Home » श्रावणी शुक्रवारचे महत्व, पूजाविधी आणि कथा

श्रावणी शुक्रवारचे महत्व, पूजाविधी आणि कथा

by Jyotsna Kulkarni
0 comment
Shravani Shukravar
Share

व्रत वैकल्यांचा महिना असलेला श्रावण सुरु झाला आहे. या महिना म्हणजे रोजचेच सण आणि रोजचे उपवास. या महिन्यात प्रत्येक दिवसाला एक वेगळे आणि खास महत्व असते. श्रावणी सोमवार, मंगळागौर, बुध-बृहस्पती यांचे वार झाल्यानंतर आता आला आहे, श्रावणी शुक्रवार. ९ ऑगस्ट रोजी पहिला श्रावणी शुक्रवार आहे. श्रावणी शुक्रवारचे महत्व अनन्यसाधारण आहे. श्रावणात येणाऱ्या प्रत्येक शुक्रवारी जिवतीची पूजन केले जाते. हे पूजन आपल्या संततीच्या संरक्षणासाठी केले जाते. या दिवशी मुलांना औक्षण देखील केले जाते. तर श्रावण महिन्यातील शुद्ध पक्षात येणाऱ्या शेवटच्या शुक्रवारी वरदलक्ष्मी व्रत करतात.

श्रावण महिना सुरू झाला, की देवघराजवळ जिवतीचा किंवा जीवंतिकेचा कागद चिकटविला जातो. श्रावणातल्या चारही शुक्रवारी जिवतीची पूजा करण्याची पूर्वीपासून चालत आलेली प्रथा आहे. ही पूजा संततीरक्षणार्थ मानली जाते. जिवतीच्या पूजेसह कुलदेवी आणि लक्ष्मी मातेची पूजा करावी, असे सांगितले जाते. जिवतीचे चित्र श्रावण महिन्याच्या सुरुवातीस लावले जाते आणि वाराप्रमाणे त्याची पूजा केली जाते.

श्रावणी शुक्रवारी जिवतीच्या पूजेसह कुलदेवी आणि लक्ष्मी मातेची पूजा केली जाते. या पूजेसाठी दूर्वा, फुले, आघाड्याची पाने लागतात. हे तिघं एकत्र करून त्याची माळ केली जाते आणि ती माळ जिवतीला घातली जाते. सोबतच २१ मण्यांचे कापसाचे गेजवस्त्र देखील अर्पण केले जाते. त्यानंतर जिवती देवीला गंध, अक्षता वाहाव्यात. धूप, दीप दाखवायचे आणि साखरेचा, चणे-फुटाण्यांचा नैवैद्य दाखवावा. यानंतर आरती करावी.

लेकुरवाळ्या सवाष्णीला जेवायला बोलावून पुरणा-वरणाचा स्वयंपाक करून तिची ऐपती प्रमाणे साडीचोळी देऊन ओटी भरावी. जिवतीची पूजा झाल्यानंतर घरातील मुलांना पाटावर बसवून त्यांचे औक्षण करावे. मुले परगावी असल्यास चारही दिशांना औक्षण करून अक्षता टाकाव्या म्हणजे परगावी असलेल्या मुलांचे औक्षण केल्यासारखे होईल. त्या दिवशी देवीची ओटी भरावी. जिवतीची पूजा करतांना जरे जीवन्तिके देवि बालयुक्ते प्रमोदिनी। रक्षाव्रते महाशक्ति पूर्णकामे नमोस्तुते।।, हा म्हटला जातो.

