आपला भारत देश खरोखरच सर्वच नाती अतिशय मनापासून जपण्यासाठी ओळखला जातो. ही नाती फक्त माणसांचीच नाही तर प्राण्यांसोबत असलेली नाती सुद्धा भारतात अतिशय प्रेमाने जपली जातात. नुसती जपली जात नाही तर ती नाती साजरी देखील केली जातात. आपल्या देशात प्रत्येक नाते साजरे करण्यासाठी एक खास दिवस देण्यात आला आहे. असेच एक खूपच अनोखे नाते साजरे करण्यासाठी असलेला एक दिवस म्हणजे पोळा. माणसाचे त्याचा मित्र आणि त्याचा सहकर्मी असलेल्या बैलासोबतचे नाते दर्शवण्यासाठी आणि बैलाचे शेतकऱ्याच्या आयुष्यातील महत्व अधोरेखित करण्यासाठी बैल पोळा हा सण साजरा केला जातो. (Shravan 2025)
आपला देश हा कृषिप्रधान देश आहे. देशातील बहुसंख्य लोकं गावात राहून शेती करतात आणि देशाचे पोट भारतात. अशा या शेतकऱ्याचा अतिशय जवळचा मित्र म्हणजे सर्जा राजा अर्थात त्याचा बैल. शेतातील सर्वच कामं करण्यासाठी बैलाची कायम शेतकऱ्याला मदत होते. बैलामुळेच शेतकरी शेतात पीक घेऊ शकतो असे म्हटले तरी अतिशययोक्ती ठरणार नाही. अशा या बैलाचे शेतकऱ्याच्या आयुष्यातील महत्व दुसऱ्या कोणाला कळणार नाही. त्यामुळे वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करून त्याला पोळ्याच्या दिवशी आराम दिला जातो आणि गोडधोड खाऊ घातले जाते. (Top Marathi Headline)
दरवर्षी श्रावण अमावस्या दिवशी बैल पोळा साजरा केला जातो. या दिवसाला पिठोरी अमावस्या देखील म्हणतात. पोळ्याच्या दिवशी वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलाला नांगरापासून आणि शेतीपासून आराम दिला जातो. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर हा बैल पोळ्याचा सण साजरा केला जातो. महाराष्ट्रासह, मध्य प्रदेश आणि तेलंगणा सीमाभागात सुद्धा हा सण साजरा होतो. यंदा पोळ्याचा सण २९ ऑगस्ट, शुक्रवार रोजी आहे. श्रावण महिन्यातील महत्त्वाचा आणि शेवटचा सण बैलपोळा. बैलपोळा या सणाला देशात विविध नावांनी ओळखले जाते. महाराष्ट्राच्या काही भागात हा सण दोन दिवस साजरा केला जातो. बैलपोळा म्हणजेच पहिल्या दिवसाला ‘मोठा पोळा’ आणि दुसर्या दिवसाला लहान मुले लाकडाचे नंदीबैल सजवतात याला ‘तान्हा पोळा’ असे म्हटले जाते. (Todays Marathi Headline)
पोळा सणाच्या आदल्या दिवशी बैलांना आवतण देण्यात येते. बैलाच्या खांद्याला हळद आणि तुपाने शेकतात. ओढा वा नदीवर नेऊन त्यांना आंघोळ घालतात. त्यांच्या पाठीवर नक्षीकाम केलेली झूल, सर्वांगावर गेरूचे ठिपके, शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग, गळ्यात कवड्या व घुंगरांच्या माळा, नवी वेसण, नवा कासरा पायात चांदीचे वा करदोड्याचे तोडे घालतात. गोड पुरणपोळी व सुग्रास अन्नाचा नैवेद्य दाखवतात. प्रत्येक शेतकरी आपल्या ऐपतीनुसार बैलांचा साजश्रुंगार करतात. (Top Trending News)
बैलांना सजवून त्यांची मिरवणूक काढली जाते. या दिवशी महाराष्ट्रातील खेड्यांमधल्या प्रत्येक घराला आंब्याच्या पानांचे तोरण बांधले जाते. गावातल्या सर्व बैलजोड्या वाजंत्री सनई ढोल ताशे वाजवत एकत्र आणल्या जातात. या वेळी महिला वर्ग पोळ्याची गीते म्हणतात. गावातील पाटील तोरण तोडतो तेव्हा पोळा फुटला असे म्हटले जाते. नंतर बैलाला मारुतीच्या देवळात नेतात आणि घरी नेऊन त्याला ओवळतात. शेतकरी वर्गात हा सण विशेष महत्त्वाचा मानला जातो. (Latest Marathi News)
बैलपोळा कथा
बैलपोळ्याविषयी एक कथा प्रचलित आहे. असं म्हणतात की, कैलास पर्वतावर भगवान शंकर आणि माता पार्वती सारीपाट खेळत होते. सारीपाटाचा हा डाव माता पार्वतीने जिंकला मात्र हा डाव कोणी जिंकला यावरून भगवान शंकर आणि माता पार्वतीचे भांडण झाले. हा वाद सोडवण्यासाठी तिसऱ्या व्यक्तीची मदत घ्यायचे ठरले. शेजारी नंदी उभा होता नंदी त्या क्षणाचा साक्षीदार होता तेव्हा पार्वती मातेने नंदीला विचारले की डाव कोणी जिंकला ? त्यावेळी भगवान शंकराचा परम भक्त नंदीने शंकराची बाजू घेतली. (Top Marathi News)
नंदीचे उत्तर ऐकून माता पार्वतीला राग आला आणि तिने नंदीला शाप दिला. कलयुगात तुला आयुष्यभर कष्ट करावे लागतील असा शाप पार्वतीने नंदीला दिला. नंदीला त्याची चूक समजली आणि त्याने पार्वती मातेची माफी मागितली. तेव्हा दया येऊन पार्वती मातेने नंदीला सांगितले की तुला कलयुगात जरी आयुष्यभर कष्ट करावे लागले तरी वर्षातून एक दिवस असा असेल जेव्हा माणसं तुझी देवाप्रमाणे पूजा करतील तुला कष्टाचे काम करायला देणार नाहीत. (Top Stories)
==============
हे देखील वाचा : Ekadshi : भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षात येणारी ‘अजा एकादशी’
Shravan : ‘या’ कारणामुळे उद्याचा चौथा आणि शेवटचा श्रावणी सोमवार ठरणार खास
===============
तेव्हापासून बैलाची पूजा करणारा बैलपोळा हा सण साजरा होऊ लागला. बैलपोळ्याची कथा काल्पनिक असली तरी हा सण साजरा करण्यामागची भावना मात्र नक्कीच कृतज्ञतेची आहे. निसर्गातील प्रत्येक वृक्ष, वेली, प्राणी, डोंगर, नदीची पूजा करून त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा भारतात आहे. ही परंपराच माणसाची निसर्गाशी असलेली नाळ कायम जोडून ठेवते. (Social News)
(टीप- येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. आम्ही या माहितीचे समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics