राज्यातील कोल्हापूर, तुळजापूर, माहूर आणि नाशिक या ठिकाणी देवीची साडेतीन पीठं आहेत. या सर्वच तिर्थक्षेत्रांना मोठा मान असून त्यांच्याबद्दलच्या अनेक आख्यायिकाही आहेत. ही सर्वच स्थळे जागृत मानली जातात. त्यामुळे भाविक मनोभावाने या स्थळांना नेहमीच भेटी देतात. मात्र, नवरात्रोत्सवात इथे जास्त गर्दी बघायला मिळते.
1 – महालक्ष्मी मंदिर – कोल्हापूर (Shree Mahalaxmi Ambabai Temple, Kolhapur)
कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर (अंबाबाईचे देऊळ) हे पुराणात उल्लेखलेल्या १०८ पीठांपैकी एक, व महाराष्ट्रात असलेल्या देवीची साडेतीन पीठांपैकी (Sade Teen Shakti peeth) एक आहे. मंदिराच्या मांडणीवरून ते चालुक्यांच्या काळात इ. स. ६०० ते ७०० मध्ये बांधले असण्याची शक्यता आहे.
मंदिराचे पहिले बांधकाम राष्ट्रकूट किंवा त्या आधीचा शिलाहार राजांनी सुमारे आठव्या शतकात केले असावे. पुराणे, अनेक जैन ग्रंथ, ताम्रपत्रे व सापडलेली अनेक कागदपत्रे यांवरून अंबाबाई मंदिराचे पुरातनत्व सिद्ध होते आणि कोल्हापूरची अंबाबाई खर्या अर्थाने अखिल महाराष्ट्राची कुलस्वामिनी ठरते.
महालक्ष्मी मंदिर आख्यायिका
हे देवस्थान देवी पार्वतीला समर्पित असून ह्या देवस्थानामध्ये देवी अंबाबाई च्या रुपामध्ये असेलेल्या पार्वतीचे पूजन होते. येथील रयतेचे कोलासुर नामक दानावापासून रक्षण करण्यासाठी देवी येथे अंबाबाईच्या रुपात अवतरली असे म्हणतात. देवीने कोलासुराचा वध केला. मरण्यापूर्वी कोलासुराने ते ठिकाण त्याच्या नावाने ओळखले जावे असा वर देवीकडे मागितल्याने त्या ठिकाणाला कोलासुर असे नाव देण्यात आले जे कालांतराने अपभ्रंश होऊन कोल्हापूर (Kolhapur) असे झाले अशी आख्यायिका आहे.
मंदिराची ऐतिहासिक पार्श्वभूमी
कधी काळी मुसलमानांनी या देवळाचा विध्वंस केला तेव्हा देवीची मूर्ती पुजार्याने अनेक वर्षे लपवून ठेवली होती असे म्हणतात. पुढे संभाजी महाराज यांच्या कारकीर्दीत इ. स. १७१५ ते १७२२ या कालखंडात मंदिराचे पुनरुज्जीवन करण्यात आले. उत्तम कोरीव काम असलेल्या भिंती व अगदी साधे वरचे शिखर हा कारागिरीतला फरक त्यामुळेच पडला असावा.
भौगोलिक वैशिष्ट्य
भारतीय स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मंदिराची बांधणी कधी झाली याबद्दल निश्चित माहिती उपलब्ध नाही. मात्र सापडलेल्या पाचव्या, सहाव्या शतकांतील शिलालेखात या मंदिराचा उल्लेख असल्याने त्या काळच्या राजवटीत या मंदिराची उभारणी झाल्याचा निष्कर्ष काढला जातो. विस्तीर्ण जागेतील ही मंदिर वास्तू पश्चिमाभिमुख असून त्याच्या बांधकामासाठी ‘रंकाळा’ खाणीतील दगडांचा वापर केला गेला आहे. साऱ्या मंदिराच्या बांधकामात हवा-प्रकाशाचा मेळ साधण्यासाठी योग्य दिशांचा अभ्यास केल्याचे प्रत्ययाला येते. पूर तसेच धरणीकंप अशा नैसर्गिक आपत्तींनी या मंदिर वास्तूवर परिणाम केल्याचे जाणवते. तसेच राजकीय स्थित्यंतरात आलेल्या राज्यकर्त्यांच्या काळात या मंदिराची पुनर्रचना झाली आहे.
मंदिराचे वैशिष्टय
महालक्ष्मी मंदिराचे बांधकाम काळ्या-निळसर दगडाचे आहे. आणि त्याच्या सभोवताली भव्य दगडी तटबंदी उभारलेली असून, त्याच्या चारही बाजूस भली मोठी प्रवेशद्वारे असल्याने येथे येणे-जाणे सोयीचे आहे. त्यातील पश्चिमेकडील दरवाजास महाद्वार तर उत्तर दरवाजा म्हणजे घाटी दरवाजा म्हणून ओळखला जातो. उर्वरित दरवाजे पूर्व तसेच दक्षिण दिशेला आहेत. कोणत्याही दरवाजाने प्रवेश केल्यावर मंदिर सभोवतालच्या चौफेर प्रांगणात आपण येतो.
मंदिराचा बाहेरील भाग मूळ मंदिर उभारणीनंतर जोडला असला तरी मंदिरातील गर्भगृह आणि सभामंडप प्राचीनकाळचे आहेत. तसेच देवालयाची रचना तीन गाभाऱ्यांत विभागली आहे. सुमारे २६,००० चौ. फूट क्षेत्रावरील मंदिर जमिनीपासून तसे उंचावर आहे. सर्व मंदिर वास्तूत जागोजागी उत्कृष्ट शिल्पकलेचा आविष्कार आपल्या नजरेत भरणारा आहे. भक्कम, काळ्या, पाषाणांच्या अनेक शिळांवर शिल्पकाम, नक्षीकाम करून मंदिर सौंदर्य खुलवले आहे.
कसे पोहोचणार
कोल्हापूर मध्ये पोहचण्यासाठी महाराष्ट्राच्या मुख्य शहरांपासून कोल्हापूरला जाण्यासाठी रेल्वे सेवा आहेत. नाशिक वगळता सर्व शहरांमधून कोल्हापूरला जाण्यासाठी ट्रेन उपलब्ध आहेत. नाशिक मधून बस सेवेचा पर्याय आहे.
शब्दांकन – शामल भंडारे.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.