Shravani Shukravar

श्रावण महिन्यातील दुसऱ्या शुक्रवारी लक्ष्मी देवीची उपासना केली जाते. घराची साफसफाई करावी. स्त्रियांनी शुचिर्भूत होऊन सौभाग्य अलंकार परिधान करून पूजेची तयारी करावी. वरदलक्ष्मी व्रताचा संकल्प करावा. चौरंग मांडून त्यावर कलश ठेवून वरदलक्ष्मीचे आवाहन करावे. देवीची श्रीसूक्तयुक्त पूजा करावी. देवीला नैवेद्य दाखवावा. पूजेला आलेल्या स्त्रियांना वाण द्यावे. यानंतर वरदलक्ष्मीची कहाणीचे पठण किंवा श्रवण करावे. या दिवशी संपूर्ण दिवस उपास करावा. संध्याकाळी सुवासिनींना बोलावून हळदी कुंकू करावे. सुवासिनीची खणा-नारळाने ओटी भरावी.

वरदलक्ष्मीचे व्रत हे प्रामुख्याने रोगमुक्ती मिळण्यासाठी केले जाते. या व्रतात अनेक भागात देवीची प्रतिकृती तयार केली जाते. देवीला साडी नेसवत तिचा शृंगार केला जातो. गणेश आणि लक्ष्मीची पूजा केल्याने आपल्याला वरद म्हणजे आशीर्वाद प्राप्त होतो. म्हणून हे वरदलक्ष्मी व्रत म्हणून ओळखले जाते. दक्षिण भारतातील तामिळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेश आदी राज्यांमध्ये गृहिणी वरदलक्ष्मीची पूजा मोठ्या भक्तिभावाने करतात. देशभराच्या विविध भागात हे व्रत विविध नावाने ओळखले जाते. महाराष्ट्रात वरदलक्ष्मी व्रत नावाने लक्ष्मी देवीचे पूजन केले जाते.

श्रावणी शुक्रवारची जिवतीची कथा

ऐका, शुक्रवारा, तुमची कहाणी. आपटपाट नगर होतं. तिथे एक राजा होता. त्या राजला मुलगा नव्हता. तेव्हा राणीनं एका सुईणीला बोलावून आणलं. अगं अगं सुईणी, मला नाळवारीसुद्धा एक मुलगा गुपचुप आणून दे मी तुला पुष्कळ द्रव्य देईन! सुईणीनं गोष्ट कबूल केली. ती त्या तपासावर राहिली. गावात एक गरीब ब्राह्मणाची बाई गर्भार राहिली, तेव्हा ती सुईण तिच्या घरी गेली आणि तिला सांगू लागली की, बाई बाई, तू गरीब आहेस, तुझं बाळंतपणाचं पोट दुखू लागेल तेव्हा मला कळव, मी तुझं बाळंतपण फुकट करीन! तिनं होय म्हणून सांगितलं. नंतर ती सुईण राणीकडे आली. बाईसाहेब, बाईसाहेब, आपल्या नगरात अमुक अमुक गरीब ब्राह्मणाची बाई गरोदर आहे, तिला नुकताच दुसरा महिना लागला आहे, लक्षणं सर्व मुलाचीच दिसताहेत. तेव्हा आपल्या घरापासून तो तेथपर्यंत काही कळणार नाही असं एक गुप्त भुयार तयार करावं. आपल्याला काही दिवस गेल्याची अफवा उठवावी. मी तुम्हाला नाळवारीचा मुलगा आणून देईन. असं ऐकल्याबरोबर राणीला मोठा आनंद झाला आणि जसेजसे दिवस होत गेले, त्याप्रमाणे डोहळ्याचं डंभ केलं. पोट मोठं दिसण्याकरिता त्याच्यावर लुगड्याच्या घड्या बांधल्या भुयार तयार केलं. नऊ मास भरताच बाळंतपणाची तयारी केली.

इकडे ब्राह्मणीणबाईचं पोट दुखू लागलं. सुईणीला बोलावू आलं. त्याबरोबर तुम्ही पुढं व्हा, मी येते म्हणून सांगितलं. धावत धावत राणीकडे आली. पोट दुखण्याचं ढोंग करायला सांगितलं. नंतर ब्राह्मणाच्या घरी आली. बाई बाई, तुझी आहे पहिली खेप. डोळे बांधलेस तर भिणार नाहीस. नाही बांधलेस तर भय वाटेल. असं सांगून तिचे डोळे बांधले. ती बाळंत झाली, मुलगा झाला. सुइणीनं एका दासीकडून भुयाराच्या वाटेनं मुलगा राणीकडे पाठविला व तिनं एक वरवंटा घेऊन त्यास एक कुंचा बांधला आणि तिच्यापुढं ठेवला. मग बाईचे डोळे सोडले. तुला वरवंटाच झाला असं सांगू लागली. तिनं नशिबाला बोल लावले, मनामध्ये दु:खी झाली. सुईण निघून राजवाड्यात गेली. राणीसाहेब बाळंतीण झाल्याची बातमी पसरली. मुलाचं कोडकौतुक होऊ लागलं.

इकडे ब्राह्मणबाईनं नेम धरला. श्रावणमासी दर शुक्रवारी जिवतीची पूजा करावी आणि नमस्कार करून म्हणावं, जय जिवती आई माते, जिथं माझं बाळ असेल,तिथं खुशाल असो. असं म्हणून तिनं तांदूळ उडवावे, ते ह्या मुलाच्या डोक्यावर पडावे. हिरवं लुगडं नेसणं, हिरव्या बांगड्या लेणं वर्ज्य. कारलीच्या मांडवाखालून जाणं वर्ज्य केलं. तांदुळाचं धूण वलांडणं बंद केलं. याप्रमाणं ती नेहमी वागू लागली.

इकडे राजपुत्र मोठा झाला. एके दिवशी बाहेर फिरायला निघाला. त्या दिवशी ती न्हाऊन आपल्या अंगणात राळे राखीत बसली होती, तेव्हा ह्याची नजर तिजवर गेली. हा मोहित झाला व रात्री तिची भेट घ्यायचीम्हणून निश्चय केला. रात्री तिच्या घरी आला. दारात गाय वासरू बांधली होती. चालता चालता राजाचा पाय वासराच्या शेपटावर पडला. वासराला वाचा फुटली. ते आपल्या आईला म्हणालं, कोण्या पाप्यानं माझ्या शेपटावर पाय दिला! तेव्हाती म्हणाली, जो आपल्या आईकडे जावयास भीत नाही, तो तुझ्या शेपटावर पाय द्यायला निर्भल काय? हे ऐकून राजा मागे परतला आणि घरी येऊन आपल्या आईपासनू काशीस जाण्याची परवानगी घेतली.

काशीस जाऊ लागला. जाता जाता एका ब्राह्मणाच्या इथे उतरला. त्या ब्राह्मणाला पुष्कळ मुलं होत होती, पण ती पाचवी सहावीच्या दिवशी जात असत. राजा आला त्या दिवशी चमत्कार झाला. पाचवीचा दिवस होता. राजा दारात निजला होता. सटवी रात्री आली आणि म्हणू लागली, कोण गं मेलं वाटेत पसरलं आहे? जिवती उत्तर करिते, अगं, अगं, माझं ते नवसाचं बाळ निजलं आहे, मी काही त्याला वलांडू देणार नाही. मुलगा आज जाणार म्हणून त्या मुलाचे आईबाप चिंता करीत बसले होते, त्यांनी हा संवाद ऐकला. इतक्यात उत्तर रात्र झाल्यावर ब्राह्मणानं येऊन राजाचे पाय धरले. तुमच्यामुळे आमचा मुलगा जगला, आजचे दिवस मुक्काम करा, अशी विनंती केली. राजानं ती मान्य केली. त्याही रात्री याप्रमाणं प्रकार झाला. दुसरे दिवशी राजा चालता झाला। इकडे ह्यांचा मुलगा वाढता झाला.

पुढे काशीत गेल्यावर यात्रा केली. गयावर्जनाची वेळ आली, पिंड देतेवेळी ते घ्यायला दोन हात वर आले. असं होण्याचं कारण त्यानं ब्राह्मणांना विचारलं. ते म्हणाले,घरी जा, सार्‍या गावातल्या बायकापुरुषांना जेवायला बोलाव, म्हणजे याचं कारण समजेल. मनाला मोठी चुटपूट लागली. घरी आला मोठ्या थाटाचं मावंद केलं, त्या दिवशी शुक्रवार होता. गावात ताकीद दिली, घरी कोणी चूल पेटवू नये, सगळ्यांनी जेवायला यावं. ब्राह्मणीला मोठं संकट पडलं. राजाला निरोप धाडला, मला जिवतीचं व्रत आहे. माझे नेम पुष्कळ आहेत. ते पाळले तर जेवायला येईन! राजानं कबूल केलं. जिथं तांदुळाचं धूण होतं ते काढून तिथं सारवूऩ त्यावरून ती आली. हिरव्या बांगड्या भरल्या नाहीत, कारल्याच्या मांडवाखालून गेली नाही. दर वेळेस जिथं बाळ असेल तिथं खुशाल असो, असं म्हणे.

पुढे पानं वाढली. मोठा थाट जमला. राजाने तूप वाढायला घेतलं. वाढता वाढता ही ज्या पंक्तीत बसली होती तिथं आला. तूप वाढू लागला. ईश्वरी चमत्कार झाला. बाईला प्रेम सुटून पान्हा फुटला. तिच्या स्तनांतून दुधाच्या धारा फुटल्या, त्या ह्याच्या तोंडात उडाल्या. तो हातची तपेली ठेवून रूसून निजला. काही केल्या उठेना. तेव्हा आई गेली, त्याची समजूत करू लागली. तो म्हणाला असं होण्याचं कारण काय? तिनं सांगितलं, ती तुझी खरी आई, मी तुझी मानलेली आई- असं सांगून सर्व हकीकत सांगितली. नंतर भोजनाचा समारंभ झाला. पुढं त्यानं आपल्या आई-बापास राजवाड्यानजीक मोठा वाडा बांधून देऊन त्यासुद्धा आपण राज्य करू लागला. तर जशी जिवती तिला प्रसन्न झाली, तशी तुम्हा आम्हा होवो. ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.

श्रावणी शुक्रवारची लक्ष्मीची कथा

आटपट नगर होतं, तिथे एक गरीब ब्राह्मण राहात होता. तो दारिद्रयानं फार पिडला होता. त्याची बायको शेजारणीच्या घरी एके दिवशी बसायला गेली. आपल्या गरिबीचं गाणं गाईलं. शेजारणीनं तिला शुक्रवारचं व्रत सांगितलं. ती म्हणाली, बाई, बाई, शुक्रवारचं व्रत कर. हे शुक्रवार तू श्रावणापासून धर. सारा दिवस उपास करवा, संध्याकाळी सवाष्णीला बोलवावं, तिचे पाय धुवावे, तिला हळदकुंकू द्यावं, तिची ओटी भरावी, साखर घालून दूध प्यायला द्यावं, भाजलेल्या हरभर्‍याची खिरापत द्यावी, नंतर आपण जेवावं. या प्रमाणे वर्षभर करून तंतर त्याचं उद्यापन करावं. असं सांगितलं. ही घरी आली, देवाची प्रार्थना केली व शु्क्रवारचं व्रत करू लागली.

त्याच गावात तिचा भाऊ रहात असे. तो एके दिवशी सहस्त्रभोजन घालू लागला. सार्‍या गावाला आमंत्रण केलं. बहिणीला काही बोलावलं नाही. ती गरीब, तिला बोलावलं तर लोक हसतील. पुढं दुसर्‍या दिवशी सारे भावाकडे ब्राह्मणांचे थवेच्या थवे येत आहते, पोटभर जेवीत आहेत. बहिणीनं विचार केला. आपला भाऊ सहस्त्रभोजन घालतो आहे, बोलावणं करायला विसरला असेल, तर आपल्या भावाच्या घरी जायला काही हरकत नाही! असा मनात चिवार केला. सोवळं नेसली, बरोबर मुलांना घेतलं आणि भावाच्या घरी गेली.

