुम्ही रेल्वे आणि रस्त्याने काशी या पवित्र शहरात जाऊ शकता.
वाराणसी शहरापासून 18 किमी अंतरावर असलेले लाल बहादूर शास्त्री विमानतळ हे जवळचे विमानतळ आहे. हे विमानतळ देशातील प्रमुख पर्यटन स्थळांशी थेट जोडलेले आहे. रस्त्याने वाराणसी शहर अलाहाबादपासून 128 किलोमीटर, बोधगयापासून 240 किलोमीटर आणि लखनऊपासून 286 किलोमीटर अंतरावर आहे.
शब्दांकन – शामल भंडारे.
=====
हे देखील वाचा: औंढा नागनाथ – बारा ज्योतिर्लिंग
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.