Home » सातवा गणपती – महाडचा श्री वरदविनायक

सातवा गणपती – महाडचा श्री वरदविनायक

by Correspondent
0 comment
Varadvinayak | K Facts
Share

आठही देवळातील प्रत्येक गणपती हा स्वयंभू असून अतिशय जागृत आहे असे मानले जाते.

श्री क्षेत्र वरदविनायकाची आख्यायिका

आख्यायिकेनुसार कौन्डीन्यपूरचा सम्राट भीम आणि त्याची राणी यांना मूल नव्हते. ऋषी विश्वामित्र हे जंगलात तपस्या करीत होते. त्यांना भेटायला ते दोघे गेले. तेव्हा विश्वामित्र यांनी त्यांना एकाक्षर गणेश मंत्र दिला. त्या मंत्राच्या जपामुळे त्यांना रुक्मंद नावाचा सुपुत्र झाला. राजकुमार रुक्मंद लवकरच लहानाचा मोठा झाला.

राजकुमार एकदा शिकारीला जंगलात गेला असता ऋषी वाचक्नवी यांच्या आश्रमात राहिला. तेव्हा ऋषींची पत्नी मुकुंदा राजकुमार रुक्मंद याच्या प्रेमात पडली. पण राजकुमाराने तिचे प्रेम स्वीकारण्यास नकार दिला आणि तो आश्रम सोडून निघून गेला. मुकुंदा राजकुमारासाठी झुरत असलेली पाहून इंद्राने रुक्मंद याचा वेश धारण केला आणि तो मुकुंदाकडे गेला. त्यातून मुकुंदाला दिवस गेले आणि तिने ग्रीत्सम्द नावाच्या मुलाला जन्म दिला.

ग्रीत्सम्द याला जेंव्हा आपल्या जन्माविषयी समजले तेंव्हा तो आपल्या आईला शाप देतो आणि पुष्पक अरण्यात जाऊन तपस्या करू लागतो. त्याच्या तपाने गणपती प्रसन्न होतो आणि त्याला सांगतो की त्याला एक अतिशय धाडसी मुलगा होईल ज्याला केवळ भगवान शंकरच हरवू शकतील.

ग्रीत्सम्द याने गणपतीला तेथेच कायमचा निवास करण्यास सांगितले आणि ब्रम्हज्ञान देण्याची विनंती केली. आज त्या जंगलाला भद्रका असे म्हणतात. ग्रीत्सम्द याने त्या जागी गणपतीचे मंदिर बांधले आणि तिथे स्थापना केलेल्या गणपतीला वरदविनायक म्हणतात. असे मानले जाते की माघी चतुर्थीला जर इथे प्रसाद म्हणून मिळालेला नारळ खाल्ला तर पुत्र प्राप्ती होते. त्यामुळे माघी उत्सवात या अष्टविनायकाच्या देवळात भक्त अतिशय गर्दी करतात.

श्री वरदविनायक मंदिर आणि परिसर (Shree Varadvinayak Ganapati Temple)

१९८० मध्ये श्री धोंडू पौडकर यांना मूर्ती तळ्यात सापडली होती. ही देवळाच्या गाभाऱ्याच्या बाहेर आहे. मूर्तीची अवस्था एकदम वाईट होती, म्हणूनच देवळाच्या ट्रस्टींनी तिचे विसर्जन केले आणि त्याजागी नवीन मूर्तीची स्थापना केली. काही लोकांनी यावर हरकत घेतली आणि कोर्टात केस दाखल केली. म्हणून आता इथे आपल्याला दोन मुर्त्या दिसतात, एक गाभाऱ्याच्या बाहेर आणि एक गाभाऱ्याच्या आंत. एक मूर्ती आहे जी शेंदुराने माखलेली असून तिची सोंड डावीकडे आहे आणि दुसरी आहे ती शुभ्र संगमरवरी असून तिची सोंड उजवीकडे आहे.

Mahad Ganpati Temple | Varad Vinayak
Mahad Ganpati Temple | Varad Vinayak

गाभाऱ्यात प्रवेश केल्यावर सर्वप्रथम रिद्धी आणि सिद्धी यांच्या मूर्ती दिसतात आणि मग गणपतीच्या दोन मूर्ती. या मूर्ती पूर्वाभिमुख आहेत. या देवळात एक नंदादीप अखंड तेवत आहे. असे म्हणतात की हा नंदादीप १८९२ पासून अखंड जळतो आहे. मंदिराच्या चारी बाजूला ४ हत्तींचे पुतळे आहेत. मंदिराचा हॉल ८० फुट लांब आणि ८० फुट रुंद असून शिखराची उंची २५ फुट असून ते सोनेरी आहे. शिखरावर नागाची नक्षी आहे.

हे एकच असे मंदिर आहे जिथे भक्त मूर्तीच्या जवळ जाऊन स्वतः नैवेद्य दाखवू शकतात.

श्री वरदविनायक पूजा

भाविक दुपारी १२ पर्यंत स्वहस्ते गणपतीची पूजा करू शकतात. दुपारी १२ ते २ या वेळात प्रसाद वाटला जातो.
गणेश चतुर्थी आणि माघ प्रतिपदा ते पंचमी (गणेश जयंती) या दिवसात उत्सव साजरा केला जातो. गणेश जयंतीच्या उत्सवात पुत्रप्राप्तीसाठी प्रार्थना करणाऱ्या भाविकांची प्रचंड गर्दी होते.

कसे पोहोचाल

वरदविनायक (Varadvinayak) रूपातील हा गणपती सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण करून आशीर्वाद प्रदान करतो. पुणे-मुंबई महामार्गापासून तीन किमी दूर खोपोली जवळ आणि पुण्याहून ८० किमी दूर हे मंदिर मुंबईच्या जवळ स्थित आहे. पालीपासून दोन तासांच्या अंतरावर खोपोलीजवळ इमॅजिका मार्गे महामार्गावरून उत्तरेकडे सरळ आणि खोपोलीच्या आधी हे मंदिर वसलेले आहे.

शब्दांकन – शामल भंडारे.

=====

हे देखील वाचा: सहावा गणपती – पालीचा श्री बल्लाळेश्वर

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.