पुष्कळ पानं मांडली होती, एका पानावर जाऊन बसली. शेजारच्या पानावर मुलांना बसवलं. सर्व पानं भरली, सारं वाढणं झालं, तेव्हा तिच्या भावानं तूप वाढायला घेतलं. वाढता वाढता तिच्या पानाशी आला, ती खाली मान घालून बसली होती. तिला हाक मारली, ”ताई ताई, तुला वस्त्र नाही, पात्र नाही, दाग नाही, दागिना नाही. तुझ्‍याकडे पाहून सगळे लोक हसतात, ह्यामुळे मी तुला काही बोलावलं नाही. आज तू जेवायला आलीस ती आलीस, आता उद्या येऊ नको! असं सांगून पुढे गेला. ही आपली तशीच जेवली, हिरमुसलेलं तोंड केलं, मुलांना घेऊन घरी आली.

दुसरे दिवशी मुलं म्हणू लागली, आई, आई, मामाकडे जेवायला चला! बहिणीनं विचार केला, कसा झाला तरी आपला भाऊच आहे. बोलला म्हणून काय झालं? आपली गरिबी आहे तर आपल्याला ऐकून घेतलंच पाहिजे. आजचा दिवस आपला बाहेर पडला, तितकाच फायदा झाला. असं म्हणून त्याही दिवशी ती भावाकडे जेवायला केली. भाऊ तूप वाढता वाढता तिच्या पानाशी आला. ती खाली मान घालून बसली होती. भावानं तिला हाक मारली, ताई ताई, भिकारडी ती भिकारडी, आणि सांगितलेलं ऐकत नाहीस, तू जेवायला येऊ नको म्हणून काल सांगितलं, आज आपल्या डुकरिणीसारखी पोरं घेऊन आलीस! आज आलीस तर आलीस उद्या आलीस तर हात धरून घालवून देईन. तिनं ते मुकाट्‍यानं ऐकून घेतलं, जेवून उठून चालती झाली. पुन्हा तिसरे दिवशी जेवायला गेली. भावानं पाहिलं, हात धरून घालवून दिली. फार दु:खी झाली. देवाची प्रार्थना केली. सारा दिवस उपवास घडला. देवीला तिची दया आली. दिवसानुदिवस सुखाचे दिवस दाखवू लागली.

असं करता करता वर्ष झालं. बाईचं दरिद्र गेलं. पुढं एके दिवशी ती शुक्रवारचं उद्यापन करू लागली. भावाला जेवायला बोलावलं. भाऊ मानत ओशाळा झाला. बहिणीला म्हणू लागला ताई, ताई, तू उद्या आली नाहीस, तर मी तुझ्या घरी येणार नाही. बहिणींन बरं म्हटल. भावाच्या मनातलं कारण जाणलं. दुसर्‍या दिवशी लवकर उठली, वेणीफणी केली, दागदा‍गिने ल्यायली, उंची पैठणी नेसली आणि भावाकडं जेवायला गेली. तो भाऊ वाट पहात होता. ताई आली तशी तिचा हात धरला, पाटावर बसवलं, पाय धुवायल ऊन पाणी दिलं, पाय पुसायला फडकं दिलं. इतक्या जेवायची पानं वाढली.

