अमेरिकेच्या वॉशिंग्टन, डीसी येथे झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत आलेल्या नागरिकांची नव्यानं तपासणी सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी या घटनेचे वर्णन दहशतवादी हल्ला म्हणून केले आहे. हल्लेखोर रहमानउल्लाह लकनवाल हा २०२१ मध्ये अफगाणिस्तानातून अमेरिकेत आल्याचे समजल्यावर ट्रम्प यांनी तात्काळ अफगाणिस्तानातून येणाऱ्या सर्वांची पुन्हा तपासणी करण्याची घोषणा केली आहे. शिवाय ज्यांचे अमेरिकेवर प्रेम नाही त्यांना आता हद्दपार करण्यात येईल, असा इशाराही दिला आहे. सोबतच तिसऱ्या जगातील देशांमधून होणारे स्थलांतर पूर्णपणे थांबवण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. ट्रम्प यांच्या रडारवर १९ देश असून या देशातील निर्वासीतांना आता त्वरेनं अमेरिकेतून बाहेरचा रस्ता दाखवला जाणार आहे. (Donald Trump)

अमेरिकेच्या वॉशिंग्टन डीसी येथे झालेल्या हल्ल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली. या हल्ल्यात ठार झालेल्या जवानांना ट्रम्प यांनी श्रद्धांजली वाहून, या हल्ल्याचा बदला घेतला जाईल, हे जाहीर केले आहे. हा हल्ला अफगाणिस्तानमधून आलेल्या स्थलांतरिताने केला आहे, त्यामुळे आता ट्रम्प प्रशासन हे अफगाणिस्तानसह अन्य देशांतून अमेरिकेत आलेल्यांची माहितीही नव्यानं तपासणार आहेत. यातून आर्थिकदृष्ट्या कमकुवत देशातून स्थलांतर पूर्णपणे थांबवण्याचा निर्णय ट्रम्प यांनी घेतला आहे. या देशामधून आलेले नागरिक हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे असल्याचेही ट्रम्प प्रशासनाचे मत आहे. अमेरिकेतील तांत्रिक प्रगतीला स्थलांतरीत काळीमा लावत असल्याचे ट्रम्प यांनी वक्तव्य केले आहे. वॉशिंग्टन डीसीवरील हल्ल्यामुळे जगभरात अमेरिकेतील सुरक्षा प्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित कऱण्यात आले. त्यामुळे ट्रम्प यांनी आता या सर्वाला जबाबदार असलेल्या स्थलांतरितांवरच कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. (Internatonal News)
या हल्ल्यानंतर अमेरिकेतील अफगाण निर्वासितांचा प्रवेश ताबडतोब थांबवण्यात आला आहे. तसेच अन्य १९ देशांतील स्थलांतरितांची तपासणीही सुरु करण्यात आली आहे. याशिवाय अमेरिकेचे नागरिक नसलेल्यांना आता कुठलेही सरकारी लाभ मिळणार नाहीत, हेही स्पष्ट केले आहे. सोबतच ज्या स्थलांतरितांना अमेरिकेचे नागरिकत्व मिळाले आहे, त्यांचीही नव्यानं तपासणी करण्यात येणार आहे. त्यांनी अमेरिकेची शांतता बिघडवण्याचा प्रयत्न केला असेल तर त्यांचे नागरिकत्व देखील काढून घेतले जाणार आहे. ट्रम्प प्रशासनानं अफगाणिस्तानसह ज्या १९ देशांमधील स्थलांतरितांच्या कायमस्वरूपी निवासी दर्जाची चौकशी करण्याची घोषणा केली आहे, त्यामध्ये बर्मा, चाड, काँगो प्रजासत्ताक, विषुववृत्तीय गिनी, इरिट्रिया, हैती, इराण, लिबिया, सोमालिया, सुदान, येमेन, बुरुंडी, क्युबा, लाओस, सिएरा लिओन, टोगो, तुर्कमेनिस्तान आणि व्हेनेझुएला यांचा समावेश आहे. (Donald Trump)

D.C. police on the scene where five people were shot in southeast D.C. (WTOP/John Domen)
या हल्ल्यातील मुख्य आरोपी रहमानउल्लाह लकनवाल याला तात्काळ अटक कऱण्यात आली आहे. त्याची चौकशी चालू असून तो कुठल्या गटाचा सदस्य आहे का, आणि हा हल्ला करण्यामध्ये अन्य कोणाचा सहभाग होता का, याचा आता तपास सुरु आहे. सोबतच ट्रम्प यांनी जानेवारीमध्ये अध्यक्ष पदाची शपथ घेतल्यानंतर बेकायदेशीर स्थलांतरितांना हद्दपार करण्याच्या कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली. यानंतर अनेकांनी नाराजी व्यक्त केली. या नाराजीतूनच हा हल्ला झाला का, याचाही तपास सुरु आहे. रहमानउल्लाह हा ऑगस्ट २०२१ मध्ये अफगाणिस्तानातून अमेरिकेत आला होता. त्याने २०२४ मध्ये निर्वासित दर्जासाठी अर्ज केला आणि एप्रिल २०२५ मध्ये त्याला मंजुरी मिळाली होती. त्याचे कुटुंबियही अमेरिकेच्या आश्रयाला आलेले आहे. आता त्याला अटक झाल्यावर त्याच्या कुटुंबियांवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, तसेच त्यांनाही अमेरिकेतून बाहेर काढण्यात येईल, अशी शक्यता आहे. जो बायडेनच्या यांच्या अध्यक्षीय कार्यकाळात २० दशलक्ष परदेशी नागरिक योग्य तपासणीशिवाय अमेरिकेत आल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला आहे. त्या सर्वांचा शोध घेऊन त्यांचा गुन्हेगारी घटनांमध्ये सहभाग आहे का, याची तपासणी होणार आहे. (Internatonal News)
=======================
हे देखील वाचा : Instagram : इंस्टाग्राम हॅक होऊ नये म्हणून फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स
=======================
या सर्वात डोनाल्ड ट्रम्प हे एका वेगळ्या वादात सापडले आहेत. कारण या हल्ल्यानंतर त्यांनी तिस-या जगातील कुठलाही नागरिक आपल्या देशात नको, असा उल्लेख केला. त्यावर अनेकांनी टीका केली आहे. या शब्दाचा उल्लेख प्रथम शीतयुद्धादरम्यान झाला होता. यावेळी जगाला तीन भागात विभागण्यात आले. पहिल्या जगात, युनायटेड स्टेट्स आणि नाटोचे सहयोगी मानले जाणारे देश समाविष्ट होते. दुसऱ्या जगात, सोव्हिएत युनियन आणि वॉर्सा कराराचे सहयोगी देश होते. तिसऱ्या जगात, असे देश होते जे कोणत्याही गटाचा भाग नव्हते. आशिया, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिका या गटाचा भाग मानले जात होते. त्यामुळे ट्रम्प यांनी या देशांचा अपमानास्पद उल्लेख केला आहे, अशी टीकाही होत आहे. (Donald Trump)
सई बने
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