Shravani Shukravar

ताईचं पान आपल्या शेजारी मांडलं. भाऊ जेवायला बसला ताईनं आपली शालजोडी काढून बसल्यापाटी ठेवली. भाऊ पाहू लागला. मनात कल्पना केली, शालजोडीनं उकडत असेल म्हणून काढीत असेल, नंतर ताई आपले दागिने काढू लागली. बसल्यापाटी ठेवू लागली. भावाने विचार केला जड झाले म्हणून काढत असेल. नंतर ताईनं भात कालवला, मोठासा घास केला व तो उचलून सरीवर ठेवला. जिलबी उचलून मोत्याच्या पेंड्यावर ठेवलू. भावानं विचारलं, ताई ताई, हे काय करतेस? ती म्हणाली, दादा, मी करते हेच बरोबर आहे. जिला तू जेवायला बोलावलंस तिला मी भरवते आहे. भावाला काही हे समजेना. त्यांन तिला पुन्हा सांगितलं, अगं ताई तू आता जेव तरी.

तिनं सांगितलं, बाबा हे माझं जेवण नाही. हे ह्या लक्ष्मीचं जेवण आहे. माझं जेवण होत ते मी सहस्त्रभोजनाचे दिवशी जेवले. इतकं ऐकल्यावर भाऊ मनात ओशाळला. तसाच उठला आणि बहिणीचे पाय धरले, झाल्या अपराधाची क्षमा मागितली. बहिणीनं क्षमा केल नंतर दोघंजणं जेवली. मनातली आढी काढून टाकली. दोघांनी देवीचे आभार मानले. भाऊ बहिणीकडे जेवायला गेला. तिला आनंद झाला. देवीनं जसं तिला समर्थ करून आनंदी केलं, तसं तुम्हा आम्हां करो. ही साठा उत्तराची कहाणी, पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.

जिवतीची कहाणी

जरा ही मूळची राक्षसी होती. ती मगध देशात असे. मगध नरेश वृद्धाला शरीराचे दोन वेगवेगळे भाग असलेला मुलगा झाला. तो जन्मताच त्याला नगराबाहेर फेकून देण्यात आले. त्यावेळी या जरा राक्षसीने ती दोन शकले एकत्र जुळविली आणि त्या अर्भकाला जीवदान दिले. म्हणून ते बालक ‘जरासंध’ या नावाने ओळखले जाऊ लागले. पुढे मगध देशात जरा राक्षसीचा महोत्सव केला जाऊ लागला. लोक तिला अनेक मुलांची आई समजू लागले. घरोघरी तिची पूजा होऊ लागली. जिवंतिका पूजनामुळे घरात, आरोग्य, धन, सुख लाभते असे म्हटले जाते.

======

हे देखील वाचा : जाणून घ्या नागपंचमीचे महत्व, पूजाविधी आणि कथा

======

जिवतीची आरती

जयदेवी जयदेवी जय जिवती जननी ।
सुखी ठेवी संतति विनति तवचरणी ।
श्रावण येतांचि आणूं प्रतिमा । गृहांत स्थापूनि करू पूजना ।
आघाडा दुर्वा माळा वाहूंया । अक्षता घेऊन कहाणी सांगू या ।
जयदेवी जयदेवी जय जिवती जननी । सुखी ठेवी संतति विनति तवचरणी ।। १ ।।

पुरणपोळीचा नैवेद्य दावूं । सुवासिनींना भोजन देऊं ।
चणे हळदीकुंकू दूधहि देऊं । जमूनि आनंदे आरती गाऊं ।
जयदेवी जयदेवी जय जिवती जननी । सुखी ठेवी संतति विनति तवचरणी ।। २ ।।

सटवीची बाधा होई बाळांना । सोडवी तींतून तूचि तयांना ।
माता यां तुजला करिती प्रार्थना । पूर्ण ही करी मनोकामना ।
जयदेवी जयदेवी जय जिवती जननी । सुखी ठेवी संतति विनति तवचरणी ।। ३ ।।

तुझिया कृपेने सौख्य नांदू दे । वंशाचा वेल नीट वाढूं दे ।
सेवा हे व्रत नित्य घडूं दे । मनींचे हेतू पूर्ण होऊंदे ।
जयदेवी जयदेवी जय जिवती जननी । सुखी ठेवी संतति विनति तवचरणी ।। ४ ।।

 


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.